आपला प्रदेश

लेखन वसंत बापट | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

आपला प्रदेश

ज्ञानेश्वरांच्याप्रमाणे शिवाजी महाराजांनाही प्रस्थापित समाजधुरीणांविरूद्ध झुंजावे लागले. छोट्यामोठ्या जहागिरी आणि वतने सांभाळीत बसलेल्या आणि केवळ स्वार्थाच्या लोभाने जुलमी सत्तेविरूद्ध हत्यार उचलावयास नाखूष असलेल्या सरदार वतनदारांचा शिवाजी महाराजांना विरोधच होता. मोरे, शिर्के, सुर्वे, सावंत प्रभूती त्या काळचे मातबर सरदार स्वराज्याच्या शत्रूच्या फळीतच राहिले. मराठी मातीतून छत्रपतींनी नवी माणसे उभी केली. मावळ खोऱ्यांतले मावळे आणि कोकणचे काटक कुणबी यांच्यामधूनच कर्तबगार माणसे तयार करून शिवाजी महाराजांनी प्रचंड साम्राज्य शाहीला हादरा देण्याचा चमत्कार करून दाखवला, ज्ञानेश्वरादी संतानी कर्मकांडाचा दबदबा नाहीसा करून जड धार्मिक नेतृत्वाचा निरास केला. नेमेकी अशीच कामगिरी शिवाजी महाराज आणि त्यांच्या धारकऱ्यांनी केली. सामान्यांतून असामान्य वीर पुरुष निर्माण केले. नवे लढाऊ राजकीय नेतृत्व जन्माला घातले. सूर्यवंश, चंद्रवंश असल्या मानीव कल्पनांचा अहंकार धरून खानदानाच्या खोट्या अभिमानाने क्षुद्र वतने सांभाळत बसलेल्या दिखाऊ सरदारांची मिजास शिवाजी महाराजांनी साफ उतरवली, पालकर, पासलकर, जेधे, मालुसरे, गुजर, महाडीक ही शिवकालातली नावे पहा. किंवा त्यानंतरही जाधव, घोरपडे, वगैरे वीरांची नावे पहा. हे सर्वसामान्य थरांतून वर आलेले नेतृत्व होते जे स्पष्ट आहे. पुढेही पहिल्या बाजीरावाने शिंदे, होळकर, गायकवाड असे नवे सरदार निर्माण करून हिंदुस्तानभर मराठ्यांचा अमल बसवला. `शिवाजीने सारे नूतनच केले’ असा अभिप्राय राचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रांत आहे. या नूतन पुरुषार्थात पराक्रम शक्ती, युक्ती, सावधानता हे शककर्त्याच्या अंगी स्वाभाविक असणारे विशेष गुण येतात. त्याप्रमाणे सामान्य माणसांकडून असामान्य कर्तृत्व करवून घेण्याची प्रतिभाही येते. शिवाजी महाराजांच्या थोरवीचा प्रत्यय त्यांच्या मृत्युनंतर येतो. १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यु झाल्यावर बलाढ्य औरंगजेबाशी सत्तावीस वर्षे मराठे गनिमी काव्याने लढत राहिले. निर्नायक झालेल्या महाराष्ट्राने प्रबळ मोगलशाहीशी दिलेली झुंज ही महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या तेजस्वी अभिमानाची ज्वलंत साक्ष आहे. औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत १७०७ साली मूठमाती मिळाल्यावर ही झुंज संपली. मोगल साम्राज्यशाहीचे पेकाट मराठ्यांनी असे मोडले की मिळमिळीत सौभाग्यासारखी ती दिल्लीली जेमेतेम टिकून राहिली इतकेच. मोगल साम्राज्याची ही कथा तर मग दक्षिणेतील दुबळ्या पातशाह्या नष्ट झाल्या असल्या तर नवल कसले?

`गरीबाच्या भाजीच्या काडीला दाम दिल्याशिवाय हात लावाल तर खबरदार. तसे केलेत तर यापरीस मोगल परवडला असे रयतेस होऊन जाईल'
- छत्रपतींचा दंडक

महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा विलक्षण अभिमान आहे. पुष्कळांना हा अभिमान अतिरेकी वाटतो. आजही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सर्व पक्षांचे, पंथाचे अनुयायी शिवछ्त्रपतींच्या विषयी असीम आदरभाव बाळगतांना दिसतात. या घटनेचे कारण नीट समजावून घेतले पाहिजे. प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवाजी महाराजांची स्वराज्यस्थापना म्हणजे सामान्य सत्तांतर नव्हते; ते युगांतर होते. कोणीही यावे आणि लुटावे, लुबाडावे हे चालू देणार नाही हा आपल्या राष्ट्राचा निर्धार शिवछत्रपतींच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालीले आहे. स्वराज्य म्हणजे काय आणि राजाचा धर्म कसा असावयास पाहिजे याचे महाराजांना विलक्षण स्पष्ट भान होते. त्यांनी जाणीवपूर्वक देनदुबळ्यांचा सतत कैवार घेतला. मस्तवाल लोकांनी चालवलेली स्त्रीच्या अब्रूची धूळदाण बंद केली. सैन्याने सर्व रसद सरकारातून घेतली पाहिजे आणि जरूरच पडली तर सर्व काही बाजारात किंमत मोजून विकत घेतली पाहिजे असा छत्रपतींचा दंडक होता. तो घालून देताना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांस बजावले होते `गरीबाच्या भाजीच्या काडीला दाम दिल्याशिवाय हात लावाल तर खबरदार. तसे केलेत तर यापरीस मोगल परवडला असे रयतेस होऊन जाईल’ अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरून त्या प्रजाहितदक्ष राजाची दृष्टी चोख होती . त्याला न्यायाची कदर होती आणि गरिबांचा कळवळा होता हे सहज समजते. त्यामुळे राजकीय यश आणि पराक्रम यांच्याबरोबर शिवाजी राजांच्या आदर्श राजधर्माची महती महत्त्वाची आहे. युरोपीय व्यापारी म्हणजे सामान्य व्यापारी नव्हत हे त्यांनी ओळखले होते. समुद्रावरुन येणाऱ्या आक्रमकांचा बंदोबस्त समुद्रावरच केला पाहिजे हे ओळखून त्यांनी अजिंक्य नौकादल उभारले. अशी दूरदृष्टी इतिहासकाळात कोणीच दाखवलेली दिसत नाही. शिवाजी महाराजांची दृष्टी धार्मिक भेदांच्या बाबतीत उदार होती, व्यापक होती. त्यांच्या सैन्यात मुसलामानांचाही भरणा होता. राज्यात हिंदु देवस्थाप्रमाणे, मशिदी आणि दर्गे यांचाही सांभाळ केला जाई. शिवाजी राजे अत्यंत न्यायी होते. प्रसंगी अपराध्यांना कडक शासन करावे लागले तरी त्यांची वृत्ती अंध, लहरी, दुष्टपणाची नसे. अपराध्याला शासन करून पुढीलांना जरब बसवावी असा त्यांचा हेतू असे. सहसा त्यांची वृत्ती क्षमाशीलतेची होती. जातीने मोहिमा कराव्या, आदर्श घालून द्यावा पण त्याबरोबरच कनिष्ठ सहकाऱ्यांकडून कामगिरी करून घ्यावी असे नेतृत्वाचे गुण त्यांच्या ठायी होते. आधीच्या सलतनती आणी पुंडपाळेगार यांच्या अन्यायी, जुलमी कारभारच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींची प्रजाहितदक्ष आणि न्यायाची भूमिका झळझळीपणे उठून दिसते. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राचा कायाकल्प झाला. आणि अठराव्या शतकात मराठ्यांचे कर्तृत्व झपाट्याने चहूदिशा पसरले.

मराठी मनाला या अलौकिक इतिहासाचा फार अभिमान आहे; क्वचित इतिहासाच्या अभिमानाचा अतिरेकही होत असेल. महाराष्ट्राचे त्रिदोष सांगताना विनोबांनी या अतिरेकाकडे अंगुलिनिर्देश केलेला आहे. पूर्वजांच्या गौरवावर भर देऊन आपली कर्तृत्वशून्यता छपवण्याचा प्रयत्न करणे अर्थातच गैर आहे. परंतु या गोष्टीला दुसरी एक बाजू आहे. या अभिमानानेच मराठ्यांचे सत्त्वरक्षण केलेले आहे आणि राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रेरणा सतत जागृत ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांच्या नंतरही पहिले बाजीराव पेशवे म्हणजे मध्ययुगातील एक अत्यंत श्रेष्ठ सेनापती. त्यांच्या मर्दुमकीने दिल्लीच्या पातशाहीचा पायाच उखडला गेला आणि मोगल सत्ता हे महादजी शिंद्याच्या हातचे खेळणे होऊन बसले. स्वराज्याचे साम्राज्य होण्याच्या या प्रक्रियेत शिवाजी महाराजांनी दिलेली व्यापक दृष्टी हळूहळू अंधुक होत गेली असली तरी ती अगदीच नष्ट झाली नाही. म्हणून तर १७६१ साली पानिपताच्या तिसऱ्या युद्धात अफगाण आणि रोहिले यांच्या आक्रमाणचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी फौजा उत्तरेत दौडत गेल्या. खैबर खिंडीतून कोसळणारी आक्रमणे थोपवलीच पाहिजेत या ईर्ष्येने सिंधु आणि काबुल नद्यांच्या संगमापाशी असलेल्या अटकच्या किल्ल्यावर धडकलेले होते याचा महाराष्ट्राला का अभिमान वाटू नये? त्यांच्या विजयी वारूची छाती पानपतावर फुटली पण म्हणून काही त्यांच्या पराक्रमाची, अवघ्या हिंदुस्तानच्या रक्षणासाठी त्यांनी प्रकट केलेल्या वीरश्रीची किंमत कमी होत नाही.

आपण हिंदुस्तानचे राज्य जिंकले ते शेवटी मराठ्यांचा पराभव करूनच याची इंग्रजांना पुरती जाणीव होती. मरहट्टे सूडाला, प्रवृत्त झाल्याशिवाय राहात नाहीत हेही त्यांना माहीत होते. इतर काही प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्राला केवळ निष्ठूर छ्ळाच्या बळावर गुलामगिरीत जखडता येणार नाही हेही त्यांनी ओळखले होते. म्हणूनच एकोणिसाव्या शतकात, वरकरणी सामोपचाराचा मुखवटा चढवून, इंग्रजांनी महाराष्ट्रावर सावध करडी नजर ठेवली. तरीही महाराष्ट्र शक्य तसे आणि शक्य तेवढे वैर करीतच राहिला. परकीय आक्रमक राज्यकर्त्यांना महाराष्ट्र कधीच मनोमन क्षमा करीत नसतो. सन १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना होऊन अखिल भारतीय राजकरणाचे नवे युग सुरू होण्यापूर्वी महाराष्टाची तेजस्विता कित्येकदा प्रकट झाली. हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धावरून आणि त्या नंतरही वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्यांच्या बंडखोरीवरून सहज कळून येते.

या सुमारे सहाशे वर्षांच्या कालखंडात भाषा आणि साहित्य यांची समृद्धी वाढत गेली. सुलभ भक्तिमार्गाच्या रूपाने एक धार्मिक परिवर्तन घडून आले आणि उज्ज्वल इतिहासाने एक नवा सामूहिक पुरुषार्थ अस्तित्वात आणला. चातुर्वर्ण्याला मूठमाती देण्याएवढी शक्ती या धार्मिक आणि राजकीय परिवर्तनात नसली तरी त्याची धार थोडी बोथट करण्यात महाराष्ट्राला यश आले असे म्हणता येईल. मध्ययुगीन भारताचे सर्व दोष आणि उणीवा अर्थात महाराष्ट्रातही आढळतातच. भौतिक विद्यांची हेळसांड इतकेच नव्हे तर एकूण शिक्षणाविषयी संपूर्ण अनास्था हा त्यांतील प्रमुख दोष होता. त्यामुळेच तर अधिक प्रगत विज्ञानापुढे आणि सामाजिक संघटनेपुढे भारताला- पर्यायाने महाराष्ट्राला शरणागती पत्करावी लागली. ते काहीही असो- महाराष्ट्राची जमेची बाजूही फार मोठी असल्यामुळे मराठी मुलखाचा स्वत: विषयीचा अभिमान अदम्य आणि अजिंक्य राहिला आहे.

नव्या युगाची चाहूल भारतात आधी बंगालला आणि नंतर महाराष्ट्राला लागली. परंतु बंगालमध्ये निर्माण झालेल्या नव्या प्रेरणा मुख्यत: धर्म आणि शिक्षण यांच्या क्षेत्रांतील होत्या. महाराष्ट्रात मात्र समाजसुधारणा आणि राजकीय आकांक्षा यांनी भारलेले महापुरुष जन्माला आले. स्वराज्यनाशानंतरचा अंधार जेमेतेम पन्नास वर्षेही टिकला नाही. नव्या प्रबोधन युगाची फुटल्याचे पहिले चिन्ह रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या लेखनात प्रकटते. आपल्या समाजची कठोर चिकित्सा करून, त्यांनी समाजाचा वरिष्ठपणा मिरवणाऱ्या ब्राह्मणांच्या खुळवट धार्मिक समजुतींवर आणि निरूपयोगी विद्येवर कडक टिका केली. सामजिक सुधारणेची प्रबल प्रेरणा निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्या लेखनाला दिले पाहिजे. १८५८ च्या आसपास भारतातील तीन प्रमुख विद्यापीठे जन्माला आली. त्यांतून बाहेर पडलेल्या काही नामवंत महाराष्ट्रीय सुशिक्षितांना नवी दृष्टी प्राप्त झाली होती असे म्हणता येईल. न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची नांवे येथे सहजच आठवतात समाजाला सर्वांगी नवीन बळ प्राप्त व्हावे म्हणून आयुष्यभर वैचारिक आणि सामाजिक कार्य करणारे न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थात्मक कार्याचा पाया घातला. राष्टीय सभेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोठा होता. प्रार्थना समाज स्थापना करून त्यांनी नवी धर्मप्रवणता प्रकट केली. भारतीय अर्थशास्त्रांचा पाया घातला. नव्या राष्ट्रवादाचा पहिला उद्‌गाता म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना आयुष्य अवघे बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांचे लेखन मुख्यत: ज्या निबंधमालेत प्रसिद्ध झाले, ती माला ते केवळ आठ वर्षे चालवू शकले. पण एवढ्या अल्प अवधीत आपला इतिहास, भाषा, संस्कृती आणि राष्ट्र याविषयींचा ज्वलंत अभिमान त्यांनी जागवला आणि हे कार्य करीत असतानाच मराठी गद्याला अपूर्व सामर्थ्य आणि तेज दिले. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतीबा फुले यांसारख्या थोर, त्यागी समाजसुधारकांनी एका नव्या समाजचे स्वप्न आपणापुढे उभे केले. लोकमान्य टिळक यांनी जनतेच्या शक्तीनेच पारतंत्र्य नष्ट होऊ शकले हा विश्वास अवघ्या राष्ट्राला दिला. `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही घोषणा करणाऱ्या निर्भय लोकमान्यांनी ब्रिटिश सत्तेला पहिला प्रचंड हादरा दिला. खडतर कारावासाने दबून जाण्याइतकी आपली आत्मशक्ती लेचीपेची नाही हे स्वत:च्या कृतीने त्यांनी सिद्ध केले. लोकशक्तीनेच स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण होऊ शकते आणि ती जागृत करणाऱ्या प्रत्येकापाशी धैर्य हवे. देहदंड सोसण्याची तयारी हवी ही शिकवण देणारा हा थोर राष्ट्रपुरुष ज्ञानेश्वर आणि शिवाजी यांच्या मालिकेत शोभू लागला.