मनाचे श्लोक - श्लोक २६

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २६ | Manache Shlok - Shlok 26

मनाचे श्लोक - श्लोक २६ - [Manache Shlok - Shlok 26] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २६


देहेरक्षणाकारणें यत्न केला ।
परी शेवटीं काळ घेउन गेला ॥
करीं रे मना भक्ति या राघवाची ।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥२६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


कृत: केनचिद्देहरक्षाप्रयत्न: ।
स देह: क्षणेनैव कालेन नीत: ॥
अतस्त्वं मनो रामचंद्र भजस्व ।
प्रमुच्य प्रियापुत्रदेहात्मचिताम्‌ ॥२६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थांनी या श्लोकाला अनुसरुन एक सुंदर ओवी मांडली आहे. ते म्हणतात म्हणतात -
तत्वें तत्व मेळविलें ।
त्यासी देह हें नाम ठेविलें ।
तें जाणते पुरुषीं शोधिलें ।
तत्वें तत्व ॥

समर्थ म्हणतात की मिळालेला देह कायमस्वरूपी टिकवण्यासाठी कितीही धडपड केली, त्याचे रक्षण करण्या करता कितीही उपाय करुन पाहिले तरी ते व्यर्थच ठरतील. कारण देह नश्वर आहे. निसर्गाच्या नियमा प्रमाणे एक दिवस काळ येऊन त्याला घेऊन जाणारच आहे. त्यामुळे हाती असलेला अमुल्य वेळ वाया न घालवता, अखंडपणे श्रीरामाची भक्ति करावी.
या कारणें सावधान असावें ।
जितुकें होईल तितुकें करावें ।
भगवत्कीर्तिनें भरावें ।
भूमंडळ ॥
अशा प्रकारे वागल्यास, भवाची म्हणजे जन्ममरणाची चिंता कायमची सुटेल, असा समर्थांचा येथे उपदेश आहे.