मनाचे श्लोक - श्लोक २४

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ फेब्रुवारी २००८

मनाचे श्ोक - श्लोक २४ | Manache Shlok - Shlok 24

मनाचे श्लोक - श्लोक २४ - [Manache Shlok - Shlok 24] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक २४


रघुनायकावीण वांया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विना रामसेवां श्रमो व्यर्थ एव ।
जनस्य प्रलापो यथा निद्रितस्य ॥
अतो ब्रुहि वाचा हरेर्नाम नित्य ।
महंतां महापापिनीं संहाराशु ॥२४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ मनाला उपदेश करताना एक ओवी सांगत आहेत,
रामेविण जे जे आस ।
तितुकी जाणावी नैराश ।
माझें माझें सावकाश ।
सीण चि उरे ॥
श्रीरामाला विसरणे म्हणजे स्वतःला अडचणीत टाकणे होय. कारण देवाच्या विस्मरणानेच हातून असंख्य पापे घडत असतात.

जनाचा लालची स्वभाव ।
आरंभी च म्हणती देव ।
म्हणिजे मजला कांही देव ।
ऐसी वासना ॥

कांही च भक्ति केली नसतां ।
आणी इच्छिती प्रसन्नता ।
जैसें कांहीं च सेवा न करितां ।
स्वामीस मागती ॥
प्रस्तुत ओव्यांमध्ये सांगितल्या प्रमाणे जनाचा स्वभाव लालची असून, व्यर्थ भाषा बरळण्याचा आहे. आणि रघुनायकाची कुठल्याही प्रकारे सेवा न करता त्याच्याकडून फळाची अपेक्षा करणे, हे ही समाजाचे एक धोरण.

अभेदामाजी वाढवी भेदा ।
ते हे अहंता ॥
अजून एक शिकवण समर्थ आपल्याला देत आहेत. ते सांगतात, वाचेत नेहमी रामनाम असावे. अहंकार आपापसात भेद निर्माण करतो. त्यामुळे अहंकाररुपी पापाहून नेहमी दूर रहावे.