मनाचे श्लोक - श्लोक १५

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक १५ | Manache Shlok - Shlok 15

मनाचे श्लोक - श्लोक १५ - [Manache Shlok - Shlok 15] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १५


मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मन: पश्य ये संस्थिता मृत्युभूमौ ।
वदंत्यामूतिंतेऽहमेपरहमित्थं ॥
चिरं जीवितं मानयंत्यात्मनोऽज्ञा: ।
क्षणात्ते परित्यज्य सर्व प्रयांति ॥१५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


जिवंतपणी देहबुद्धिच्या ओझ्याखाली राहून जो तो मीपणाचा गर्वच फार करत असतो. याबाबतीत श्रीसमर्थ म्हणतात -
जो जन्मासी येऊन गेला ।
तो मी थोर म्हणतां च मेला ॥

वास्तविक पाहता आपल्याकडे असं काय आहे की ज्याचा आपण अभिमान बाळगावा ?
थोडे जिणें अर्धपुडी काया ।
गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया ।
वेळ नाहीं ॥

समर्थांची ही ओवी फारच छान आहे. ते म्हणतात -
येथील येथें अवघें चि राहातें ।
ऐसें प्रत्ययास येतें ।
कोण काय घेऊन जातें ।
सांगाना कां ॥

असं असून देखील सर्वांचा व्यवहार कसा चालला आहे तो पहा ! आपण सर्व मृत्युंजय असल्यासारखेच जगत आहोत.
जिता तों किती घालमेली करावी ।
बहूतांपरी कल्पना ते धरावी ।
कितीयेक तें आपुलें तें परावें ।
जनीं सर्व सांडूनि सेखीं मरावें ॥