आपला प्रदेश

लेखन वसंत बापट | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

आपला प्रदेश

गेल्या शंभर वर्षांच्या इतिहसावर नजर टाकली तर या महापुरुषांच्या बरोबरच आणखीही थोर विभूती दिसू लागतात. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, चाफेकर, कर्वे, कान्हेरे प्रभूती क्रांतीकारक, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, अशी नररत्ने महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आली. अगदी गेल्या पन्नाससाठ वर्षांतही महात्मा गांधीप्रणीत सत्याग्रही आंदोलने असोत किंवा सशस्त्र क्रांतिकारकांची आतंकवादी आंदोलने असोत, महाराष्ट्राने बलिदान करणाऱ्या अनेक त्यागी वीरांना जन्म दिला असे दिसेल, सारांश, आधुनिक भारताच्या जडणघडणीतही महान्‌ कामगिरी करून महाराष्ट्राने आपले नांव सार्थ केले आहे.

पराक्रमाची धडाक्याने वाजणारी नौबत, भक्तीच्या मळ्यात अखंड दुमदुमणारा गजर आणि समाजक्रांतीसाठी चाललेल्या आंदोलनांतील घोषणा आणि यांच्या धडाक्यात सौंदर्योपासनेचा मंद्रमधुर आवाज बुडुन जातो. या सौंदर्योपासनेने आमच्या महावस्त्राला जरीचे काठ लावले आहेत. आणि यांच्यावर जरीचेच असंख्य बुंदही झळकावले आहेत. उत्तर भारताच्या मानाने महाराष्ट्रात साधनसमृद्धी कमी आहे आणि म्हणून ख्याली-खुशालीही बेताची आहे. दक्षिण भारताच्या तुलनेने पाहता महाराष्ट्राला शांतताही फार थोडी लाभली. परिणामी महाराष्ट्रात बुलंद भव्य इमारती उभ्या राहिल्या नाहीत आणि नाजूक नक्षीची प्रचंड मंदिरही झाली नाहीत. मराठी तट्टे ठेगणी आणि माणसेही अटकर बांध्याची; तसेच इथले स्थापत्यही अल्पप्रमाण. अंबरनाथ किंवा सिन्नर येथील देवळांसारखे काही अपवाद वगळले तर शिल्पी लोकांची करामत फारशी दिसत नाहे. काही गढ्या आणि वाडे यांचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. क्वचितच कळाशीदार कारंजी, चौक आणि बगीचेही आहेत. पण एकंदरीने भव्यतेपेक्षा उपयुक्ततेलाच अधिक महत्त्व होते. महाराष्ट्राला अभिमान वाटतो तो दोन गोष्टींचा . सह्याद्रीच्या कुशीतली लेणी आणि सह्याद्रीच्या माथ्यावरचे किल्ले. पहिली सौंदर्यतीर्थे आणि दुसरी सामर्थ्याची आधिष्ठाने. घारापुरीच्या त्रिमूर्तीएवढे भव्य आणि प्रभावी शिल्प क्वचितच कोठे दिसेल. सुडौल रेषा, उजळ रंग आणि भावदर्शी मुद्रा यांच्यामुळे अजिंठ्याच्या लेण्यांतली चित्रकला जगविख्यात झाली आहे. वेरूळची लेणी म्हणजे पाषाणशिल्पांच्या गतिमानतेचा चिरंतन प्रत्यय. अर्थात ही सर्व कमाई प्राचीन काळची आहे. महाराष्ट्राचे `महाराष्ट्रपण’ पूर्ण होण्याच्या आधीची. त्या मानाने किल्ले निकटच्या इतिहास काळतले आहेत. त्यांचे तटबुरुज आणि दरवाजे सौंदर्यपेक्षा सामर्थ्याचा अनुभव देतात. राजगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर यांसारखे सह्याद्रीच्या सिखरांवरचे गड, औरंगाबादजवळील देवगिरी ऊर्फ दौलताबाद; आणि जंजिरा, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग ज्या प्रदेशात आहेत त्याच्या वीरवृत्तीचा पुरावा अधिक शोधण्याची गरज नाही.

गेली शंभर वर्षे नाट्यसृष्टी विविध प्रकारच्या नाट्यकृतींनी सैव बहरलेली दिसते. याचे श्रेय किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, गडकरी, खाडीलकर, वीर वामनराव जोशी, सावरकर, वरेरकर, अत्रे, रांगणेकर, वर्तक, काणेकर, शिरवाडकर, कानेटकर, तेंडुलकर, जयवंत दळवी, मतकरी, प्रभूती नाटकारांना आहे. तसेच भाऊराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, केशवराव भोसले, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, केशवराव दाते, गणपतराव बोडस, पेंढारकर, नानासाहेब, फाटक, ज्योस्त्ना भोळे, दुर्गा खोटे, मास्टर दत्ताराम, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, विजया मेहता, दामू केंकरे…. अशा कित्येक गुणी प्रतिभाशाली कलाकारांनाही हे श्रेय दिले पाहिजे.

अलीकडे मराठाकालीन चित्रकलेचे काही चांगले नमुने प्राप्त झाले आहेत. परंतु चित्रकलेच्या वैभवाचे दर्शन आधुनिक महाराष्ट्रातच घडते. केरळीय चित्रकार राजा रविवर्म्याने महाराष्ट्रात वास्तव्य केले होते तेव्हापासून आभिजात वळणाऱ्या चित्रकलेने येथे मूळ धरले. मुंबई शहरात कलाशिक्षणाचा आरंभ झाल्यापासून चित्रकलेच्या विश्वात एक मुंबई पठडी निर्माण झाली. स्वरूपाच्या चित्रक्लेचा आपल्या देशतील चित्रकारांना परिचय होऊ लागला. त्यामुळे या विविध शैली आणि निष्ठा जोपासणारे अव्वल दर्जाचे अनेक चित्रकार महाराष्ट्राने भारताला दिले आहेत. त्या मानाने महाराष्ट्रातील शिल्पकला डोळ्यात भरण्याजोगी नाही. तिला जवळ असणारी पुतळे घडवण्याची कला मात्र येथे उच्च दर्जाची आहे.

कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची अभिमानजनक कामगिरी आहे ती नाट्य आणि संगीत यांच्या क्षेत्रात. यांत महाराष्ट्र अग्रेसरच आहे. जवळ जवळ ह्जार वर्षे भारतात रंगभूमी लुप्तप्राय झालेली होती. तंजावरच्या मराठा राज्यात अठराव्या शतकात तेथील, राजांच्या प्रोत्साहने आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने भारतीय नाट्यसृष्टीचा पुनर्जन्म झाला. दुर्दैवाने दळवळणाच्या अभावी तंजावरी नाटके मराठी असूनही महाराष्ट्रात पोचलीच नाहीत. पुढे १८४३ साली सांगलीच्या संस्थानिकांच्या सूचेवरून विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटक रचले. आधुनिक मराठी रंगभूमीचा शुभारंभ या नाटकाने झाला असे मानतात. त्यानंतर चाळीस वर्षे विष्णुदासी पद्धतीची पौराणिक नाटके रंगभूमीवर येत राहिली. या काळातच संस्कृत आणि इंग्रजी नाटकांच्या अनुवादांचा कालखंड आला. १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी शाकुंतल रंगभूमीवर आणले आणि येथूनच मराठी रंगभूमीचा वैभवकाळ सुरू झाला. चित्रपट सृष्टीचा प्रभावामुळे मराठी रंगभूमीच्या वैभवात दहापंधरा वर्षेच काय तो खंड पडला. एरवी गेली शंभर वर्षे नाट्यसृष्टी विविध प्रकारच्या नाट्यकृतींनी सैव बहरलेली दिसते. याचे श्रेय किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, गडकरी, खाडीलकर, वीर वामनराव जोशी, सावरकर, वरेरकर, अत्रे, रांगणेकर, वर्तक, काणेकर, शिरवाडकर, कानेटकर, तेंडुलकर, जयवंत दळवी, मतकरी, प्रभूती नाटकारांना आहे. तसेच भाऊराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, केशवराव भोसले, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, केशवराव दाते, गणपतराव बोडस, पेंढारकर, नानासाहेब, फाटक, ज्योस्त्ना भोळे, दुर्गा खोटे, मास्टर दत्ताराम, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, विजया मेहता, दामू केंकरे…. अशा कित्येक गुणी प्रतिभाशाली कलाकारांनाही हे श्रेय दिले पाहिजे. अवघ्या शंभर वर्षाच्या इतिहसात उत्तमोत्तम नाटके निर्माण होणे हा महाराष्ट्राचा भाग्ययोगच म्हटला पाहिजे. महाराष्ट्र हा खरोखरच नाटकवेडा मुलुख आहे. व्यावसायिक नाटक कंपन्या आणि हौशी नटसंच दोहोंची संख्या येथे फार मोठी आहे. येथील रंगभूमी राजधानीच्या शहरापुरती आणि अति सुसंस्कृत लोकांपुरतीच मर्यादित नाही. अनेक शहरे, छोटीमोठी खेडी, कामगारांच्या वसाहती सर्वत्र रंगभूमीच्या उपासना चालू असते.

गेल्या दीड शतकात हिंदुस्तानी संगीत कलेकाही महाराष्ट्रात माहेरघर मिळालेले आहे. पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, भातखंडे, भास्करबुवा बखले, प्रो. देवधर नारायणराव व्यास, विनायकबुवा पटवर्धन, रातंजनकर प्रभूनींनी अभिजात संगीताचा प्रसार भारतभर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेई. रहिमतखां, अबदुल करीम खां, अलादियाखा आणि या सर्वांचे शिष्य-प्रशिष्य यांनी महाराष्ट्रात अभिजात संगीत रसिकप्रिय केले. बझेबुवा, भास्करबुवा, मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, सुरेशबाबू, हिराबाई, केसरबाई, मोगूबाई, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, जसराज, जितेन्द्र अभिषेकी माणिक वर्मा, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू….

अशी उल्लेखनीय कलाकारांनी नामावळी फार मोठी आहे. ही नामावळी लांबवण्याचा मोह टाळून एवढेच नमूद केले पाहिजे की अखिल भारतातील गाणारे-बजावणारे कलावंत, मग ते थोर असोत की होतकरू, आपल्या कलेचे चीज करण्यासाठी महाराष्ट्राकडेच मोहरा वळवतात. ‘गानेवाले जगह जगह पर होते हैं सुननिवाले सिर्फ महाराष्ट्र में मिलते हैं’ हा एक बुजुर्ग गायकाचा- बडे गुलाम अलींचा अभिप्राय पुरेसा बोलका आहे. संगीताची उपासना करणाऱ्या लेकी सुना आणि पुरुषही महाराष्ट्रात घरोघरी आढळतील.

चित्रपटसृष्तीचा भारतातील मुळारंभ महाराष्ट्रात झाला. दादासाहेब फाळके भारतीय चित्रसृष्टीचे जनक आहेत. या कलेच्या विकासक्रमातला ‘प्रभातकाल’ महाराष्ट्रातच उगवला; आजही चित्रपटांमध्ये विविध दालनात अनेक नामवंत महाराष्ट्रीय कलाकार वावरत आहेत. चित्रपटातील पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ कलावती म्हणून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे नांव सर्व दुनियेत मशहूर झाले आहे.

महाराष्ट्रात आदिवासी जीवनपासून ते अत्याधुनिक नागरी जीवनापर्यंत कलासक्ती आणि सौंदर्यपूजा यांना फार महत्त्वाचे स्थान आहे आदिवासींचे सण-उत्सव गाण्यानाचण्यानेच साजरे होतात, वारली ठाकर, महादेव कोळी, कोकणे, गोंड, माडिया असे अनेक प्रकारचे आदिवासी समाज महाराष्ट्राची संस्कृती श्रीमंत करतात. तीच गोष्ट वंजारा, धनगर, मच्छीमार कोळी, इत्यादींची, भक्तींच्या मस्तीत नाचणारे, वाघ्ये आणि मुरळ्या, वासुदेव, भुत्ये, चित्रकथी, भराडी, गोंधळी असे अनेक प्रकारचे कलावंत महाराष्ट्रात पुर्वापार आहेत. शिवकालानंतर महाराष्ट्रात शाहिरी कलेचा विकासही खूप झाला. ` अकट-बिकट कवनांच्या चाली’ मधले पवाडे गाणारे शाहीर लोकमंच गाजवीत असतात. मोजक्या साथीदारांच्या मदतीने आणि डफ-तुण्याच्या साथीवर शाहिरी पवाड्याचा बुलंद आवाज ऐकू आला की मराठमोळ्या मनाला वेगळे स्फुरण चढते. देवळात भजन रंगते तर चव्हाट्यावर शाहिरी कला. उत्तर पेशवाईपासून लावण्याची रचना मराठी मनाला, भुलवू लागली. लावणीचे आकर्षण आजही कमी झालेले नाही. गण, गौळण, लावण्या आणि हजरजबाबी संवाद यांनी फुलवलेला तमाशाही रांगड्या मनाला पसंत पडतो. या तोकप्रिय कलांचे माध्यम स्वमतप्रसारासाठी भिन्न विचार प्रणालीच्या लोकांनी वापरलेले आहे. या सर्व कला सर्वार्थीं लोककला असल्यामुळे त्या शहरांतून, खेड्यांतून हजारोंच्या समुदायांपुढे सादर केल्या जातात. सनई-चौघड्यांच्या स्वरांत उगवलेला महाराष्ट्रातला दिवस भजनाच्या किंवा लावणीपवाड्याच्या किंवा नाट्यसंगीताच्या, किंवा अभिजात संगीताच्या स्वरांनीच संपतो.

भक्ती, शक्ती आणि कलासक्ती यांचे संगमतीर्थ म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या या गुणसंपदेचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. येथे भक्तीला समतेचे अधिष्ठान आहे. शक्तीला स्वातंत्र्यप्रेमाचे वरदान आहे. आणि कलाशक्तीची परिणती जीवनानंदात होणारी आहे. ही अस्मिता केवळ परंपरेतून आणि पूर्वजपूजेतून निष्पन्न झालेली नाही. तिला कालानुरूप भिन्नभिन्न स्वरूपे प्राप्त होतात. सामाजिक प्रबोधन, राजकीय जागृती, विधायक कर्तृत्व, कला आणि क्रीडा यांतील गुणोत्कर्षासाठी धरलेली ईर्ष्या ही या अस्मितेची आधुनिक रूपे आहेत. आधुनिक भारताच्या म्हणजेच गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासाकडे नजर टाकली तरी असे दिसेल की राष्ट्रनिर्मितीच्या आणि प्रगतीच्या हेतूने जे जे उपक्रम झाले त्यांत महाराष्ट्र बिनीवरच राहिलेला आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना आणि स्वातंत्र्याचे आंदोलन; धर्मसुधारणेचे प्रयत्न आणि समतेसाठी केलेले संघर्ष; ग्रामीण, पुनर्रचनेचे विधायक कार्य आणि ज्ञान-विज्ञानाची उपासना; कलाविकास आणि क्रीडा चातुर्य… लोकजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणे हा महाराष्ट्राचा नैसर्गिक स्वभावधर्म झाला आहे. राष्ट्रावर आलेल्या परचक्रांच्या वेळी ही महाराष्ट्राने आपला हविर्भाग आंनदाने दिला आहे.

महाराष्ट्र रांगडा आहे आणि रसिक आहे. झुंजार आहे आणि भाविक आहे. मराठी मातीच्या अभिमानाबरोबरच येथे सार्‍या देशाची चिंता आहे. ऐषआराम आणि मिजास यांच्यापेक्षा तो साधेपणा आणि सत्त्व सांभाळणारा आहे. महाराष्ट्र तत्त्वासाठी भांडतो आणि जीवनमूल्ये जपण्यासाठी निकराने झुंजतो; पन राष्ट्रापेक्षा आपण महान आहोत असे त्याने कधीही मानलेले नाही. महाराष्ट्राचे व्यक्तित्व म्हणजे केवळ गुणसंपदेचे भांडार नाही. जगात निर्दोष असे काय आहे? पीळ थोडा सैल केला, अभिमानाला अहंकाराचा वास मारू दिला नाही, निर्भय नि:स्पृह बाण्याला तुसडेपणाचि झाक आली नाही, `सत्यं ब्रूयात’ ला `प्रिय ब्रूयात’ ही जोड देता आली, तर महाराष्ट्र सर्वप्रिय होऊ शकेलही. पण मग तो कदाचित महाराष्ट्र राहाणार नाही. भारताच्या तारांगणात महाराष्ट्रा हा व्याधाचा तारा आहे. तेजस्वी. विविधरंगी. वैशिष्ट्याने डोळ्यात भरणारा. भारताचे सर्वच प्रदेश आपापल्या परीने सुंदर आहेत, तसा महाराष्ट्र ही सुंदर आहे आणि बाकी सर्वांच्या सौंदर्याला आधार देण्याएवढे त्याचे सामर्थ्य उदंड आणि उदार आहे. राष्ट्राने आपल्या सत्त्वशीलतेची कदर करावी आणि सेवा रुजू करून घ्यावी एवढेच त्याचे मागणे आहे.