मनाचे श्लोक - श्लोक ३३

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३३ | Manache Shlok - Shlok 33

मनाचे श्लोक - श्लोक ३३ - [Manache Shlok - Shlok 33] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३३


वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनश्र्चंद्रसू र्यर्क्षमेर्वादिकं तु ।
वसत्यंजलसा यत्स्वरुपे समस्तम्‌ ॥
चिरंजीवतां येन नीतौ स्वदासौ ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करुन देतात की, जोवर मेरुमंदरादि सृष्टिलीला आहे व जोवर चंद्र, सूर्य, तारांगणे व मेघमाळा ही आहेत, तोवर ज्या श्रीरामाने आपले दोन भक्त (मारुती व बिभीषण) या लोकी चिरंजीव केले तो भक्तकैवारी श्रीराम केव्हाही दासाची उपेक्षा करत नाही.

यासंबंधी अध्यात्मरामायणातील एक श्लोक -
यावच्चंद्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी ।
यावन्मम कथा लोके तावद्राज्यं करोत्यसौ ॥

समर्थकृत रामायणाच्या युद्धकांडातील अकराव्या प्रसंगातील हा ५१ वा श्लोक -
म्हणे गा विरा तां पुरीमाजि जावें ।
ध्रुवाचे परी राज्य सूखें करावें ।
शशी सूर्य तारांगणे अंतराळीं ।
असावें सुखी भोगिजे सर्व काळी ॥