पुरातनकाल

लेखन म. के. ढवळीकर | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

अश्मयुगातील साठवणीच्या घागरी

अन्न गोळा करणारा मानव

फरशीसारखे हत्यार जनावरांची कातडी खरडून साफ करण्यासाठी वापरीत. तोडहत्यारही त्यांत आढळते.

साधारणपणे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी आद्य पुराश्मयुगात देशातील इतर ठिकाणांप्रमाणेच महाराष्ट्रातही, घोड, भिमा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यांमधून प्राचीन मानव भटक्या अवस्थेत जीवन जगत होता. त्यांच्या वीस ते तीस जणांच्या टोळ्या असत. शिकार व रानातील फळे आणि कंदमुळे गोळा करणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. त्यासाठी या नद्यांच्या काठांवर उदंड विखुरलेल्या गोट्यांपासून ते दगडी हत्यारे तयार करीत. या हत्यारांमध्ये बहुगुणी अशा हातकुऱ्हाडी खूप आहेत. त्यांचा कापण्यासाठी, कंदमुळे उकरण्यासाठी उपयोग होई. फरशीसारखे हत्यार जनावरांची कातडी खरडून साफ करण्यासाठी वापरीत. तोडहत्यारही त्यांत आढळते. कदाचित तासून टोकदार केलेल्या लाकडी काठ्या त्यांनी शिकारीसाठी वापरल्या असाव्यात. जंगली हत्ती ( Elephas namadicus) व जंगली बैल (Bos namadicus) यासारख्या प्राण्यांचीही त्यांनी शिकार केली असावी. कारण या प्राण्याच्या अश्मास्थि नेवासे (जि. अहमदनगर ) व मोठ्या प्रामणात गोदावरीची उपनदी मांजरा हिच्या काठावर वसलेल्या धनेगांव (जि. उस्मानाबाद) येथे सापडल्या.

त्या काळातील हवामान आजच्यापेक्षा आधिक शुष्क होते व नद्या उथळ होत्या. प्रवरेचे नेवाशाजवळील पात्र तेव्हा आतापेक्षा जवळजवळ १० ते २० मीटर उंच आणि दगडगोट्यांनी भरलेले होते. कालांतराने, म्हणजे साधारण दीड लाख वर्षांपूर्वी, प्रवरा, गोदावरी कृष्णा, व इतर नद्यांची पात्रे खोल होण्यास सुरूवात झाली; कारण हवामान अधिक आर्द्र झाले व पावसाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले.

मध्य-पुराश्मयुगात म्हणजे साधारण एक लाख वर्षांपूर्वी मानवाने तासणी (scrapers) व अणी (points) यासारखी छोटी हत्यारे घडविण्यास सुरूवात केली. ही हत्यारे चर्ट, जास्पर यासारख्या अत्यंत कणखर दगडांपासून बनवीत. हे दगड सर्व महाराष्ट्रभर सापडतात. या हत्यारांहूनही छोटी हत्यारे साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगांत उपयोगात आणली गेली. यामध्ये छोटी छोटी पाती व छिलक्यांपासून बनविलेल्या हत्यारांचा समावेश होता. ती गारेच्या दगडापासून बनविलेली असत. चाळीसगांव ( जि. जळगांव ) जवळील पाटणे येथे अशा प्रकारच्या हत्यारांचे सर्वच प्रकार मिळालेले आहेत. साधारणपणे याच काळात मानवाने मासेमारीही शोधून काढली. या काळात हवामान पुन्हा शुष्क होऊ लागले होते व नद्यांची पात्रे उथळ होती. कोकणात समुद्र मागे हटला व फार मोठा भूभाग वर आला. कदाचित परशुरामाने समुद्र मागे हटविला या पौराणिक आख्यायिकेची ही शास्त्रीय पूर्वपीठिका असावी.

पुन्हा एकदा, साधारण १६००० वर्षापूर्वी हवामान अधिक आर्द्र बनले. मध्याश्मयुगाची सुरूवात या सुमाराची मानतात. या काळात भुभागावरील घनदाट झाडीच्या आवरणामुळे महाराष्ट्रातील काळी माती तयार झाली. वनस्पती व प्राणी या दोहोंच्या समृद्धिमुळे या काळातील मानवी जीवन पूर्वीपेक्षा सुखकर बनले. यामुळे लोकसंख्येत खूप वाढ झाली. बहुसंख्येने आढळणाऱ्या मध्याश्मयुगीन मानवी वस्तीच्या स्थानांवरून याला पुष्टि मिळते. मध्याश्मयुगीन मानवाने बनविलेली गारेच्या दगडाची पाती असलेली हत्यारे या ठिकाणी इतस्ततः विखुरलेली आढळतात. मध्याश्मयुगीत मानवाने लहान प्राण्यांची शिकार करी व या कामात पाळीव कुत्र्यांची मदत घेई. कुत्रा हा प्राणी याच काळात माणसाळवला गेला. कदाचित्‌ या काळात मानव रानटी रोपांची कापणी करून त्यापासून धान्य गोळा करत असण्याचीही शक्यता आहे त्यामुळे मानवी जीवनाला ऋतुमानाच्या संदर्भात थोडीफार स्थिरता लाभली असावी.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा