ती आणि मी

लेखन डॉ. जया द्वादशीवार | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ मे २०१०

ती आणि मी - मराठी पुस्तक परिचय | Tee Ani Me - Marathi Book Review

लेखक: भंवरलाल हिरालाल जैन
प्रकाशक: अशोक केशव कोठावळे
मॅजेस्टिक प्रकाशन, ८ फिनिक्स, ४५७, एस. व्ही. पी. रोड गिरगाव, मुंबई - ४
पृष्ठसंख्या: १९८
मूल्य: ₹ २००

भंवरलालजी जैन व त्यांच्या पत्नी कांताबाई जैन यांच्या जवळपास ४५ वर्षांच्या सहजीवनाचा चढता-उतरता आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. Andre Mayruis मी एका ठिकाणी म्हटलं आहे, A happy marriage is a long conversation that always proves too short. हे सारं लेखन म्हणजे लेखकाने स्वतःशी केलेला आत्मसंवाद व ‘ मी ’ ने ‘ ती ’ चे केलेले मनोमन पूजन कांताबाईच्या निर्मल, पवित्र, परोपकारात व सहज आचरणामुळे भंवरलालजींच्या जीवनदृष्टी व जीवनआचरणावर झालेला खोलवर परिणाम याचं हे पुस्तक म्हणजे मोकळं आविष्करण आहे.

‘कांताबाई कोण होत्या,’ असं विचारणाऱ्यांनी पाहावं, कांताबाईंनी संस्कारित केलेल्या, ‘ती आणि मी’ च्या गुण्यागोविंदाने एकत्रितपणे नांदत असलेल्या चार पुत्रांकडे, सुनांकडे, नातवंडाकडे, एवढंच नव्हे तर सुखासमाधाने प्रेमाच्या अदृश्य धाग्याने बांधल्या गेलेल्या भल्यामोठ्या विस्तारित जैन कुटुंबाकडे व सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या जैन उद्योगविश्वाकडे. ‘भंवरलाल जैन कोण होते,’ अशी माझी ओळख कुणी मागितली तर त्याला उत्तर मिळावं, ‘ती आणि मी’ या भावस्पर्शी शिलालेखातून भारतीय संस्कृतीची आंतरज्योत तेवत ठेवणाऱ्या ‘ती’ला ज्यांनी अक्षर केलं, त्या कांताबाईचे ते पती होते...

आजवर प्रसिद्ध झालेया मराठी साहित्यात आपल्या सहधर्मचारिणीवर मोकळेपणे व प्रामाणिकपणे लिहिणारे चारित्रकार व आत्मचरित्रकार अभावानेच आढळतात. स्पष्टच लिहायचे झाल्यास काहींनी आवश्यक तिथेच त्यांचा उल्लेख केला. आपल्या यशस्वी आयुष्याचे श्रेय ‘ ती ’च्या पदरात टाकण्याची दानत पुरुषसत्ताक समाजातल्या लेखकांमध्येही नव्हती. कस्तुरबांचा मोठेपणा ओळखणारे गांधीजी विरळाच. याला अपवाद जळगावच्या जैन उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष भंवरलाल हिरालाल जैन. उद्योगमान्यतेसारखीच त्यांच्यातल्या वाङ्‍मयीन सर्जनशीलतेने त्यांना साहित्यक्षेत्रात आज मान्यता मिळवून दिली आहे. त्यांच्या इतर पुस्तकांत समाजबांधणी, सामाजिक प्रश्न, पाण्याचे प्रश्न वनव्या पिढीशी संवाद इ. विषयांवरचे चिंतन येते; पण सगळ्यात महत्त्वाचे ठरते ते त्यांचे आत्मचिंतनपर पुस्तक ‘ ती आणि मी ’.

भंवरलालजी जैन व त्यांच्या पत्नी कांताबाई जैन यांच्या जवळपास ४५ वर्षांच्या सहजीवनाचा चढता-उतरता आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. Andre Mayruis मी एका ठिकाणी म्हटलं आहे, A happy marriage is a long conversation that always proves too short. हे सारं लेखन म्हणजे लेखकाने स्वतःशी केलेला आत्मसंवाद व ‘ मी ’ ने ‘ ती ’ चे केलेले मनोमन पूजन कांताबाईच्या निर्मल, पवित्र, परोपकारात व सहज आचरणामुळे भंवरलालजींच्या जीवनदृष्टी व जीवनआचरणावर झालेला खोलवर परिणाम याचं हे पुस्तक म्हणजे मोकळं आविष्करण आहे. भंवरलाल जैन नेहमी म्हणतात ‘मी म्हणजे मातीतला माणूस.’ या मातीशी, धरणीशी इमान राखून तिला सुजलाम- सुफलाम बनविण्यात हयात घालविली. या धरणीमातेनेसुद्धा त्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवून केवळ ७००० रुपये बीजभांडवलावर सुरू केलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचवली. भाऊंची जोडीदारीणही अस्सल देशी मातीतलीच आहे. तिच्या सरळ साध्या देशीपणाने या जोडप्याचे सहजीवन सर्वच पातळीवर सहजसुलभ झाले.

कै. कांताबाई या सनातनी मारवाडी समाजात जन्मलेल्या पण पदवीधर शिक्षित युवती. लग्नानंतर माहेरपेक्षा टोकाचा फरक असलेल्या संयुक्त जैन कुटुंबात प्रवेश करतात. या कुटुंबाची जगण्याची पद्धत निमूटपणे स्वीकारतात व नवरा हेच दैवत मानून त्याच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी कौटुंबिक आघाडी समर्थपणे सांभाळतात. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात वडीलधारी व लहान अशा १६ व्यक्तींकडे जातीने लक्ष देतात व कुटुंबाचा एकसंधपणा कायम ठेवण्यासाठी स्वतःचे ‘ समर्पण ’ करतात. पत्नी, सून, आई, वहिनी, काकू या सगळ्या नात्यांमध्ये गुरफटलेली ही ‘ स्त्री ’ कुटुंबाच्या उत्कर्षालाच मदत करते. तिचं मन नित्य आनंदी, उत्साही, स्वागतशील व संघर्ष होण्याआधीच तो मिटावा, अशा वृत्तीचे आहे. आयुष्यातला एक क्षण भंवरलालजींवर भाळण्याचा व उरलेले सारे क्षण त्यांचे नातेवाईक, परिवार, मित्र, उद्योगजगत यातील लोकांना सांभाळण्याचे. त्यांनी जैन कुटुंबाची काळजी घेतली व धुरा वाहिली.

असे समर्पणयुक्त जगत कांताबाई कशा जगल्या व का जगल्या याचे विवेचन व त्यायोगे जीवनातल्या अनेक प्रश्नांवरचे भंवरलालजींचे चिंतन पुस्तकात येते. भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, सणवार, संस्काराचे महत्त्व, मुलांचे संगोपन व स्त्री-पुरुष संबंधांच्या अनेक पैलूंवर भाष्य त्यांनी यात केले आहे. ते नुसते आत्मचिंतन नाही, तर एक प्रामाणिक आत्मपरीक्षणदेखील आहे. व्यवसायातील धडपड, त्यासाठी करावे लागणारे अतोनात श्रम पण संयुक्त कुटुंबपद्धतीत राहण्याची इच्छा, या भूमिका त्यांनी आपल्यापुरत्या ठरवल्या होत्या. त्यात कुठेही तडजोड करण्याची त्यांची तयारी नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या भूमिका पत्नीला सांगणे व त्या तिने आनंदाने मान्य करणे ही तारेवरची कसरत संसाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांना करावी लागली. सुदैवाने सुविचारी कांताबाईनी भंवरलालजींचे प्रेयस तेज आपले श्रेयस मानले व त्यांना साथ दिली. आज मात्र भंवरलालजींच्या मनात पत्नीच्या या कृतीबद्दल प्रश्न उभे राहतात. ते म्हणतात, “ माझ्याप्रति तिचं समर्पण एकतर्फी होतं का ? तिचं समर्पण माझ्या बुद्धिचातुर्यातून तिच्या गळी उतरवलेली गुटी होती का ? तिचं समर्पण हे पुरुषप्रधान संस्कृतीचा एक आविष्कार होता का, की त्यावेळच्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचा परिपाक होता ? एका असहाय, कमजोर किंवा हतबल महिलेची ती शरणागती होती का ? व शेवटी या निष्कर्षाप्रत पोहोचतात, की तिचे निर्णय अंतरात्म्यातून आलेल्या आवाजावर आधारित असत, त्यामुळे ती ते सहज स्वीकारीत असे. त्यात कुठलाही खेद किंवा खंत नसे. कांताबाईंचा अस्सल भारतीय स्त्रीमनाचा देशी वाण याच त्यांच्या स्वभावातून उठून दिसतो. भारतीय स्त्रीमनाचा हेवा वाटावा, असे देवदुर्लभ कुटुंब भंवरलालजींना मिळाले. उद्योगाचा गोवर्धन उचलताना त्यांची करंगळी जरी सर्वशक्तिमान असली तरी त्यांचे काका, भाऊ, पुतणे व मुले यांचा आधार त्यांना मिळाला. आमदार सुरेशदादा जैन, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. दोशींसारखे जिवाला जीव देणारे स्नेही मिळाले. या सर्व आनंददायी संबंधांना बांधून ठेवणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी कांताबाईंना कुटुंब, संस्कार व नातीगोती यांचा खरा अर्थ कळला होता. ‘ गृहिणी गृहमुच्छते ’ स्त्री म्हणजेच घर हे सुभाषित त्यांना सर्वार्थाने उमगले होते.

आचार्य दादा धर्माधिकारी यांनी मांडलेल्या स्त्री-पुरुष सहजीवनाच्या कल्पनेला या जोडप्याने प्रत्यक्षात आणले. या दोहोंचे सह अस्तित्व नव्हतेच कारण भंवरलालजींनी म्हटल्याप्रमाणे एकमेकांसोबत राहण्याचा त्यांच्या आयुष्यातला कालावधी फार थोडा होता. ते दोघे जरी बरोबर जगले नाही तरी सतत बरोबर असत. त्यांचे जीवन नेहमीच परस्पराभिमुख राहिले. मन व हृदयाचा मेळ व त्यातून येणारे पती-पत्नीमधील मित्रत्व हेच सहजीवनाचे मुख्य सूत्र असते. कांताबाई व भंवरलालजींनी दादा धर्माधिकारींना अभिप्रेत सामाजिक कौटुंबिकतेची भावना आपल्या जीवनात अंगीकारली. सहजीवनाचे अधिष्ठान कौटुंबिक आत्मीयता असते व या आत्मीयतेचा आधार भावनिक संबंध असतात. ही आत्मीयता व भावनिकता स्वकुटुंबापुरती त्यांनी मर्यादित ठेवली नाही, तर कुटुंबाच्या व उद्योगाच्या संबंधात येणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या व बिनरक्ताच्या व्यक्तीपर्यंत विस्तारीत नेली. साऱ्या समाजात मान्य होणाऱ्या मूल्यांची व भावी पिढीवर होणाऱ्या संस्कारांची नर्सरी म्हणजे गृहस्थाश्रम असतो, हे मानून आयुष्यातला हा काळ त्यांनी आनंदाने घालवला. एका अर्थाने ‘ ती ’ व ‘ मी ’ मधील आत्मकथनाला जे वैश्चिक परिणाम लाभले आहे त्याचे कारण या जोडप्याची ही दृष्टी हेच ठरते.

अशाच तऱ्हेचे व. दि. कुळकर्णी लिखित ‘ सुमित्रा संवाद ’ हे पुस्तक वाचनात आले. त्यात लेखकाने पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्याशी संवाद साधून सहजीवनाचा आलेख मांडला आहे. याव्यतिरिक्त अनेक व्यक्तींनी पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या महतीचे लिहिलेले लेख पण पुष्कळदा आपण वाचले. एक प्रश्न मनात येतो, की पत्नीची किंमत पतीला ती विकलांग झाल्यावर, तिच्या मरणप्राय वेदना पाहूनच उमजते का ? जीवन जगत असताना आपल्या स्थानाचे कुटुंबातील व्यक्तीला महत्त्व न कळणे हा स्त्री जीवनाला मिळालेला शाप आहे का ?

भंवरलालजी जैन व कांताबाई हे आजच्या आधुनिक काळात कौटुंबिक मूल्ये जपणारे एकमेवद्वितीय दाम्पत्य म्हणून पुस्तकातून आपल्यासमोर येते. जीवन जगत असताना त्यांच्या आयुष्यात आलेले सुखाचे, दुःखाचे, वैतागाचे, प्रेमाचे सौहार्दाचे, आपुलकीचे कृतज्ञतेचे व कृतघ्नतेचे छोटे-मोठे कालखंड यांचे वर्णन व त्या प्रत्येक प्रसंगात कांताबाईचे धीराचे, समंजसपणाचे, सहनशीलतेचे, औदार्याचे वर्तन लेखकाने अतिशय आत्मीयतेने चितारले आहेत. भंवरलालजी जैन यांच्या कर्तृत्वासाठी आवश्यक असलेलं स्थैर्य, दिलासा, प्रेमाची जपणूक व मनःशांती, त्यांना ‘ ती ’ च्यामुळे मिळू शकली व कांताबाईसारख्या मनस्वी स्त्रीला एकत्र कुटुंब व त्यातून येणारे ताण-तणाव सहन करण्याचे व आनंदी राहण्याचे धैर्य ‘ मी ’ वरच्या विश्वासामुळे व भरभक्कम पाठिंब्यामुळेच मिळू शकले. संसाराच्या सारिपटावरच हे सुंदर चित्रण भावी जोडप्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. दोघेही स्वंत्रपणे पण एकत्र जगले व देशाबाबत व कुटुंबाबतच्या कर्तव्याचं पालन करीत राहिले.

अशा या आत्मचिंतनपर व उद्बोधक पुस्तकाला अतिशय अर्थगर्भ असे मुखपृष्ठ लाभले आहे. त्यातही ‘ ती ’ आधी येते व मग ‘ मी ’ पुस्तक वाचल्यानंतर मनात घुमत राहतो तो पुस्तकाचा शेवटचा परिच्छेद ज्यात स्वतःची ओळख देताना लेखक म्हणतो, “ ती आणि मी भावस्पर्शी शिलालेखातून भारतीय संस्कृतीची आंतरज्योत तेवत ठेवणाऱ्या ‘ ती ’ ला ज्यांनी अक्षर केलेल त्या कांताबाईचे भंवरलाल जैन हे पती होते.