पुरातनकाल

लेखन म. के. ढवळीकर | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

छोट्या चित्राकृती

सातवाहन काळ

सिमुकाचा पुत्र पहिला सातकर्णी व त्याची राणी व राजपुत्र यांचीही तीच कथा आहे. सिमुकाचा धाटका भाऊ कृष्ण याने नाशिक येथे एक गुंफा खोदविली. नाणेघाट येथे असलेला राणी नागनिका हिच्या कोरीव लेखात तिचा पती पहिला सातकर्णी याच्या पराक्रमाचा वृत्तांत दिलेला आहे.

सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्राचे भाग्यविधाते होत. त्यांनी महाराष्ट्रावर तीनशे वर्षे (इ,स,पू. १०० ते इ.स. २३० ) राज्य केले. त्यांच्या काळातील कला, नाणी, कोरीव लेख, वाङ्‍मय इ. विपुल पुरावा उपलब्ध आहे. असे असले तरी त्यांच्या इतिहासात अनेक कूटस्थळे आहेत. त्यांच्या प्राचीन वास्तू, कोरीव लेख व त्यांची राजधानी या सर्व महाराष्ट्रातील पुणे-नाशिक-औरंगाबाद या भागात मिळालेल्या आहेत. त्यांच्या घरण्याचा जनक राया सिमुक याच्या अस्तिवाची निशाणी देणारा फक्त एकच कोरीव लेख शिल्लक आहे. या राजाचा कोरीव पुतळा जुन्नरजवळील नाणेघाटात उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या बैठकीवर राजाचे नांव कोरलेला लेख फक्त आज शिल्लक आहे. सिमुकाचा पुत्र पहिला सातकर्णी व त्याची राणी व राजपुत्र यांचीही तीच कथा आहे. सिमुकाचा धाटका भाऊ कृष्ण याने नाशिक येथे एक गुंफा खोदविली. नाणेघाट येथे असलेला राणी नागनिका हिच्या कोरीव लेखात तिचा पती पहिला सातकर्णी याच्या पराक्रमाचा वृत्तांत दिलेला आहे. त्याचा पुत्र दुसरा सातकर्णी याने पंचावन्न वर्षे राज्य केले व त्याच्याच कारकीर्दीत सांचीची अप्रतिम तोरणे कोरली गेली. या सर्व राजांची कारकीर्दीत इसवी सनाच्या सुरूवातीच्या आधीची आहे. परंतु त्यानंतर जवळजवळ एक शतकाचा इतिहास मात्र अजूनही अस्पष्ट आहे. सातवाहनांपैकी सर्वात थोर राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकीर्दीचा काळ आधिक निश्चितपणे सांगता येतो. इ.स. १२४ मध्ये क्षत्रप नहपान याचा पराभव करून दिले. शक क्षत्रप नहपान हा राजा कनिष्काने नेमलेला पश्चिम भारतातील राज्यप्रमुख किंवा मांडलिक राजा होता. गौतमपुत्राच्या आईने नाशिकच्या क्रमांक तीनच्या लेण्यात लिहून ठेवलेल्या वृतांतात त्याचे वर्णन शक-पहलव-आणि-यवन यांचे मर्दन करणारा (शकयवनपहलव निसूदन) व ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत म्हणजेच ज्याचे सैन्य तिन्ही समुद्रांच्या सीमापर्यंत पोचलेले आहे (त्रिसमुद्रतोयपीतवाहन) असे केलेले आहे. यामध्ये कसलीही पोकळ बढाई नाही. त्याने विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा संपूर्ण प्रदेश जिंकून घेतलेला होता असे त्याच्या या प्रदेशात सर्वत्र सापडलेल्या नाण्यांवरून दिसून येते. आणि म्हणूनच एक कविराज म्हणतात, “उत्तरेकडे हिमालय व दक्षिणेकडे सातवाहन राजा यांच्यामुळे पृथ्वीचा तोल साधलेला आहे.”

गौतमीपुत्र सातकर्णीचा पुत्र वसिष्ठीपुत्र पुळुमावीचा इ.स. १५० च्या सुमारास क्षत्रप रूद्रदामनाने पराभव केला. त्यामुळे त्याला आपली राजधानी पैठणहून धन्यकटक (गुंटुरजवळील धरणीकोटा, आंध्र प्रदेश) येथे हलवावी लागली. तेव्हांपासून सातवाहनांची सत्ता दक्षिण दख्खनमध्येच अधिक केंद्रित झाली. कदाचित म्हणूनच पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख `आंध्र’ असा केलेला आढळतो. राजा यज्ञश्री सातकर्णीच्या कारकीर्दीत (इ.स. १६०-१८४) सातवाहन सत्तेचे पुनरूज्जीवन झालेले दिसते. परंतु त्याच्यानंतर गादीवर आलेले राजे दुबळे ठरले व इ.स. २३० च्या सुमारास सातवाहनांच्या सत्तेचा अस्त झाला.

सातवाहनांची कारकीर्द प्रत्येक सांस्कृतिचा क्षेत्रात कमालीची प्रगती घडवून आणणारी ठरली. या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर वसाहती झाल्या. हवामान पुन्हा अनुकूल होते, काळ्या जमिनीत यशस्वीरीत्या लागवड करण्याचे तंत्र आत्मसात झाले व त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन समृद्ध “गृहपतींचा” एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. त्यांनी बौद्ध विहारांना उदारहस्ते दाने दिल्याचे उल्लेख मिळतात. त्याचप्रमाणे व्यापारी, धंदेवाईक, कारागीर यांच्या श्रेणी निर्माण झाल्या. अनेक नवीन नगरे वसविली गेली. रोमन इतिहासकार प्लिनी, सातवाहनांच्या साम्राज्यात तटबंदीने युक्त अशी तीस शहरे होती, असे सांगतो त्यांच्या साम्राज्यात भरभरटीला आलेल्या उद्योगधंद्याच्या अनेक केंद्रांपैकी तगर (तेर, उस्मानाबाद जिल्हा ) हे महत्त्वाचे होते. ग्रीक इतिहासकारांनी त्याचे वर्णन दक्षिणापथामधील (विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेश) सर्वात मोठी बाजारपेठ असे केले आहे. अंतर्गत व्यापाराबरोबरच परदेशांशीही, विशेषतः रोमन साम्राज्याशीं मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू होता. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी नांवाच्या ग्रंथात, इथून निर्यात होणाऱ्या, आयात केल्या जाणाऱ्या वस्तू, त्यासाठी देशातील विविध भागात उपलब्ध असणाऱ्या सुविधा, चलन या सर्वांची तपशीलवर जंत्री मिळते. मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, मलमल, विविध औषधी जडीबुटी, अत्तरे, कमावलेली कातडी आणि लाकूड प्रचंड प्रमाणात निर्यात होत असत; तर रोमन मद्य, वाद्ये, काचसामान, चांदी, सातवाहनांच्या दरबार व अंतःपुरासाठी गायनकलेत निपुण असणारी मुले व नर्तकी इत्यादी आयात करण्यात येत. अर्थातच व्यापारात भारताची चढती बाजू होती व आपल्याकडून जाणाऱ्या दुर्मिळ वस्तूंसाठी रोमन लोकांना सोन्याची लक्षावधि नाणी आपल्याला काढून द्यावी लागते. स्त्रिया या सुंदर नाण्यांच्या माळा गुंफून आपल्या गळ्यात घालत. ही पद्धत पुतळ्यांच्या माळेच्या रूपांत आजतागायत टिकून आहे.

यवन व्यापारीही आपल्या देशात राहिलेले होते. खरे पाहता हे व्यापारी सातवाहनांच्या पूर्वीच भारतात येऊन पोचलेले होते. आणि म्हणूनच अशोकाने खास त्यांच्यापर्यंत बुधाची शिकवणूक पोचविण्यासाठी `यवन-धर्मरक्षिता’ची नेमणूक केलेले होती. लेण्यांमधील कोरीव लेखांवरून असे लक्षात येते की बरेच यवन व्यापारी धेनुकाकट या शहराचे रहिवासी होते. हे शहर नक्की कोणते याची अजूनही ओळख पटलेली नाही. कदाचित्‌ आजचे जुन्नर हेच प्राचीन धेनुकाकट असणे शक्य आहे. हे `यवन’ लोकांच्या रोजच्या पहाण्यात होते. त्यामुळे लोकांच्या कलाभिव्यक्तिचाही ते विषय बनले होते.

अंतर्गत व बहिर्गत दोन्ही प्रकरच्या व्यापारधंद्यामुळे पूर्वी कधीही लाभली नव्हती अशी समृद्धी येथील लोकांना प्राप्त झाली. त्यामुळे पितळखोरे, अंजिठा (सुरुवातीची लेणी), भाजे, कार्ले, नाशिक, जुन्नर इत्यादिंसारखी शेकडो लेणी खोदणे शक्य झाले. यांपैकी बहुतेक लेणी उत्तमोत्तम शिल्पांनी नटलेली आहेत. या शिल्पांचे वैशिष्ट्य असे की दगडात कोरलेली असूनही ती विलक्षण सजीव वाटतात. स्फिंक्स व त्रिदल या ग्रीक चिन्हांचाही समावेश जुन्नर आणि नाशिक येथील शिल्पांमध्ये झालेला दिसतो. यातील बहुतांशी गुंफा या मनोरम चित्रांनी नटलेल्या होत्या. परंतु आता तीं सर्व नष्ट पावली आहेत. निसर्ग व मानव यांच्या तडाख्यातून तीं सुटु शकली नाहीत. याला अपवाद फक्त अजिंठा येथील क्रमांक ९ व १० या गुफांमधील चित्रांचा. या चित्रांची शैली दगडी शिल्पांशी खूपच जवळीक दर्शविते.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा