मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 7.

मोरगाव येथील इतर धार्मिक स्थळे


मोरगाव कऱ्हा नदीच्या काठवर वसले आहे. या कऱ्हा नदीच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका आहे ती अशी...

एकदा ब्रम्हदेवाकडून श्रीसरस्वतीचा विनयभंग झाला. त्या पातकाने तो अस्वस्थ झाला. चित्तशुद्धीसाठी जगातल्या सर्व तीर्थयात्रा त्याने विधिपूर्वक केल्या व सर्व तीर्थतील उदक आपल्या कमंडलूत भरून आणले. तरीही त्याच्या चित्ताला शांतता लाभली नाही. तेव्हा तो मोरगावाला आला व त्याने श्रीमयुरेवराचे पूजन करून त्याच्यावर अभिषेक केला. श्रींना प्रदक्षिणा घालत असताना सर्व तीर्थांनी भरलेला कमंडलू ब्रम्हदेवाचा पाय लागून लवंडला. ब्रम्हदेवाला दुःख झाले. तो ते तीर्थ कमंडलूत भरू लागला. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले, “ब्रम्हदेवा, हा कमंडलू भरू नको. सर्व जगातील तीर्थ एकत्र होऊन जगातल्या पापक्षालनासाठी श्री ब्रम्हकमंडलू कऱ्हागंगा या नावाने नदीरूपाने येथे वाहू दे. यातले एक पळीभर तीर्थ घेऊन तू पावन हो.” अशाप्रकारे कऱ्हागंगा मोरगावात अवतीर्ण झाली. कऱ्हा नदीच्या पाच मैलांचे प्रवाह श्रीगणेशतीर्थ, भीमतीर्थ, कपिलतीर्थ, व्यासतीर्थ, ऋषीतीर्थ, सर्वपुण्यतीर्थ आणि श्रीगणेशगया तीर्थ अशी सात तीर्थे आहेत.

जडभरत


कऱ्हागंगेच्या उत्तरेला एका मैलावर श्रीजडभरताचे स्थान आहे. पूर्वी त्या ठिकाणी त्याला मोठा आश्रम होता. आता त्याचे स्मारक म्हणून फक्त एक शिळ आहे. त्या शिळेवर महादेवाची पाच लिंगे आहेत. क्षेत्रांतर्गत यात्राविधानात श्रीजडभरत शिळेचे दर्शन घेणे आवश्यक आहे.

नग्नभैरेव


मोरगावच्या पूर्वेला एका मैलावर देवागराचे सीमेवर नग्नभैरवाचे मुख्य स्थान आहे. त्याचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. तेथे गुळ समर्पण करून नारळ फोडावा लागतो. मोरगाव क्षेत्राचा तो क्षेत्रफळ असून तो गणेशभक्तांचे पालन करतो व त्यांचे धनधान्यादि वाढवतो. ह्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास देवळाच्याजवळ गाभाऱ्याबाहेर श्रीनग्नभैरवाचे जे छोटे देऊळ आहे तेथे हे विधी पूर्ण करता येतात.