Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक १०३

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १०३ | Manache Shlok - Shlok 103

मनाचे श्लोक - श्लोक १०३ - [Manache Shlok - Shlok 103] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १०३


हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थीं मना सांडि जीवीं करावी ॥१०३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरेर्नामसंकीर्तने प्रीतियोगो ।
विधेयोंऽजसा देहभावं विसृज्य ॥
धने चान्यदीये तथान्यप्रियायां ।
निरुढोऽभिमानः परित्याज्य एव ॥१०३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, कीर्तन म्हणजे सगुणरूपाचे गुणानुवादन आणि निरूपण म्हणजे निर्गुणाचे विवरण.
सगुणकथा या नांव कीर्तन ।
अद्वैत म्हणिजे निरूपण ॥
सगुणाचे कीर्तन स्वतः करीत असता किंवा श्रवण करीत असता श्रीरामी रंगून जावे. तसेच, अद्वैताचे निरूपण स्वतः करीत असता किंवा श्रवण करीत असता, देहाचे भान विसरून जावे. साहजिक आहे. एकदा का चित्त श्रीरामचरणी लीन झाले म्हणजे देहाचे व परिस्थितीचे भान कोठून राहणार..?
ध्यानी गुंतले मन ।
कैचें आठवेल जन ।
निशंक निर्लज्ज कीर्तन ।
करितां रंग माजे ॥

कांचनाचें ध्यान परस्त्रीचिंतन ।
जन्मासी कारण हे ची दोनी ॥
म्हणून हे मना, त्या उभयतांचा मनापासून त्याग कर. पहिल्या दोन चरणांत सांगितल्याप्रमाणे, कीर्तनप्रसंगी मन श्रीरामकार होऊन श्रोत्यावक्त्यांना देहाचाही विसर पडावा, अशी इच्छा असेल तर द्रव्य आणि कांता यांची कल्पना सुद्धा डोळ्यांपुढे येता कामा नये. म्हणून वक्त्यांनी, मोलें कीर्तन करूं नये । आणि कीर्तनात, स्त्रीयांदिकांचें कौतुक । वर्णूं नयें कीं ॥ व,
विषइ लोक श्रवणीं येती ।
ते बायेकांकडे च पाहाती ।
चोरटे लोक चोरून जाती ।
पादरक्षा ॥
श्रोते असे नसावेत, असे श्रीसमर्थ सांगत आहेत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play