मनाचे श्लोक - श्लोक ३५

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३५ | Manache Shlok - Shlok 35

मनाचे श्लोक - श्लोक ३५ - [Manache Shlok - Shlok 35] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३५


असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरि: प्रणिनां सनिधौ सर्वदाऽऽस्ते ।
कृपालु: स्वभक्तस्य धैंर्य विलोक्य ॥
सदानंदरुपेन कैवल्यदो य: ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करून देतात की, देवाच्या प्रती जसा भाव असेल, त्याच भावा प्रमाणे देव आपल्या हृदयात वसतात.

जया अंतरी भाव होईल जैसा ।
तयालागि तो देव पावेल तैसा ॥

किंवा

मनीं भावना भक्ती लोकांसि जैसी ।
तयासारिखी देवरायासी तैसी ॥

किंवा

जैसे जयाचें भजन ।
तैसा चि देव हि आपण ।
म्हणौन हें आवघें जाण ।
आपण चि पासीं ॥

अनन्यतेने शरण येऊन भक्ती करत असलेल्या भक्ताची श्रीरामाने कधी उपेक्षा केल्याचे एकहीउदाहरण नाही. राम त्याचे सर्व विघ्नांपासून रक्षण करतो.

च्यारीदेह निरसावे ।
साधकें देहातीत व्हावें ।
देहातीत होतां जाणावे ।
अनन्य भक्त ॥

किंवा

सदा सर्वदा देव दासाभिमानी ।
कृपा भाकितां सीघ्र पावे निदानीं ।
तया अंतरी थोर लाहान नाहीं ।
परी पाहिजे दृढ भावार्थ कांही ॥