Download MarathiMati.com's New Android App from Google Play

विहंगावलोकन

लेखन बी.अरुणाचलम | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

विहंगावलोकन

महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणार्‍या लोकांची भूमी आहे. महाराष्ट्र हे नाव ‘महाराष्ट्री’ या प्राकृतच्या जुन्या प्रकारच्या नांवावरून पडले असावे. मात्र काही लोकांचे असेदेखील म्हणणे आहे की मुळात या भागात महार आणि रट्ट या लोकांची वस्ती होती. या दोन नांवावरून ‘महारट्ट’ व नंतर ‘महाराष्ट्र’ असे नांव या भूमीला पडले. इतर काहींच्या मतानुसार महाराष्ट्रभूमी दंडकारण्याप्रमाणेच वनभूमी होती व तिला ‘महाकांतार’ म्हणत; त्याचा अपभ्रंश म्हणजेच ‘महाराष्ट्र’ होय.

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म जागवावा ॥ - समर्थ रामदास

संस्कृत शिलालेखात महाराष्ट्रातील विदर्भ, अपरांत (कोकण) इत्यादी काही भागांचा उल्लेख आढळतो. वेदांत उल्लेखिलेल्या दक्षिणपाद या प्रदेशाचे ते भाग असावेत असा निष्कर्ष काढता येतो. मात्र असे ऐतिहासिक उल्लेख तुरळक प्रमाणात असून त्यांची संगती लावणे पुष्कळ वेळा कठिण जाते. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्‍या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली. वरील मध्यवर्ती सत्ताकेंद्रांशिवाय करवीरचे शिलाहार, अपरांतचे भोज व गोव्याचे कदंब ही मांडलिक घराणी सीमेलगतच्या प्रदेशात उदयास आली. मात्र या प्रदेशात खरा एकजिनसीपणा आला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या हिंदवी राष्ट्रवादामुळेच. शिवाजी महाराजांना गुरुस्थानी असलेल्या समर्थांनीच मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म जागवावा ॥, अशी शिकवण देऊन या कामी मोलाचा हातभार लावला. पेशव्यांच्या काळात राजकीय चढ-उतारांबरोबर राज्याच्या सीमा आकुंचन पावत अगर विस्तारत. त्या काळच्या मराठी राज्याने व्यापलेला प्रदेश साधारणत: गोवा, दमण, आणि गोंदिया या तीन ठिकाणांनी केलेल्या त्रिकोणाने बंदिस्त झाला आहे.

सध्याच्या स्वरुपातील मराठी भाषिक राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. भाषावर प्रांतरचना १९५६ साली अमलात येऊनही मुंबईच्या नाजूक प्रश्नामुळे महाराष्ट्र व गुराजत यांचे द्वौभाषिक निर्माण करण्यात आले होते. जनतेने मात्र या गोष्टीला तीव्र नापसंती दर्शविली आणि त्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उदयास आली. परिणामत: सध्याचे मराठी भाषिक राज्य अस्तित्वात आले. या राज्यात सलग मराठी भाषिक प्रदेश एका छत्राखाली आणण्यात आले आहेत. यात मुख्यतः ब्रिटिशांच्या काळात मुंबई इलाख्यात असलेल्या महाराष्ट्राचा भाग, हैद्राबादच्या निजाम संस्थानातील वायव्येकडील पाच जिल्हे व मध्य प्रांतातील दक्षिणेकडील आठ जिल्हे एकत्र आणण्यात आले आहेत. वरील तीन भागात पूर्वी अस्तित्वात असलेली अनेक छोटी संस्थाने देखील होती. काही संस्थानांचे शेजारच्या जिल्ह्यात विलिनीकरण करण्यात आले. कोल्हापूर, सातारा, सांगली यासारख्या काहींचे स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्यात आले. राज्याचे. क्षेत्र राज्याचे क्षेत्र सुमारे ३.०८ लाख चौ.कि.मी. आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play