मनाचे श्लोक - श्लोक २

प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक २ | Manache Shlok - Shlok 2

मनाचे श्लोक - श्लोक २ - [Manache Shlok - Shlok 2] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक २


मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


मनो रामभक्ते: पथा यास्यसि त्वं ।
तदा श्रीहरिं प्राप्स्यसे सत्स्वभावात्‌ ॥
जनैर्निदितं यतउतवया तन्न कार्यम्‌ ।
नरै: श्र्लाघितं कर्म यत्नेन सेव्यम्‌ ॥२॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


हे मनाचे विशेषण आहे. मन जात्या चंचल आहे; त्याला गोड शब्दांनी आळवूनच भक्तिमार्गाकडे लावलं पाहिजे. श्रीसमर्थांची शिकवण आहेच की,
दुर्जन प्राणी समजावे ।
परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरीस आळवावे ।
महत्त्व देऊनी ।

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पाद - सेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनम् ॥ असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत.
त्यांत नवमी भक्ती आत्मनिवेदन ।
न होतां न चुके जन्ममरण ।
हें वचन सत्य प्रमाण ।
अन्यथा नव्हे ॥
हे सर्व प्रकार समजण्यासाठी श्रीदासबोधाचे नित्य श्रवणमनन केले पाहिजे.

सहज, तत्काळ. नवविध भक्तीमध्ये श्रेष्ठ जी आत्मनिवेदन भक्ति ती घडली म्हणजे तत्काळ श्रीरामाचा साक्षात्कार होतो.
आपणांस निवेदिती ।
ऐसे भक्त थोडे असती ।
तयांस परमात्मा मुक्ती ।
तत्काळ देतो ॥

सर्व लोकांची चांगल्या वाईटाविषयी एकवाक्यता असते असे नाही. जी गोष्ट काहींना चांगली वाटते, तीच गोष्ट काहींना वाईटही वाटू शकते. तेव्हा जन म्हणजे लोक असा सामान्य अर्थ न घेता जनी जनार्दन अशी ज्यांची वृत्ती झालेली असते ते सर्व जन घ्यावे. असे जन म्हणजे सज्जन, साधुजन होत. सज्जनांची मात्र सत् आणि असत् यांच्याविषयी एकवाक्यता असते. साधुजनांच्या मार्गाने जावे असा भावार्थ.