नकारात्मक इतिहास रचणाऱ्या नेत्याचं वादळी चरित्र

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ डिसेंबर २०१७

नकारात्मक इतिहास रचणाऱ्या नेत्याचं वादळी चरित्र | Adolf Hitler The Great Dictator - Marathi Book Review

शिर्षक: अ‍ॅडॉल्फ हिटलर : द ग्रेट डिक्टेटर
लेखक: अतुल कहाते
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या: ३६८
मूल्य: ₹ ३९५

अ‍ॅडॉल्फ हिटलर या ऐतिहासिक व्यक्तीबाबतचं कुतूहल सर्वसामान्य माणसापासून अभ्यासक, लेखकांना अद्यापही आहे; कारण दुसरं महायुद्ध त्याच्यामुळे सुरू झालं होतं. त्याची जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्याने ज्यू लोकांचं केलेलं शिरकाण या दोन गोष्टींमुळे तो जागतिक स्तरावर चर्चेत राहिला आणि त्याने केलेल्या आत्महत्येमुळे त्याच्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालं. तर अशा या अत्यंत व्यामिश्र अशा ऐतिहासिक व्यक्तीची व्यक्तिरेखा अतुल कहाते यांनी ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर : द ग्रेट डिक्टेटर’ या चरित्रातून साकारली आहे.

एक राजकीय नेता म्हणून हिटलरची जडणघडण कशी झाली इथपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास या चरित्रातून शब्दबद्ध केला आहे. जर्मनीत अंदाधुंदी माजलेली असताना हिटलरने चॅन्सेलर पदासाठी अर्ज केला आणि एका रात्रीत तो चॅन्सेलर झाला. त्याआधी त्याने उठाव करून जर्मनीची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही; मात्र या उठावामुळे त्याच्या बाजूने जनमत तयार झालं. या उठावानंतर त्याने ‘माईन काम्फ’ हे त्याचं आत्मचरित्र लिहिलं.

चॅन्सेलर होताच त्याची वाटचाल हुकुमशाहीकडे होत गेली आणि हुकूमशहा म्हणून तो ओळखला जाऊ लागला. हिटलरच्या काळातही जर्मनीमध्ये अंतर्गत खळबळ चालूच होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय चालीही तो खेळत होता. ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, पोलंड, पॅरिस या देशांवर वर्चस्व मिळवून पूर्वेकडील देशांकडेही हिटलरने नजर वळवली. रशियावर आक्रमण करून त्याने बहुसंख्य रशियन सैनिकांना ठार मारलं, काही रशियन सैनिकांना कैदेत टाकून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. रशियन नागरिकही त्याच्या तावडीतून सुटले नाहीत; मात्र येवढं होऊनही रशियावर त्याला पूर्ण कब्जा मिळवता आला नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि त्यानंतर रशियनांनी जर्मनीचं आक्रमण परतवून लावलं आणि इथूनच हिटलरच्या कारकिर्दीला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक पराभव पचवावे लागले.

जर्मनीतही काही लोक त्याच्या विरोधात होते. त्यांनी हिटलरला ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. त्याच्याच लष्करातील एक अधिकारी स्टॅफेनबर्गने त्याला संपवण्याचा कट रचला होता; पण तोही यशस्वी झाला नाही. एकूणच वातावरण हिटलरच्या विरोधात होत गेलं आणि आपला घात झाल्याची भावना त्याच्या मनामध्ये बळावत गेली आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा जवळचा सहकारी गोबेल्सने आपल्या सहा मुलांना संपवलं आणि आपल्या पत्नीसह आत्महत्या केली.

गोबेल्स आणि हिमलर या हिटलरच्या जवळच्या सहकाऱ्याबद्दलही या पुस्तकातून माहिती मिळते. गेली ही हिटलरची सावत्र भाची. तिच्याबरोबरच्या हिटलरच्या प्रेमसंबंधांबाबतही या पुस्तकात लिहिलं आहे. गेलीने आत्महत्या केली. हिटलरला सुंदर स्त्रियांच्या सहवासात राहायला आवडायचे; मात्र त्याचे लैंगिक वर्तनही विकृत असावे, असा अंदाज बांधता येतो.

ज्यूंच्या छळछावण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी हिटलरने एस. ए आणि एस. एस या संघटना स्थापन केल्या. या संघटनेतील अधिकाऱ्यानी ज्यूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यापैकी एस. ए ही संघटना नंतर हिटलरनेच संपुष्टात आणली. एस. एस संघटना मात्र त्याच्या मृत्यूपर्यंत अस्तित्वात होती. हिटलरच्या मृत्यूनंतर या संघटनेच्या काही अधिकाऱ्यानी आत्महत्या केली तर काहींवर खटले दाखल होऊन त्यांना फासावर लटकवलं गेलं. तर काहींना तुरुंगवासाची शिक्षा झाली.

हिटलरच्या मृत्यूमुळे जर्मनीवर आणि जगभर त्याचे काय परिणाम झाले, याचंही वर्णन या पुस्तकात केलं आहे. तर एका मानसिकदृष्ट्या असंतुलित व्यक्तीमुळे केवळ त्याच्या देशातीलच नव्हे तर जागतिक राजकीय वातावरण नकारात्मकरीत्या कसं ढवळून निघतं, याचं अ‍ॅडॉल्फ हिटलर हे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे आणि क्रूरतेचे परिणाम ज्यूंना तर भोगावे लागलेच; पण इतर देशांतील नागरिकांनाही भोगावे लागले. त्याच्या स्वभावाच्या नकारात्मक पैलूंना ‘लीडरशिप’ असं नाव देण्याची घोडचूक जर्मनीतील नागरिकांनी केली आणि जर्मनीबरोबरच जागतिक विनाशालाही आमंत्रण दिलं. कोणतीही विधायक गोष्ट न करता जागतिक विध्वंसाला कारणीभूत ठरलेल्या हिटलरला आत्महत्या करावी लागली आणि त्याच्या सहकाऱ्याचीही तीच गत झाली.

साध्या-सरळ निवेदनातून हे पुस्तक पुढे सरकत राहतं. त्यामुळे ते कुठेही कंटाळवाणं होत नाही. हिटलरचं व्यक्तिमत्त्वं तर यातून उलगडतंच, पण तत्कालीन राजकारणाची, विशेषत: दुसऱ्या महायुद्धकालीन परिस्थितीची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकातून मिळते. एकूणच, आवश्यक ते संदर्भ गोळा करून अतुले कहाते यांनी सिद्ध केलेलं ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर : द डिक्टेटर’ हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे आणि सर्वसामान्यांनाही भुरळ घालेल असं आहे. यातील छायाचित्रं आणि शेवटी दिलेली संदर्भ ग्रंथांची यादी या पुस्तकाचं संदर्भमूल्य वाढविते.