बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali - Page 4

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India] Page 4.

श्रीबल्लाळेश्वराचे मंदिर व मूर्ती


मूळच्या लाकडी देवालयाचा जीर्णोद्धार करून फडणीसांनी सध्याचे पाषाणी देवालय इ.स. १७६० च्या सुमारास तयार केले. देवालयाचा सभोवार फरसबंद असून देवालयाजवळ दोन तलाव खोदलेले आहेत. त्यातील उजवीकडील तळ्याचे पाणी श्रींच्या पूजा अर्चेसाठी राखून ठेवले आहे.

मंदिर ‘श्री’कारी धाटणीचे असून पूर्वाभिमुख आहे. दक्षिण प्राची अचूक साधल्याने दक्षिणायनात सूर्योदयी सूर्य-किरण नेमके श्री बल्लाळेश्वरावरच पडतात. देवालयात दोन गाभारे असून आंतर्गाभारा विस्तृत आहे. आंतर्गाभारा सहा बर्हिकोनी व पुढील गाभारा दोन आंतरकोनी मिळून अष्टदिशा साधल्या आहेत. आंतरगाभाऱ्याचे वरचे बाजूस अष्टदिशा साधीत अष्टकोनी कमळ असून घुमटाचा आकार घेतला आहे. अंतर्गाभारा १५ फूट उंच असून बाहेरील उंदीराचा गाभारा १२ फूट उंच आहे. उंदीर आपल्या दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहात आहे.

देवालयाच्या दगडी भिंती जाड असून भिंतीच्या चिंऱ्यामध्ये शिसे ओतून भिंती अतिशय मजबूत केल्या आहेत. गाभाऱ्याच्या पुढील अंगास सुशोभित दगडी मखर व गोंड्याची झालर खोदली आहे. देवालयाचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. शिखराचे काम चुना विटांचे असून शिखरात एक खोली तयार केली आहे. पुढील भागी एक गच्ची आहे. चुना ज्या घणीच्या चाकाने मळला आहे ते चाक आजही देवालयासंनिध पाहावयास मिळते.

सभामंडप ४० फूट लांब व २० फूट रूंद असून त्याचे काम पालीतील एक सामान्य स्थितीतील गणेशभक्त कै. कृष्णाजी रिगे यांनी श्रीबल्लाळेश्वराच्या दृष्टान्ताने प्रेरित होऊन इ.स. १९१० च्या सुमारास रू १८,०००/- खर्च करून केले. सुंदर सभामंडप अष्टस्तंभी सुरूच्या खांबाचा असून कमानींनी सुशोभित व पाषाणी मंदिरास साजेसा भव्य आहे.

आतील गाभाऱ्यात दगडी सिंहासनवर ३ फूट उंचीची श्रीबल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची लुकणाची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात, बेंबीत चकचकीत हिरे असून मागील प्रभावळ चांदीची आहे. प्रभावळीवर रिद्धी-सिद्धी चवऱ्या हलवीत उभ्या आहेत. फक्त पूजेसाठी सकाळी ५ ते ११:३० वा. पर्यंत आंतर्गाभारा खुला आसतो. बाहेरील उंचराच्या गाभाऱ्यातून रात्री १० वा. पर्यंत दर्शन घेता येते. मंदिराच्या आवारात एक प्रचंड घंटा असून तो पंच धातूंची आणि मूळची युरोपात ओतलेली आहे. वसई साष्ठी येथील फिरंग्याच्या पाडाव करून चिमाजी अप्पांनी तेथील मोठमोठ्या घंटा आणल्या. त्यातली एक घंटा त्यांनी बल्लाळेश्वराला अर्पण केली. आजही आरतीच्यावेळी त्याचा सुरेख आवाज येतो.

मंदिराच्या पाठीमागे श्रीधुंडीविनायकाचे मंदिर आहे. श्रीबल्लाळेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आहे व श्रीधुंडीविनायकाची मूर्ती सहसा न आढळणारी अशी पश्चिमाभिमुख आहे. ही श्रीधुंडीविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. भाविक प्रथम धुंडी-विनायकाला अग्रमान देतात व नंतर श्रीबल्लाळेश्वराची पूजा करतात.