विहंगावलोकन

लेखन बी.अरुणाचलम | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

रामटेक येथील एक दृष्य, जिल्हा नागपूर

प्राकृतिक स्वरूप

भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावर मध्यभागी वसलेल्या आणि मुंबईसारख्या बंदराच्या मदतीने अरबी समुद्रावर अंमल ठेवू पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या एकात्मतेत भर पडते ती त्याच्या भूसंरचनेमुळे. राज्याचे पठारी स्वरूप सहजपणे मनावर ठसते. पठाराची पश्चिम कडा डोंगराळ असुन तिलाच आपन सह्याद्री म्हणतो. पठाराची उंची पश्चिम भागात ६०० मी. असून ते पूर्वेला व आग्नेयेकडे उतरत गेले आहे. पूर्वेकडील सीमाभागात त्याची उंची सुमारे ३००मी. आहे. पठारावर उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या व त्यांच्या मुख्य उपनद्या यानी खननकार्य करुन दऱ्या निर्माण केल्या आहेत. दोआब क्षेत्रात झीज त्यामानाने कमी झाल्यामुळे व मूळ खडकांच्या क्षितिजसमांतर संरचमुळे तेथे पठारी प्रदेश निर्माण झाले आहेत. अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ यासारखी पठारे अशाच प्रकारची आहेत.

सह्याद्री महाराष्ट्राचा कणा मानला जातो. कोकणातून पाहिल्यास पायथ्यापासून अनेक कड्याच्या साहाय्याने तो भराभर उंचावत जातो व १००० मीटरहून अधिक उंची गाठतो. त्यामुळेच या बाजूकडून पाहिल्यास त्याचे पर्वतीत स्वरूप चटकन्‌ अनुभवास येते. पूर्वेकडे त्याची उंची क्रमक्रमाने, पायर्‍या-पायर्‍यांनी कमी होते व मावळ भागातून पुढे जात तो पठाराच्या पातळीवर येतो.

सह्याद्री व अरबी समुद्र यांच्यात सुमारे ५० किमी. रुंदी असणारा सखल पट्टा म्हणजेच कोकण. अनेक छोट्या मोठ्या नद्यांनी खणलेल्या खोल दऱ्यांमुळे हा भाग छिन्नविछिन्न झाला असून त्यात जांभ्या दगडाच्य कातळाने आच्छादिलेली सखल पठारे, टेकड्या आणि पूर्व क्षितिजावर सह्याद्रीची भिंत असे विविध भूआकार आढळतात.

उत्तर सीमेवरील सातपुड्याचा काही भाग आणि पूर्व सीमेवर भामरागड-चिरोली-गायखुरी रांगामुळे राज्याच्या त्या सीमादेखील प्राकृतिक स्वरुपाच्या असून त्यामुळे सीमेपलीकडील राज्यांशी दळणवळण आणि संपर्क ठेवण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी-पूर्णा आणि वर्धा-वैनगंगा यानी केलेल्या क्षरण कार्यामुळे रूंद दऱ्या निर्माण झाल्या आहेत. याउलट कोकणातून वाहणाऱ्या जेमतेम १०० किमी लांबीच्या अवखळ ओढ्यानी तयार केलेल्या दऱ्या अरूंद व खोल असून त्यातून पाणी जोराने खळखळाट करीत खाली येते.

राज्याच्या जडणघडणीवर भूसंरचनेचा खुपच परिणम झाल्याने जाणवते. राज्याचा पूर्व वऱ्हाडाचा व दक्षिणेकडील कोल्हापूर-सिंधुदुर्गचा काही भाग सोडल्यास राज्याचे इतर क्षेत्र दख्खन लाव्हा क्षेत्रात मोडते. सुमारे सहा ते नऊ कोटी वर्षांपूर्वी भेगांतून बाहेर पडलेल्या लाव्हारसामुळे आच्छादिल्या गेलेल्या महाराष्ट्र भूमीत बहुतेक सर्वत्र क्षितिजसमांतर अवस्थेत असणारे बेसॉल्ट खडक आधळतात. अर्थात सर्व भागात बेसॉल्ट एकाच प्रकारचा नाही. काही भागात खडक स्फटिकरहित व पोलादी करड्या रंगाचे असून त्यात लाव्हा थंड होताना निर्माण झालेल्या उभ्या फटी आढळतात. या फटींतून खडकांची झीज सुलभपणे होऊन त्यामुळे उभट कडे निर्माण झाले आहेत. दोन लाव्हा थरांमध्ये मात्र ज्वालामुखी राखेचे आणि विवरयुक्त बेसॉल्टचे थर आढळतात. उष्ण-दमट प्रकारच्या हवामानातील अनाच्छादनाच्या क्रियेमुळे भूस्वरूपात आणखी बदल घडून येतात. विशेषतः पश्चिम भागातील अतिपावसामुळे व पुर्वेकडील कोरड्या हवामानामुळे भूरूपात डोळ्यात सहज भरण्याइतपत फरक जाणवतो. कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी-पूर्णा आणि वर्धा-वैनगंगा यानी केलेल्या क्षरण कार्यामुळे रूंद दऱ्या निर्माण झाल्या आहेत. याउलट कोकणातून वाहणाऱ्या जेमतेम १०० किमी लांबीच्या अवखळ ओढ्यानी तयार केलेल्या दऱ्या अरूंद व खोल असून त्यातून पाणी जोराने खळखळाट करीत खाली येते. मुखाजवळ मात्र काहीशी सपाटी आढळते. भरतीच्या वेळी पाणी वर शिरत असल्यामुळे खाड्या निर्माण झाल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा