येसूबाई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ डिसेंबर २०१७

येसूबाई | Yesubai - Marathi Book Review

शिर्षक: येसूबाई
लेखक: सुलभा कुलकर्णी
प्रकाशक: प्रोलीफिक पब्लिकेशन
पृष्ठसंख्या: ५४८
मूल्य: ₹ ५५०

ज्वलज्वलनतेजस संभाजी राजांची सखी महाराज्ञी येसूबाईच्या चरित्रावर लिहिलेली मराठी साहित्यातील येसूबाई ही नवी कादंबरी ! मराठी साहित्यशारदेला वाहिलेले एक सुगंधी पुष्प जणू ! सौ. सुलभा राजीव यांच्या सुलभ लेखणीतून उतरलेले लक्षणीय आणि भारदस्त भव्य असे महाराणी येसूबाईचे बहुत यत्नाने, सूचक सम्यक विचाराने अतिशय बारकाव्याने लिहिलेले ईश्वरप्रेरीत लेणेच म्हणावे लागेल.

लेखिकेच्या अभ्यासाला सीमा नाही, विचार शक्तीला, चिंतनाला मर्यादा नाही, व्यासंगाला प्रचंड व्याप्ती आहे. एखाद्या ऐतिहासिक पुरुषाच्या पत्नीच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे सखोल अभ्यासाशिवाय शक्य होत नाही, तरी सुद्धा वर्तमानातील इतिहास विषयावर चाललेली खळबळ या सार्‍या गोष्टी समंथासारख्या भोवताली घिरट्या घालत असताना लेखिकेने या कादंबरीत रेखाटलेल्या नानाविध घटना, व्यक्तिवैशिष्ट्ये, संवाद अर्थपूर्ण, अस्सल आणि अजोड आहेत. त्याला पुष्ट भाषेचा, मार्मिकतेचा खोटा देखावा शोधून सापडणार नाही. लेखिकेचे विचार पोक्त आहेत, बैजवार आहेत आणि शब्दांवर घट्टपणे आरुढ होणारे आहेत. वाचकांना ह्याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही.

महाराणी येसूबाईचे चरित्र हे एका सोज्वळ, सोशिक, शांत अश्या राजस्त्रीचे आहे. आजच्या घटस्फोटाच्या जमान्यात नवतरुणींना आवाहन करणारे आहे. नवतरुणींना सात्विकपणा, सोशिकता शिकवणारे आहे आणि ते लिहिले आहे कर्करोगाशी सामना करुन यशस्वी झालेल्या एका स्त्रीने. धीरोदत्तता, सोशिकता काय असते हे सिद्ध करणार्‍या स्त्री कडून. महाराणी येसूबाईंचे कादंबरी रुपाने चरित्र लिहिले जाते ही गोष्ट निश्चितच स्पृहणीय आहे. आम्हा महाराष्ट्रीयांना निश्चितपणे अभिमानाची खचित झाली आहे यात शंका नाही.

छ. संभाजी राजांची झंझावाती कारकीर्द, मातृवियोगानंतरचे त्यांचे बालपण, आजीच्या महानिर्वाणानंतर आलेले पोरकेपण आणि वडिलांच्या महानिर्वाणानंतर पडलेली संपूर्ण राज्याची जबाबदारी. मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचे सिदी या शत्रूंना सावरताना उभे राहिलेले औरंगजेबाचे महा आक्रमण.

अग्निशिखेला समोर जावे, कसा करावा जंग?
सिदी, फिरंगी इंग्रज ठाके अवाढव्य औरंग
झुंज झुंज अन्‌ झुंज दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत!

याशिवाय वतनदार, आप्तस्वकीय या विळख्यातून बाहेर पडणे कळीकाळाला आवाहन होते. तो नऊ वर्षाचा संघर्ष विलक्षण कल्पित, कथेलाही फिका पाडील इतका विलक्षणा होता की मानवी जीवनाचे एवढे उत्कट, अचाट आणि रोमांचकारी दर्शन इतिहासाने क्वचितच पाहिले असेल. संभाजी राजांची समशेर सळसळत होती, जी जळजळत होती आणि धैर्य धगधगत होते. हे करताना ‘आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हांस चालविणे अगत्य’ हे त्यांनी आपल्या छत्रपतित्वाचे सूत्र सांभाळले. ते अखेरपर्यंत जपले आणि अखेरीस वडिलांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले आणि त्यांनी श्रीमद्‌ भगवतगीतेचे तत्व सिद्ध केले. त्यानंतर मराठी मातीत महाराष्ट्र धर्माच्या मशालीने पेटला आणि औरंगजेबाला ह्या मातीत मरावे लागले.

ह्या सार्‍या गोष्टीच्या साक्षीदार आहेत येसूबाई! या सार्‍याचे चित्रण, येसूबाईंचे नंतरचे दुःखद जीवन, धीरोदात्तता आणि सोशिकता या सार्‍यांचा खोलवर आलेख लेखिकेने एत्का भावपूर्ण आणि तन्मयतेने मांडला आहे की वाचकांच्या विशेषतः स्त्री वाचकांच्या मनात कल्लोळ निर्माण होईल. संकटांना धीरोदत्तपणे सामोरे जाणे म्हणजे काय? ह्याचा वस्तूपाठ त्यांना समजेल. नवतरुणींनी ही कादंबरी वाचावी. आपल्या संग्रही बाळगावी इतकी भावपूर्ण ही साहित्यकृती आहे ह्यात शंका नाही.

लेखिकेने कोठेही पाल्हाळीक वर्णने केली नाहीत, संवादाच्या नात्याच्या माध्यमातून ही कादंबरी लेखिकेने अतिशय हळूवारपणे सादर केली आहे, म्हणून म्हणावेसे वाटते...

शांतपणे सजा भोगिली तब्बल अडीच तपे!
संयमास त्या सीमा नाही, शांत तेज तळपे!
अश्या शांतादुर्गा, मुर्तीमंत मानिनीला शतशः प्रणाम!

लेखिकेच्या ह्या कलाकृतीचे वाचक निश्चित स्वागत करतील ह्यात शंका नाही. मराठी सारस्वतात एका चांगल्या कादंबरीची भर घातल्याबद्दल लेखिकेला धन्यवाद!