मनाचे श्लोक - श्लोक १०७

प्रकाशन: संपादक मंडळ | १० मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०७ | Manache Shlok - Shlok 107

मनाचे श्लोक - श्लोक १०७ - [Manache Shlok - Shlok 107] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०७


मना कोपआरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥१०७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो नैव कार्यः प्रकोपः कदाचि ।
न्मनः साधुसंगे प्रवृत्तिं करुष्व ॥
मनो मुंच संगं सदा दुर्जनानां ।
मनो मुक्तिसंपाद्विभांग भज त्वम्‌ ॥१०७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्या सर्वांना समजावत आहेत की, कोपाची धारणा नसावी. म्हणजे कोपाला उद्भवू देऊ नये.

संतापाचा उद्भव न होण्याला एक उपाय आहे. हे मना, सत्संगतीपासून बुद्धीला ढळू देऊ नकोस. कारण,
दुर्जनसंगती सज्जन ढांसळे ।
क्रोध हा प्रबळे अकस्मात ॥

ज्या संगतीमुळे साधक, कृतनिश्चयापासून ढळतो, ती संगत दुष्टच होय. असा चांडाळ संग सोडून, हे मना, संतसज्जनांचा संग धर. तेणेकरून तू मोक्षाचा वाटेकरी होशील.
दुर्जनाचा संग होये मना भंग ।
सज्जनाचा योग सुखकारी ॥
सुखकारी संग संतसज्जनाचा ।
संताप मनाचा दुरी ठाके ॥
चांडाळसंगती होईज चांडाळ ।
होये पुण्यसीळ साधुसंगे ॥