विहंगावलोकन

लेखन बी.अरुणाचलम | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

मरीन ड्राइव्ह, मुंबई

अर्थव्यवस्था

शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. बुद्धिमत्ता व योजकता यांच्या सहाय्याने बेताच्या जाडीचा मृदेचा थर आणि पावसाची अनिश्चितता यासारख्या संकटावर मिळवलेला विजय या शब्दातच महाराष्ट्रातील शेतीच्या यशाचे यर्थार्थ वर्णन करता येईल.

देशावरच्या शेतीमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये आढळतात ती अशी : धरपाण्याची कोरडवाहू शेती, दुर्मिळतेमुळे पाण्याचा मोजका व काळजीपूर्वक वापर, अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापूस यांची मिश्रशेती, तांदूळ आणि गहू यांचे अल्प प्रमाण, नगदी पिकांवर भर आणि ऋतुमानानुसार आढळणारे बदल.

खूप पाऊस पडूनही कोकण भाग मात्र बव्हंशी एकपिकी राहिला असून तेथे तांदूळ हे मुख्य पीक आहे. जमीन सपाट नसल्याने उतारावर बांध घालून प्रथम लागवडयोग्य सपाट जमीन निर्माण करणे आवश्यक ठरते. तांदळाच्या जोडीला किनारी भागात नारळ, थोडेसे आतल्या बाजूला सुपारी व वरकस उतारावर आंबे, काजू यांची बागायत आढळते. उत्तर भागात मात्र मुंबईच्या बाजारपेठेचा विशेष प्रभाव जाणवतो. वाहतूक व्यवस्था सोयीस्कर असल्याचा फायदा उठवून शेतकऱ्यांनी शेतीव्यवसायाचा कायापालट घडवून आणला आहे. तलावापासून जलसिंचन उपलब्ध होणारा वैनगंगा नदीच्या खोऱ्याचा भाग दुपीक असून लागवडाखालील सुमारे ४०% भागात रब्बी पीक काढले जाते.

साखरधंद्यात संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने सहकारी तत्वावर अनेक साखर कारखाने उभारून पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची भरभराट केली आहे.

कापसातील सरकी काढणे. धान्य व डाळी दळून त्यांचे पीठ तयार करणे आणि घाण्यांच्या मदतीने तेलबियांपासून तेल करणे यासारखे छोटे उद्योग सोडले तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उद्योगधंदे नाहीत असे म्हटल्यास वावगे होणार नाही. साखरधंद्यात संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने सहकारी तत्वावर अनेक साखर कारखाने उभारून पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची भरभराट केली आहे. ही कारखानदारी सोडल्यास मात्र औद्योगीकरण मोठ्या शहरातच केंद्रित झाल्याने आढळते. औद्योगिक उत्पादन, त्याचे मूल्य व त्यात गुंतलेले लोक यात एकट्या महामुंबईचा वाटाच जवळजवळ ४०% इतका मोठा आहे. यंत्रौत्पादने, रसायने, औषधे आणि रोजच्या व्यवहारातील उपभोग्य वस्तू यांचा औद्योगिक उत्पादनात महत्वाचा वाटा आहे. राज्य उद्योगधंद्याच्या द्रुष्टीने प्रगतिपथावर असले तरी त्यातील जवळजवळ निम्मे जिल्हे औद्योगिक दृष्ट्या मागासलेले आहेत हे कटू सत्य आहे.

एकंदरीत महाराष्ट्र राज्य आर्थिक दृष्ट्या प्रगत व गतिशील आहे. १९८० च्या किंमती विचारात घेता राज्याचे दर डोई उत्पन्न २००० रु. आहे. एकंदर राष्ट्राच्या दर डोई उत्पान्नाच्या (१३०० रु.) मानाने ते खूपच अधिक आहे. आर्थिक दृष्ट्या राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा