मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India].

निजे भूस्वानंद जडभरत भूम्या परतरे।
तुरीयास्तीरे परमसुखदेत्व निवससि ॥
मयुराया नाथ स्तवमसिच मयुरेश भगवान ।
अतस्त्वा संध्याचे शिवहरिरणी ब्रह्मजनकम ॥१॥

अर्थ
हे मोरगावच्या मयुरेशा, तू जडभरतमुनिच्या भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, कर्‍हा नदीच्या तीरावरील स्वतःच्या अत्यंत सुखदायी क्षेत्रात वास करतोस. निर्गुण, प्रणवाकृती, स्वयंभू, योगाच्या तुरिय अवस्थेत राहिल्यामुळे शिवशंकरांना ब्रह्मानंद देणाऱ्या मयुरेश्वरा, मयुर हे आसन असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. ब्रह्मदेवाने हे तुझे देवालय उभारले व रक्षणासाठी (दक्षिणेस) शंकर व (उत्तरेस) सूर्य यांना सिद्ध केले.


मयुरेश्वर मोरयाच्या मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर वरील श्लोक लिहिलेला आढळेल. श्लोकात म्हटल्याप्रमाणे मयुरेश्वराच्या या मोरगावास ‘भूस्वानंदभुवन’ असे मानले जाते. जसा विष्णूचा वैकुंठलोक, शंकराचा कैलास, तसा श्रीगणेशाचा स्वानंदलोक.

अष्टविनायकात मोरगाव हे प्रमुख मानले जाते. अष्टविनायकाची यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करावयाची असेल तर ती प्रारंभी व शेवटी मयुरेश्वराच्या दर्शनानेच केली पाहिजे. चला तर मयुरेश्वराला साष्टांग नमस्कार करून अष्टविनायकाची संपूर्ण व सचित्र माहिती मिळवूया.