Download MarathiMati.com's New Android App from Google Play

अर्थव्यवस्था आणि उद्योग

लेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

उच्च प्रतीच्या धातूच्या पत्र्यांच्या भागांसाठी स्वयंचलित प्रेस लाईन.

राज्य शासनाचे कार्य

सिकॉम, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इत्यादी संस्थांच्या द्वारे साधन, सहाय्य आणि मार्गदर्शन या गोष्टी उपलब्ध केल्या आहेत, त्याचप्रमाणे विविध प्रकारची प्रोत्साहने दिली आहेत आणि एकंदरीत औद्योगिक विकासाला अनुकूलाशी धोरणे अंमलात आणली आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे याचे श्रेय राज्य शासनाला देखील द्यायला हवे. कारण आवश्यक त्या सुविधांचा त्याने विकास केला आहे. सिकॉम, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इत्यादी संस्थांच्या द्वारे साधन, सहाय्य आणि मार्गदर्शन या गोष्टी उपलब्ध केल्या आहेत, त्याचप्रमाणे विविध प्रकारची प्रोत्साहने दिली आहेत आणि एकंदरीत औद्योगिक विकासाला अनुकूलाशी धोरणे अंमलात आणली आहेत. भांडवल पुरविणे, जमीन आणि बांधलेले गाळे अल्प किंमतीत व सोयीस्कर अटींवर उपलब्ध करून देणे आणि करांत सूट देणे असे या सुविधांचे व प्रोत्साहनांचे स्वरूप आहे. या बाबतीत सिकॉम या संस्थेने विशेष तडफ, कार्यक्षमता व उपक्रमशीलता दाखविली आहे. सोईस्कर केंद्रे विकासासाठी निवडायची आणि तेथे काही काळ प्रयत्न एकवटून त्यांचा वेगाने विकास करायचा असे धोरण यासंस्थेने अवलंबिले आहे आणि ते अत्यंत यशस्वी झाले आहे. आता परदेशातील भारतीयांना आकर्षक वाटतील अशा योजना आखून, त्यांना महाराष्ट्रात भांडवल गुंतविण्यास व उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त करायचे असा कार्यक्रम या संस्थेने आखला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कारखान्यांसाठी आवश्यक सोयी असलेल्या जागाचा विकास करते व गाळेही बांधून देते. उद्योजकांना सोईस्कर वाटतील अशा अटींवर या जागा व गाळे दिले जातात. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ भांडवलाचा पुरवठा करते. तर महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ कच्चा माल वगैरे गोष्टींचा पुरवठा करते. या सर्व संस्थांनी चांगल्या प्रकारे कार्य केले आहे.

साखर कारखाने, सूत गिरण्या, दुग्ध व्यवसाय इत्यादि शेतींवर आधारलेल्या उद्योगांच्या विकासात शासनाने पुढाकार घेऊन विपुल सहाय्य केले आहे. १९६० नंतर महाराष्ट्रात साखर उद्योगाचा जो स्पृहणीय विकास झाला त्याचे श्रेय जितके राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला आहे तितकेच शासनाने दिलेल्या प्रोत्साहनाला व सहाय्याला देखील आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play