बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali - Page 3

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India] Page 3.

श्रीबल्लाळेश्वराच्या स्थापनेसंबंधी प्रचलित कथा


फार प्राचीन काळी म्हणजेच कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या म्हणजे पाली गावात कल्याणशेठ नावाचा एक व्यापारी होता. त्याची पत्नी इंदूमती तर मुलगा ‘बल्लाळ’. बल्लाळ लहानपणीच गणेशभक्त होऊन त्याने शेजारच्या मुलांनाही भक्तिमार्गाला लावले. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याणशेठ कडे जाऊन ‘बल्लाळाने आमच्या मुलांना बिघडवले’ अशी तक्रार करू लागले.

आधीच कल्याणशेठजींना बल्लाळ अध्ययन, व्यापार उदिमात लक्ष न घालता भक्तिमार्गाला लागला आहे याची चीड होती. त्यात लोकांच्या तक्रारीने त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. क्रोधाने बेभान झालेले कल्याणशेठ तरातरा ज्या रानात बल्लाळ सवंगड्यासह जात असे तिथे गेले आणि त्यांनी तेथे जाऊन त्याची पूजा मोडली, गणेशाची मूर्ती फेकून दिली आणि ध्यानस्थ बल्लाळाला आपल्या सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला. बेशुद्ध पडला. तरीसुद्धा कल्याणशेठना त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला तशा अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले व उपहासाने म्हणाले, “येऊ देत तुझ्या गणेशाला आता तुला सोडवायला. तुझा नी माझा संबंध कायमचा तुटला.”

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्यचे सारे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक ब्राह्मण स्वरूपात प्रगट झाला. त्याने बल्लाळाला बंधमुक्त केले. केवळ कृपादृष्टीने बल्लाळाचे शरीर पूर्ववत झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, “तुला ज्याने त्रास दिला त्याला या जन्मीच नव्हे तरपुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दिर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.”

तेव्हा बल्लाळ म्हणाला, ‘तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास. ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.’ बल्लाळाची विनंती मान्य करून श्रीगणेश एका शिळेत अंतर्धान पावले. ती शिळा म्हणजेच पालीचा नवसाला पावणारा बल्लाळेश्वर, तर कल्याण शेटजींनी भिरकावून दिलेला बल्लाळाचा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळच दुसऱ्या मंदिरात असलेला श्रीधुंडीविनायक.

श्रीबल्लाळेश्वराच्या स्थापनेसंबंधी प्रचलित दुसरी कथा


‘स्वस्ति श्री गणनायक’ या श्लोकात ‘बल्लाळं’‘मुरूड’ असा उल्लेख आहे. त्यावरून मूळ देऊळ समुद्र तीरावर असलेल्या पल्ली नावाच्या गावात असावे असे दिसते. त्यालाच हल्ली मुरूड म्हणतात. हा मुरूड गाव जंजिरा संस्थानाच्या हद्दीत आहे. तेथे सांप्रत बल्लाळ विनायकाच्या देवळाचा चौथरा दाखवतात. असे सांगतात की, मुसलमान लोक जेव्हा मुरूडच्या देवळात शिरू लागले तेव्हा हा बल्लाळ विनायक एका वैश्यांच्या तांड्यातील बैलाच्या पाठीवरील धान्याच्या गोणीत बसून पालीत गेला. ज्या बैलाच्या गोणीतून तो गेला तो बैल चालताना वारंवार वाटेत बसे. म्हणुन लमाण्याने गोण तपासून पाहिला तर त्या गोणीत त्याला एक पाषाण सापडला. तो त्याने गोणीतून बाहेर फेकून दिला, तर तो पुनः गोणीत येऊन बसे. अखेर तो पाषाण पाली गावात कायमचा स्थिरावला आणि त्या बैलाच्या पाठीवरची गोणी सोन्याची झाली. अशी एक आख्यायिका आहे.