लहान मुलांचे निरागस भावविश्व - बगळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ नोव्हेंबर २०१६

लहान मुलांचे निरागस भावविश्व - बगळा | Bagala - Marathi Book Review

लेखक: प्रसाद कुमठेकर
प्रकाशक: पार पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या: -
मूल्य: ₹ ३००

शिवाजी लोटण पाटील यांनी बगळा [Bagala] या कादंबरीचे केलेले हे रसग्रहण.

अनुभव पुष्कळदा लेखकाला एका वेगळ्या मर्यादेत बांधून ठेवत असतात, पण मर्यादेच्या बाहेर जाऊन शब्दांच्या आणि भाषेच्या बंधनांना झुगारून काही लेखक एक वेगळी उंची गाठतात, त्याचेच हे एक उत्तम उदाहरण.

कधी कधी काही गोष्टी आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातात, कधी ते विश्व आपण अनुभवलेलं असतं तर कधी अनुभव न घेताही ते आपल्याला आपलसं वाटतं. प्रसाद कुमठेकरांची ‘बगळा’ ही कादंबरीही अशीच आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. यातील बऱ्याच प्रसंगातून एक तर आपण गेलेलो असु व जाणार असू पण ही कादंबरी म्हणजे प्रत्येकाच्या जीवनपटाचा सारांश रूपातील इतिहास अथवा भविष्यकाळच म्हणावी लागेल आणि त्याची मांडणीही एका वेगळ्या धाटणीने केलेली. अप्रतिम.

अनुभव पुष्कळदा लेखकाला एका वेगळ्या मर्यादेत बांधून ठेवत असतात, पण मर्यादेच्या बाहेर जाऊन शब्दांच्या आणि भाषेच्या बंधनांना झुगारून काही लेखक एक वेगळी उंची गाठतात, त्याचेच हे एक उत्तम उदाहरण. कादंबरीची सुरवात केल्यावर आपणाला बालपणाच्या विश्वात घेऊन जाणारी ही कादंबरी हळुहळू आपल्याला प्रौढपणाच्या मानसिकतेत नेऊन अनेक गोष्टीबद्दल विचार करायला भाग पाडते. नकळत हे घडतं.

लहानग्यांचेही एक आगळंवेगळं विश्व असतं, त्यांच्याही मानसिकतेत होणारे बदल हे पुष्कळदा आजूबाजूच्या परिस्थितीवर, सहवासावर, संस्कारावर अवलंबून असतात, याची जाण आपल्याला कादंबरी वाचताना होते. गोड स्वभाव, जन्मजात अंगीकृत असलेली एकाग्रता, एखाद्या गोष्टीबद्दल उत्कंठा, प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता ... एक नाही तर अशा अनेक सुप्त गुणांनी सजलेला लहानगा चिंत्या आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो. ज्या आजच्या युगात आपण विसरत चाललेलो आहोत. आपल्या प्रत्येकात बोबड्या, संत्या, संज्या, केशा ई. लपलेले आहेत, अथवा यांच्यासोबत आपण आपल्या बालपणीचे सुवर्ण क्षण जगलेलो आहोत, बोबड्या सारखा फिलॉसॉफर गाईड आपल्याला लहानपणी लाभलेला असतोच. केशा सारखा आपल्या जीवनपटात न बसणारा मित्र अचानकपणे आयुष्यात येतो आणि समाजजीवनाचं वेगळ चित्र आपल्या समोर मांडून जातो. कधी ते आपल्याला कळतं कधी ते आपल्या नकळत घडतं. आणि शेवटी करड्खेलकर गुरुजींसारखा मुलांच्या मनाचं योग्य निरीक्षण करून निर्णय घेणारा शिक्षक मनाला चटक लावून जातो.

प्रत्येक माणसामध्ये काही अटळ स्वभावधर्म असतात. बऱ्याचदा त्यामुळे आपणाला अनेकांचा रोष ही प्राप्त होतो पण म्हणतात न स्वभावाला औषध नसतं. लेखकांनी स्वभावधर्माला मध्यस्थानी ठेवून कादंबरीचा नायक असलेल्या छोट्या चिंत्याच्या मार्फत आपल्या समाजरचनेचं, समाजाच्या स्वभावधर्माचं एक वेगळं चित्रण वेगळ्या स्वरुपात मांडलेलं आहे, त्याला तोड नाही. आई, वडील, बहिण, काका, मित्र, शिक्षक, समाज इत्यादींच्या सहवासातून आपल्या बालपणीची जडणघडण होत असते, त्यातूनच उद्याचा युवक तयार होत असतो. म्हणून बालमनावर होणारे संस्कार हे अत्यंत महत्वाचे असतात. पण ते करताना त्या बालमनाचं भावविश्व ओळखणं फार गरजेच असतं आणि ते किती नाजूक असतं हयाचं योग्य चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. बऱ्याच काळानंतर अशी कादंबरी वाचनात आली. बालमनाचा खोल अभ्यास करून लिहिलेली आणि त्याच्याशी जोडलेले इतर घटक जसे की शाळा, घर, गाव ह्या खूप महत्वपूर्ण गोष्टींचा योग्य अभ्यास आणि संशोधन करून योग्य मांडणीत असलेली प्रसाद कुमठेकरांची ‘बगळा’ ही कादंबरी आपल्या मनाला वेगळ्या विश्वात घेऊन मनाला चटक लावल्या शिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते.

तसेच मला वेगळी नोंद करावीशी वाटते ती लेखनातल्या वेगळ्या मांडणीची. भावविश्वाचा प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या दृष्टीक्षेपातून तो मांडलेला आहे त्या मांडणीचं कौतुक कारावसं वाटतं. अशी ही वेगळ्या भाषेची, वेगळ्या धाटणीची, बालमनापासून स्वतःला प्रौढ समजणाऱ्या प्रगत मनाची घालमेल दर्शवणारी अप्रतिम कलाकृती ‘बगळा’ आतापर्यंतच्या कादंबरी विश्वात आपला वेगळा ठसा, आपला महत्वाचा टप्पा ठरेल यात शंका नाही, त्यासाठी माझ्या लेखक मित्रास शुभेच्छा.