गुलजार यांच्या पटकथा मराठीत - एक अपूर्व योग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ नोव्हेंबर २०१७

गुलजार यांच्या पटकथा मराठीत - एक अपूर्व योग | Gulzar Patkatha - Marathi Book Review

शिर्षक: गुलजार पटकथा
लेखक: गुलजार
अनुवाद: वसंत केशव पाटील, सविता दामले, अंबरीश मिश्र
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या: १३१२
मूल्य:१४९५

गुलजारांनी १९७१ साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॉलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला. गुलजारांच्या लेखनीतून १९ पटकथा अवतरल्या, ज्यांना पडद्याचा दृश्यरुपी आयामही स्वतः गुलजारांनीच दिला. या कथांमध्ये निव्वळ रुपेरी पडद्यावरचं नाट्य नव्हतं, तर त्यात प्रगल्भ साहित्यमुल्य होतं. म्हणूनच या कथा रसिकवाचकांना परकायाप्रवेशाचा परम आनंद देऊ शकतात. ‘पटकथा’ हा शब्द आपण चित्रपटाच्या संदर्भात ऐकत आलो आहोत; पण पटकथा आपण लिखित स्वरूपात अनुभवलेली नाही. हा अपूर्व योग मेहता पब्लिशिंग हाऊसनं ‘गुलजार पटकथा’ या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी वाचकांसाठी जुळवून आणला आहे. पटकथा वाचकांच्या भेटीला आणण्याचा प्रकाशन विश्वातील हा कदाचित पहिला प्रयत्न असावा.

गुलजार ...एक अतिशय संवेदनशील पटकथाकार, कवी, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक. म्हणजे गुलजार यांच्या या प्रत्येक भूमिकेमागे संवेदनशील हे विशेषण अत्यंत चपखल बसतं. बॉक्स ऑफिसच्या गणितांचा विचार न करता, आपल्या प्रतिभेशी कुठेही तडजोड न करता पटकथा लिहिणं या वैशिष्ट्यामुळे गुलजार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्वतंत्र आणि अढळ असं स्थान प्राप्त केलं. (कवी, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही त्यांचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्याही बाबतीत त्यांचं स्थान स्वतंत्र आणि अढळ आहेच.) वरवर साध्या वाटणाऱ्या, पण मानवी मनाला आणि जीवनाला आरपार भिडणाऱ्या या पटकथा आहेत. पडद्यावर आपण त्या अनुभवल्या आहेत; पण आता लिखित स्वरूपात त्या अनुभवताना आपण परत एकदा गुलजार यांच्या तरल भावविश्वात सहभागी होणार आहोत. त्या कथांतील वातावरणाशी, व्यक्तिरेखांशी एकरूप होणार आहोत.

गुलजार यांनी स्वत: त्यांच्या पटकथांचं दिग्दर्शन केल्यामुळे (काही अपवाद वगळता) त्या पटकथांतील संवेद्यता, तरलता ते पडद्यावरही अबाधित ठेवू शकले. किंबहुना, पटकथा लिहिताना हे दृश्य आपण पडद्यावर कसं चित्रित करणार आहोत, याचा विचार त्यांच्या मनाशी पक्का असावा, असं म्हणायला वाव आहे; कारण त्यांच्या चित्रपटांच्या प्रत्येक ‘फ्रेम’मधून हे जाणवत राहतं.

गुलजार यांनी त्यांच्या पटकथांमधून विविध विषय हाताळले आहेत. शरदचंद्र यांच्या ‘पंडित मोशाय’ या कादंबरीवर आधारित ‘खुशबू’ ही एक आगळीवेगळी प्रेमकहाणी आहे. एका खेडेगावातील डॉक्टर वृंदावन आणि त्याच गावातील तरुणी कुसुम यांची. वृंदावनच्या दारातून कुसुमची डोली परत आली आहे. त्यानंतर कारणवश वृंदावनला एका दुसऱ्या मुलीशी लग्न करावं लागतं. त्यांना एक मुलगाही होतो...चरण. कुसुम मात्र मनोमन वृंदावनला आपला पती मानत असते. वृंदावनच्या बायकोचा मृत्यू होतो आणि कुसुम चरणला आईच्या मायेने सांभाळायला लागते; मात्र वृंदावनने सन्मानाने आपल्याला स्वत:च्या जीवनात प्रवेश द्यावा, हा तिचा हट्ट असतो. कुसुमच्या स्वाभिमानाची आणि वृंदावनच्या संयमाची ही कहाणी ग्रामीण पाश्र्वभूमीवर घडणारी. ही पटकथा वाचणं, हा एक आनंदानुभव ठरावा.

‘मासूम’ मधून डी. के. आणि इंदू यांच्या वैवाहिक जीवनात उठलेलं वादळ व्यामिश्रतेने चित्रित केलं आहे. डी.केच्या पूर्वायुष्यातील प्रेमाचं प्रतीक राहुल अचानक त्यांच्या जीवनात येतो. राहुलबद्दलचं डी.के.चं वात्सल्य, इंदूचे आणि त्याचे ताणले गेलेले संबंध, राहुलचं भावविश्व, डी. के.च्या मुली आणि राहुल यांच्यातील निरागस प्रेम या सगळ्याचं उत्कट आणि व्यामिश्र दर्शन घडविणारी ही पटकथा आहे.

सुधा, महेंद्र आणि माया यांच्या प्रेमाचा त्रिकोण हा ‘इजा़जत’चा विषय. अत्यंत तरल आणि अस्वस्थ करणारा. महेंद्र आणि माया यांच्यातील प्रेम विवाहात परिणत होण्याआधीच महेंद्रला आजोबांच्या सांगण्यावरून सुधाशी लग्न करावं लागतं. महेंद्र सुधाला मायाबाबतची वस्तुस्थिती सांगतो. तरीही सुधा त्याच्याशी लग्न करते. तिच्याशी जुळवून घ्यायला महेंद्रला वेळही देते; महेंद्रही सुधाला आपलं म्हणायचा प्रयत्न करत असतो; पण माया स्वत:ला महेंद्रपासून दूर ठेवू शकत नसते. अर्थात त्यात फक्त निखळ प्रेम असतं. सुधाविषयी कटू भावना नसते. सुधा समजूतदारपणे महेंद्रच्या जीवनातून निघून जाते. सुधा, महेंद्र आणि माया या तीनही व्यक्तिरेखा मनाला भावणाऱ्या आणि या पटकथेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या आहेत.

‘किनारा’ ही कथा आहे इंद्र आणि आरतीची. भूतकाळाला उराशी कवटाळून बसलेल्या आरतीला इंद्र कसा वर्तमानात आणतो, त्याची ही हृद्य कहाणी. तर ‘लेकिन’मध्ये समीरला रेवाच्या निमित्ताने आलेल्या अमानवी अनुभवांचं चित्रण आहे. निम्की, मिठ्ठू आणि चिंकी या तीन बहिणी, त्यांची आई जुगनी यांच्या भावविश्वाला असुरक्षिततेची, वेदनेची झालर आहे. त्यांच्या या भावविश्वात गेरुलाल या तरुण ट्रक ड्रायव्हरचा प्रवेश होतो आणि त्यांच्या जीवनात, घरात त्याच्या रूपाने चैतन्य येतं. या तीन बहिणी, त्यांची आई आणि गेरूलाल यांचं भावविश्व व्यामिश्रतेने साकारलंय ‘नमकीन’मधून.

पन्नास वर्षांत राजकारण्यांचा बदलत गेलेला चेहरा आणि तरुणाईला त्याचे भोगावे लागणारे परिणाम, हा विषय आहे ‘हुतूतू’च्या पटकथेचा. ‘लिबास’ या पटकथेवर यांनी चित्रपट निर्माण केला गेला; पण तो प्रदर्शित झाला नाही. सीमा आणि सुधीर या दांपत्याचं जीवन व्यामिश्रतेने समोर आणणारी ही कथा आहे. लिबासमध्ये विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी नातेसंबंधांची घालमेल दिसते.

पंजाबमधील तरुणांच्या ऐंशीच्या दशकातील धगधगत्या जीवनावर भाष्य करणारी पटकथा आहे ‘माचिस’.

‘मीरा’ ही पटकथा संत मीरेच्या जीवनावरची; पण गुलजार यांच्या व्यक्तिरेखाटनाच्या कौशल्यासह साकारलेली. तर ‘अंगूर’ची पटकथा दोन जुळ्यांमुळे उडालेल्या गोंधळाची. ‘न्यू देहली टाइम्स’ ची पटकथा एकूणच वृत्तपत्राचं आणि त्याच्याशी निगडित लोकांचं विश्व बहुआयामित्वाने साकारणारी आहे.

‘मेरे अपने’मध्ये हिंसाचाराकडे वळलले बेकार तरुण आणि त्यांना माणूस बनवू पाहणारी आनंदीआत्या यांची कथा आहे. ‘परिचय’ची पटकथा आहे रमाची. रमाच्या मनात तिच्या आजोबांबद्दल अढी असते; त्यामुळे तिने आणि तिच्या भावंडांनी आजोबांशी असहकार पुकारलेला असतो; पण रवीचा त्यांच्या जीवनात प्रवेश होतो आणि तो नातवंडं व आजोबा यांच्यातील दुरावा दूर करतो. हरीचरण आणि आरती या मूकबधिर दांपत्याची कहाणी ‘कोशिश’मधून साकारली आहे आणि ती हृद्य आहे.

तर असा आहे गुलजारांच्या पटकथांचा हा मनोरंजक आणि अंतर्मनाला आवाहन करणारा प्रवास. या सहा पुस्तकांमध्ये एकुण एकोणीस पटकथांचा समावेश आहे. या पटकथांबरोबरच गुलजार यांची दीर्घ मुलाखत, त्या त्या चित्रपटाच्या पटकथेविषयी त्यांनी केलेलं भाष्य, त्या चित्रपट चित्रीकरणाच्या प्रसंगीची छायाचित्रंही या पुस्तकांमध्ये समाविष्ट केली आहेत. अंबरीश मिश्र, सविता दामले आणि वसंत केशव पाटील यांनी या पटकथांचा अनुवाद केला आहे. परिस्थती आणि व्यक्तिरेखा यांचं अत्यंत संयत चित्रण करणाऱ्या या पटकथा आस्वाद आणि अभ्यास दोन्हीसाठी आवर्जून वाचाव्या अशा आहेत.