MarathiMati.com - Android App on Google Play Store

लोहगड किल्ला

संदर्भ | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जुलै २००४

लोहगड किल्ला | Lohagad Fort

लोहगड किल्ला - लोहगड किल्ल्याची माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा, मॅप. [Information, Photos, Videos and Google Map of Lohagad Fort Lonavala Pune, Maharashtra, India].

हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.

पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर लोहगड विसापूर या जोडकिल्ल्यांची रेल्वेने मुळी पाटी लावून जाहिरातच केलेली आहे. त्यावर लिहिलयं -“लोहगड, विसापूर फोर्ट-किल्ले”

मळवली स्थानकबाहेर पडल्यानंतर नव्या द्रुतगती महामार्गावरील पुल ओलांडून पलिकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर भाजे गाव येते. येथून एक पायऱ्यांचा मार्ग भाग्याच्या लेण्यांकडे जातो. तर दुसरी गाडीवाट लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगावाकडे जाते. लोहगावातून लोहगडाची तटबंदी आणि बुरूज लक्ष वेधून घेतात. चढायला सोपा असा हा दुर्ग सहजपणे काबीज करता येतो. गडावर एक सुंदर स्वच्छ पाण्याचे टाके आहे. यात रंगीबेरंगी मासेही आहेत.

पवणामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे-मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळीची नेहमीच ये जा चालू असते. किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिद्ध लेण्या आहेत. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.

इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.

इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुऱ्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.

  • गणेश दरवाजा : ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
  • नारायण दरवाजा : हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.
  • हनुमान दरवाजा : हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
  • महादरवाजा : हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.

महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. ते तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे.

मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजुच्या परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात. पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोमनी गुणगुणतं.. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी । आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥

गडावर जाण्याच्या वाटा :
लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.

  • पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे. त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.
  • लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून ३ ते ४ कि.मी अंतरावर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सीने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु. आहे.
  • काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.

लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात. आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते. बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store