सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ डिसेंबर २०१७

सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण | Mahamanav Sardar Patel - Marathi Book Review

शिर्षक: महामानव सरदार पटेल
लेखक: दिनकर जोषी
अनुवाद: सुषमा शाळिग्राम
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या: ३३६
मूल्य: ₹ ३६०

गुजराती भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे.

४२व्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील १९४५ - १९५० हा कालखंड संघर्षमय होता. या संघर्षमय कालखंडाचं या कादंबरीत प्राधान्याने चित्रण करण्यात आलं आहे. सुरुवातीला महात्मा गांधींच्या राजकीय नीतीला नावं ठेवणारे सरदार नंतर गांधीजींच्याच प्रभावाने राजकारणात आले. बारडोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभार्इंना ‘सरदार’ अशी ओळख मिळवून दिली. गांधी आणि सरदार यांच्यातील नातं गुरू - शिष्याचं होतं. काही वेळेला सहमत नसतानाही वल्लभभार्इंनी गांधींचे निर्णय शिरोधार्ह मानले. ‘खिलाफत’ चळवळीला वल्लभभार्इंचा विरोध असतानाही त्या चळवळीचं समर्थन करणाऱ्या गांधीजींच्या बाजूने ते उभे राहिले.

१९४६ मध्ये दोन महत्त्वाच्या घटना वल्लभभार्इंच्या जीवनात घडल्या. याच वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसच्या पंधरा समित्यांपैकी बारा समित्यांनी अध्यक्ष म्हणून पटेलांचं नाव सुचवलं होतं; तोच अध्यक्ष पंतप्रधान होणार, हे नक्की होतं; पण गांधींनी जवाहरलाल नेहरूंचं नाव सुचवल्यामुळे वल्लभभार्इंनी पंतप्रधान पद नाकारलं. केवळ पटेलांच्या राजकीय जीवनालाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही कलाटणी देणारी ही घटना होती. याच वर्षी घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय नौदलातील हिंदी सैनिकांनी ब्रिटिशांनी चालवलेल्या वर्णद्वेषामुळे बंडाचे निशाण उभारले. हातात बंदुका घेतल्या आणि तोफांची तोंडं फिरवली; पण वल्लभभार्इंनी त्यांची समजूत घालून ते बंड शमवलं. वल्लभभार्इंचं हे कामही फार महत्त्वाबचं आहे; कारण हे बंड जर शमवलं गेलं नसतं तर हातातोंडाशी आलेल्या स्वातंत्र्यप्राप्तीत अडसर निर्माण झाला असता.

मुस्लीम लीगने गृहमंत्रीपद मागितलं होतं; पण पंतप्रधानपदावर पाणी सोडलेल्या वल्लभभार्इंनी गृहमंत्रीपद सोडण्यास मात्र ठाम नकार दिला. त्यांचा हाही निर्णय नंतर झालेल्या फाळणीच्या पाश्वभूमीवर अतिशय विधायक ठरला. वल्लभभार्इंची आणखी एक कामगिरी देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली, ती म्हणजे संस्थानांचं विलीनीकरण. हे कार्य जर वल्लभभार्इंनी केलं नसतं तर भारताचं शेकडो विभागांमध्ये विभाजन झालं असतं.

वल्लभभार्इंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल यांची नेताजी सुभाषचंद्रांशी वैचारिक जवळीक होती. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी सुभाषबाबूंसाठी सव्वालाख रुपयांची तरतूद केली होती; पण विठ्ठलभार्इंच्या निधनानंतर वल्लभभार्इंनी या संदर्भात कोर्टात केस दाखल केली आणि विठ्ठलभार्इंच्या नावे एक ट्रस्ट स्थापन करून ते पैसे काँग्रेस समितीला देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. वल्लभभाई ही केस जिंकले; पण त्यांच्यात आणि सुभाषबाबूंमध्ये वितुष्ट आलं. काँग्रेस समितीचे इतर सदस्यही सुभाषबाबूंच्या विरोधात होते. त्यामुळे सुभाषबाबू काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर वल्लभभार्इंसह सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात असहकार पुकारला. त्यामुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

१९३९ मध्ये ब्रिटनने भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील करून घेतलं. काँग्रेसला हे अमान्य असल्यामुळे एकूण काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. अर्थात वल्लभभार्इंना राजीनामा द्यावा लागला तरी राजीनाम्याच्या आदेशपत्राशी ते सहमत नव्हते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृहखात्याची जबाबदारी सांभाळत असताना चीनविषयी धोक्याचा इशारा त्यांनी जवाहरलाल नेहरूंना दिला होता; पण नेहरूंनी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही.

थोडक्यात, समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही, अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दुराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडविण्यापासून वंचित राहावं लागलं.

एकूणच, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे ठरले आणि भविष्याच्या दृष्टीनेही लाभकारक ठरले. उदा. नौदलाच्या सैनिकांचे शमवलेले बंड, संस्थानांचे विलीनीकरण, गृहमंत्रीपदावरून न हटण्याचा निश्चय इ. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर ४१ वर्षांनी त्यांना ‘भारतरत्न’ देऊन घेतली. उशिरा का होईना त्यांच्या कार्याचं स्मरण भारत सरकारला झालं म्हणून आनंद मानायचा, की त्यांच्या कार्याचं महत्त्व इतक्या उशिरा आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आल्याबद्दल खेद मानायचा, हा प्रश्नच आहे.

तर सरदारांच्या जीवनाला रूढार्थाने न भिडता, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्याने चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चरित्राला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यांनाही वल्लभभाई पटेलांच्या चरित्राच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भ माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्यादृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला अनुवाद उत्तम.