मनाचे श्लोक - श्लोक १४

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक १४ | Manache Shlok - Shlok 14

मनाचे श्लोक - श्लोक १४ - [Manache Shlok - Shlok 14] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १४


जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटीं काळमूखीं निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो देह एषोऽनिपुण्येन लब्ध: ।
कृतांतेन नीत: स एवातकाले ॥
महांतोऽपि वै मृत्युमार्गेण याता: ।
ह्यसंख्येयजीवा जनिं प्राप्य नष्टा: ॥१४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थांनी या विषयी श्रीदासबोधात तिसऱ्या दशकाच्या नवव्या समासात सांगितलंय की -
असो ऐसे सकळही गेले ।
परंतु येक चि राहिले ।
जे स्वरूपाकार जाले ।
आत्मज्ञानी ॥

समर्थ येथे उपदेश करत आहेत की, जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जायचंच आहे. निसर्गाचा हा नियम थोर संत-महात्म्यांनाही आजवर चुकलेला नाही. फरक फक्त इतकाच आहे की ते देहात असूनही मुक्त असल्यामुळे त्यांचा देह राहिला काय किंवा पडला काय, त्यांना त्याचे भान नसते. सामान्य जीवाला मात्र देहबुद्धिमुळे त्या वेळेस फार यातना भोगाव्या लागतात.

तेव्हा, काळ हे सत्य मानून स्वतःच्या आणि भोवतालच्या ऐहिक सुखाला न भुलता, वेळ वाया न घालवता, प्रत्येकाने तत्काळ आत्महिताचा मार्ग धरावा, असे समर्थ बजावत आहेत.