Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक २५

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २५ | Manache Shlok - Shlok 25

मनाचे श्लोक - श्लोक २५ - [Manache Shlok - Shlok 25] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २५


मना वीट मानूं नको बोलण्याचा ।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा ॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे ।
पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनस्ते मदुक्तिर्हितैवेति मान्या ।
न चेद्रामपादाब्जलब्धि: कुतस्ये ॥
सुखाप्तिक्षणे जायते सौख्यमेव ।
तत: सर्वनाश: स्थिरं नैव किंचित्‌ ॥२५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, मना, तू माझ्या बोलण्याचा कंटाळा करु नको. कंटाळा करुन नामस्मरण सोडलेस तर तुला श्रीरामाची प्राप्ती कशी होईल ?

काळ हा शेवटी काळच असतो. तो कधी सुखाच्या पलंगावर निजवेल तर कधी दुःखाच्या दरीत कोसळून देईल. काळाचा काही नेम नाही, तो नेहमी पुढे सरकतच असतो. आज आपल्याकडे सर्व काही आहे, त्यामुळे सुखाचा अनुभव येत आहे पण उद्या एका क्षणात, होत्याचे नव्हते होऊन आपल्या जवळ काहीही शिल्लक रहाणार नाही. म्हणूनच समर्थ तात्पर्य सांगत आहेत की -
या नरदेहाचेनि लागवेगें ।
सार्थक करावें संतसंगें ।
नीच योनी दुःख मागें ।
बहुत भोगिलें ॥

कोण समयो येईल कैसा ।
याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा ।
उडोन जाती ॥

Download MarathiMati.com's New Android App from Google Play