विहंगावलोकन

लेखन बी.अरुणाचलम | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

चर्चगेट स्थानक, मुंबई

साधनसंपत्ती

राज्याचे जेमतेम १७% क्षेत्र जंगले म्हणून वर्ग करता येते. पठाराचा बहुतेक अंतर्भाग विरळ, खुरट्या काटेरी झुडपांनी आच्छादिलेला आहे. जर इतिहासकाळात महाराष्ट्राची गणना `महा-कांतार’ म्हणून करण्यात आली असेल तर आज जंगलांच्या बाबतीत बरीच पीछेहाट झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

मात्र मृदानिर्मितीवर हवामानाचा प्रभावदेखील जाणवतो. बेसॉल्ट हा बहुतेक भागात तळ खडक असल्यामुळे कोरड्या पठारावर काळी माती अथवा रेगूर प्रामुख्याने आढळते.

महाराष्ट्रातील मृदा बहुतेक भागात स्थानिक खडकांपासून तयार झालेल्या आहेत. मात्र मृदानिर्मितीवर हवामानाचा प्रभावदेखील जाणवतो. बेसॉल्ट हा बहुतेक भागात तळ खडक असल्यामुळे कोरड्या पठारावर काळी माती अथवा रेगूर प्रामुख्याने आढळते. तिचा पोत बारीक असून त्यात लोहाचे प्रमाण बरेच आढळते. मात्र नत्र व सेंद्रीय द्रव्ये त्यात कमी असल्यामुळे नत्रयुक्त व सेंद्रीय खते यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. उंच पठारी भागात अतिशय रेताड अशी पठारी मृदा आढळते. कोकण आणि सह्याद्री भागात विटकरी रंगाची जांभ्या दगडाची मृदा आढळते. ही मृदा जंगलव्याप्त प्रदेशांत काहीशी सुपीक असते. मात्र जंगलतोड केल्यास त्याच भागात नापीक ‘वरकस’ मृदेची निर्मिती होते. सर्वसाधारपणे महाराष्ट्रातील मृदांचे थर पातळ असून त्याना खतांची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते.

राज्यांच्या नैसर्गिक संपत्तिसाधनांमध्ये पाणी हे अत्यंत मौल्यवान साधन आहे. त्यालामागणी मोठी आहे. मात्र स्थलपरत्वे त्याचे वितरण अत्यंत विषम आहे. भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकण भागात देखील अनेक खेडेगावात लोकांना, विशेषतः उन्हाळ्यात, पाण्यासाठी अश्रू ढाळावे लागतात. लागवडीखालील क्षेत्रापैकी जेमतेम ११% भागाला जलसिंचनाचा फायदा मिळतो. सिंचनासाठी वापरात आणलेल्या पाण्यापैकी सुमारे ५५% पाणी विहिरीतून उपलब्ध होऊ शकते. तापी-पूर्णा खोऱ्यात अनेक नलिकाकूप तर किनारी भागात अनेक उथळ विहिरी खोदल्या गेल्या असून त्यापासून पाणीपुरवठा होतो. विद्युत पंपांची सोय उपलब्ध झाल्यानंतर मात्र उपशाचे प्रमाण एकदम वाढल्यामुळे विहिरींचे पाणी मचूळ अथवा खारे होण्याचे प्रकार घडत आहेत.

महाराष्ट्रात खनिज पट्टे बेसॉल्ट पठाराच्या सीमेपलीकडे म्हणजेच पूर्व विदर्भ, दक्षिण कोल्हापूर व सिंधुदुर्ग या प्रदेशात आढळतात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि नागपूर जिल्हयातून राज्याचा प्रमुख खनिज पट्टा जात असून त्यात कोळसा आणि मॅंगनीज ही मुख्य खनिजे आढळतात. लोहखनिज व चुनखडी ही या भागातील खनिज-संपत्ती अजून बरीचशी सुप्तावस्थेत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागातील वाळूत इल्मेनाईट या खनिजाचे साठे आढळतात.

ऊर्जा-निर्मिती आणि ऊर्जेचा वापर यांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची गणना विकसित राज्यांत होते. एकूण ऊर्जेपैकी ५५% औष्णिक उर्जा, ३५‍% जलविद्युत आणि ६% अणुऊर्जेच्या स्वरूपात उत्पन्न केली जाते. तारपूर या महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेलगत वसविलेल्या अणुऊर्जा केंद्रातील ऊर्जा दोन्ही राज्यात समसमान वाटून घेण्यात येते. पूर्वेकडील डोंगराल भागातील इंद्रावती व वैनगंगा यासारख्या खोऱ्यात जलविद्युत शक्ति निर्माण होण्यासाठी अनेक योग्य जागा उपलब्ध आहेत.

इतर साधनसंपत्तीमध्ये पशुसंपत्ती जरी संख्याबलाने खूप असली तरी तिची काळजी योग्य प्रमाणात घेतली जात नाही. मात्र सहकारी तत्त्वावर दुग्धोत्पादन आणि शहरांच्या आसपासच्या भागात कुक्कुटपालन यांचा विकास होत आहे. ठराविक काळापुरता मर्यादित असूनही राज्यात सागरी मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. त्यासाठी देखील मुंबई शहर हीच मुख्य बाजारपेठ आहे. किनाऱ्यालगत असलेल्या उथळ सागरतळामुळे ट्रॉलर्सच्या साहाय्याने वर्षभर सागरी मासेमारी करणे सहज शक्य आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा