मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 3.

श्रीमयुरेश्वराच्या स्थापनेसंबंधित प्रचलित असलेल्या कथा


पूर्वी मिथिल देशामध्ये गंडकी नामक नगरीत महापराक्रमी आणि पुण्यवान असा चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. त्याची पत्नी राणी उग्रा महापतिव्रता स्त्री होती. परंतु संतती नसल्यामुळे राजा-राणी अतिशय दुःखी होते. त्यांनी शौनक ऋषींच्या सांगण्यावरून सूर्योपासना केली. सूर्यदेवाच्या आशिर्वादाने राणी उग्रा गर्भवती झाली. त्या गर्भाचा तेजोदह सहन न झाल्यामुळे राणी उग्रेने तो गर्भ समुद्रामध्ये सोडला. तेथे त्या गर्भापासून महातेजस्वी, महाबलाढ्य असे एक बालक निर्माण झाले. तेव्हा समुद्राने ब्राह्मणरूप धारण केले आणि त्या बालकास राजाकडे आणून पोहचते केले.

राजाने त्या बालकाचे जातककर्मादि संस्कार करून, तो समुद्रामध्ये उत्पन्न झाला म्हणून त्याचे नाव ‘सिंधू’ असे ठेवले. पुढे राजकुमार सिंधू मोठा झाल्यावर त्याने दैत्य गुरू शुक्राचार्याच्या आदेशानुसार दोन हजार वर्षे सूर्योपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाल्यावर राजकुमार सिंधूने ‘मला अमरत्व दे’ असा वर मागितला. तेव्हा भगवान सूर्यदेव म्हणाले, “मी तुला अमृताचे भोजन देतो. हे जो पर्यंत तू आपल्या उदारामध्ये धारण करशील, तो पर्यंत तुला मरण येणार नाही.” असा वर देऊन सूर्यदेव गुप्त झाले.

आपला पुत्र बुद्धीमान असून त्यास सूर्यदेवाने वर दिला, हे पाहून राजा चक्रपाणीने सर्व राज्य सिंधूस दिले व आपण वनवासात गेला. राज्याभिषेक झाल्यावर सिंधूने सैन्य जमवले व तो दिग्विजयास निघाला. सर्वप्रथम त्याने पृथ्वी जिंकली. नंतर इंद्राचा पराभव केला. सिंधूने आपल्या अतुलनीय पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला आपल्या गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. अशाप्रकारे सर्व देवांचा पराभव करून सिंधूराजाने त्यांना आपल्या गंडकीनगरीच्या कैदखान्यात बंदिस्त केले.

सिंधुराजाने सत्यलोक व कैलासाकडे आपली दृष्टी वळवल्यावर मात्र सर्व देवगण दुःखी झाले. सर्व देवांनी आपला अधिपती गणेश याची प्रार्थना केली. तेव्हा गणेशाने प्रसन्न होऊन सांगितले, “तुम्हाला त्रास देणाऱ्या सिंधु दैत्याचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी आता लवकरच माता पार्वतीच्या उदरी अवतार धारण करणार आहे. कृतयुगात मला ‘विनायक’ म्हणतील. त्रेतायुगात मी ‘मयुरेश्वर’ नाव धारण करीन. द्वापारयुगामध्ये मला ‘गजानन’ असे म्हणतील आणि कलियुगामध्ये ‘धुम्रकेतु’ हे नाव मला प्राप्त होईल.”

सिंधुदैत्याच्या त्रासाने कैलासाचा त्याग केल्यावर शंकर-पार्वतीसह मेरूपर्वतावर गेले. देवी पार्वतीने गजाननाची एकाक्षर मंत्राने १२ वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यामुळे गजाननाने प्रसन्न होऊन “मी तुझ्या पोटी जन्म घेईन.” असा वर दिला. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वती गजाननाची मृत्तिकेची मूर्ती करून तिचे यथाविधी पूजन करत होती, इतक्यात तीच मूर्ती सजीव होऊन पार्वतीपुढे उभी राहिली. नंतर तो बालक तिला म्हणाला, “माते, तू ज्याचे रात्रंदिवस चिंतन करत होतीस तोच मी गजानन. सिंधू दैत्याच्या वधासाठी मी हा अवतार धारण केला आहे.”

शिवशंकरांनी आपल्या मुलाचे नाव ‘गणेश’ असे ठेवले. कार्यारंभी त्याचे स्मरण केल्यावर ती निर्विघ्न सिद्धीस जातील, असा शंकरांनी त्या नावाला आशिर्वाद दिला. गणेश दिवसेंदिवस मोठा होत होता. बालवयातच त्याने अनेक दैत्यांचा संहार केला. विश्वकर्म्याने गणेशास पाश, अंकुश, कमल आणि परशु अशी चार आयुधे देऊन त्याला शस्त्रसज्ज केले.

गणेश दहा वर्षाचा असताना दैत्यांच्या त्रासाला कंटाळून शंकर, गणेश व पार्वतीसह मेरूपर्वत सोडून दुसरीकडे जात असता मध्येच त्याचा सामना कमलासूर दैत्याशी झाला. कमलासूर घोड्यावर बसून व गणेश मोरावर बसून युद्धकरत होते. परंतु गणेशाला कमलासुराला मारण्यात यश येईना कारण त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून नवीन कमलासूर निर्माण व्हायचा. तेव्हा गणेशाने सिद्धी-बुद्धीचे स्मरण केले व त्यांना कमलासूराच्या रक्तापासून उत्पन्न झालेले राक्षस खाऊन टाकण्याची आज्ञा केली. त्यांनीही सर्व दैत्यांना खाऊन त्यांचा फन्ना उडवला. इतक्यात गजाननाने त्रिशूळ उगारून त्या राक्षसावर फेकला. त्याबरोबर त्या राक्षसाचे दोन तुकडे झाले. नंतर विश्वकर्म्याने तेथे नगर बसवून गणेशाचे एक देवालय बांधले व ‘मयुरेश्वर’ असे त्याचे नाव ठेवले तेच आजचे मोरगाव.

पंधराव्या वर्षी गजाननाने नंदी, वीरभद्र, पुष्पवंत, कार्तिकेय अशा व इतर शिवगणांना घेऊन सिंधूदैत्याच्या गंडकीनगरीवर हल्ला केला. या युद्धात सिंधूराजाचा पराभव झाला. त्याचे दोन्ही पुत्र मारले गेले. सिंधूराजा युद्धभूमीवरून पळून गेला. सिंधूराजाचा पिता चक्रपाणीने ‘तु देवांना बंदिगृहातून मुक्त कर व गणेशास शरण जा’ असा उपदेश केला. पण पुत्रवधाचा सूड घेण्यासाठी सिंधूदैत्याने पुन्हा गणेशावर आक्रमण केले. तेव्हा गणेशाने आपला परशू सिंधूदैत्याच्या नाभीवर नेम धरून सोडला. परशूने नाभीकमलाच छेद करताच, नाभीतील वरदामृत बाहेर पडले व तो राक्षस रक्त ओकत खाली पडला आणि गतप्राण झाला. मोरावर बसून गणेशाने दैत्याचे पारिपात्य केले म्हणून ‘मयुरेश्वर’ हे नाव गणेशास प्राप्त झाले.

मोरेश्वर ह्या नावामागे प्रचलित दुसरी कथा


कश्यप ऋषींच्या दोन बायका होत्या. कद्रु आणि विनिता. कद्रुच्या मुलांनी म्हणजे सर्पांनी विनितेच्या मुलाला म्हणजे श्येन, संपत्ती व जटायू यांना बंदीत टाकले. पुढे कश्यपांच्या कृपेने विनितेला आणखीन एक मुलगा झाला. परंतु तो एका मोठ्या अंड्याच्या रूपात असतानाच, छोट्या गणेशाने ते अंडे फोडले. तेव्हा त्यातून मोर बाहेर पडला. जन्मतःच मयुराचे व गणेशाचे युद्ध झाले. अखेर विनितेने मध्यस्ती केली आणि मयुराने गणेशाचे वाहन होण्यास मान्यता दिली. परंतु देवा ‘तुझ्या नावाआधी माझे नाव उच्चारिले जावे, माझ्या नावाने तू प्रख्यात हो’ अशी अट मोराने घातली. तेव्हा गणेशाने ‘तथास्तु’ म्हणून मयुरेश हे नाव धारण केले. पुढे गणेशाने पाताळात जाऊन मोराच्या साहाय्याने विनितापुत्रांची बंदीतून मुक्तता केली.

श्री मयुरेश्वराचे मंदिर कऱ्हा नदीच्या काठी असलेले मोरगावचे मयुरेश्वराचे मंदिर म्हणजे एक गढीच म्हणायला हवी. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या भोवती पन्नास फुट उंचीची काळ्या दगडाची तटबंदी असून चार दिशेला चार मिनारासारखे स्तंभ आहेत. त्यामुळे लांबून मंदिर मशिदीसारखे दिसते. गावातून मंदिराकडे निघाले की प्रथम लागते ती दगडी, वेगळ्या बांधणीची एक दीपमाळा. दीपमाळेच्या पुढे नगारखाना आणि नगारखान्यापाशी पुढच्या दोन पायात लाडू घेतलेला उंदीर पाहायला मिळतो. मंदिराच्या पायऱ्या चढून दगडी चौथऱ्यावर पोहोचलो की, तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठा दगडी कासव नजरेत येतो. तसेच महादरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणाच्या गणपतीसमोर तोंड करून बसलेला नंदी हे या देवळाचे वैशिष्ट आहे. गणपतीसमोरील नंदी रेखीव असला तरी काहीसा अर्धवट कोरल्यावर काम तसेच राहिले आहे. पण गणपतीसमोर नंदी कसा? या आश्चर्याचे उत्तर एका आख्यायिकेत आहे ती अशी..

जवळच्याच एका शिवमंदिरात बसवण्यासाठी हा नंदी गाड्यावरून घेऊन जात होते. परंतु मोरेश्वराच्या देवळासमोर गाडा मोडला आणि नंदीराज मोरेश्वरासमोर जे बसले ते तिथुन हालेचना. शेवटी त्या कारागिरांपैकी एकाच्या स्वप्नात येऊन नंदीने सांगितले, “मला येथेच मोरेश्वरासमोर बसायचे आहे. मला बळेच दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. मी येणार नाही.” तेव्हा लोकांचा नाईलाज झाला व त्यांनी ह्या अर्धवट कोरलेल्या नंदीला मोरगावी गणपती समोर बसवले.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण तटबंदीच्या आतल्या भागात येतो. आता रंगवलेलं हे देऊळ मुळात काळ्या पाषाणातून घडवलं आहे. बिदरच्या पातशहाकडे असलेल्या गोळे या हिंदू अधिकाऱ्याने हे मंदिर बांधून घेतलं असावं असं म्हणतात. मंदिराच्या आवारात संगमरवरी फरशी आहे. मंदिराच्या सभोवती आठ कोपऱ्यात आठ गजाननाच्या म्हणजे एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नहर, धुम्रवर्ण आणि वक्रतुंडाच्या मूर्ती आहेत, त्याशिवाय ३४ परिवार मूर्तीही आहेत. मंदिराच्या आवारात शमी व मंदाराचे वृक्ष आहेत. पश्चिमेला तरटीचे झाड आहे यालाच कल्पवृक्ष म्हणतात. या झाडाखाली बसून अनुष्ठान केल्यास इच्छित फलप्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिराच्या बाजूच्या पडवीत श्रीमदयोगीद्राचार्यांचा पुतळा आहे.

मोरेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी डाव्या बाजूलाच असलेल्या नग्नभैरवाचे दर्शन घ्यावे, त्याला गूळ व नारळाचा नैवेद्य दाखवून मगच मुख्य मंदिरात प्रवेश करावा. देवळाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन लांबूनच मोरश्वराचे दर्शन घेता येते. इथे पुजाऱ्याखेरीज अन्य कोणालाही स्वहस्ते श्रींची पूजा करता येत नाही.