MarathiMati.com - Android App on Google Play Store

वर्णसठीची कहाणी

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ डिसेंबर २००८

वर्णसठीची कहाणी | Varnsathichi Kahani

श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी, एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसरे पानावर वरणे (वाल) घ्यावे, त्याजवर दक्षिणा ठेवावी व ‘शंकर नहाटी, गौरी भराडी, हे माझ्या वर्णसठीचं वाण’ असं म्हणून उदक सोडावं, ते ब्राह्मणास द्यावं, असं दरवर्षी करावं. म्हणजे सर्व संकटं नाहीशी होतात. इच्छित मनोरथ प्राप्त होतात.

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला सात मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या, तसं त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं, “मुली मुली, तुम्ही कोणाच्या नशिबाच्या”? त्याच्या सहा मुलींनी उत्तर केलं, “बाबा बाबा, आम्ही तुमच्या नशिबाच्या”. सातवी मुलगी होती, ती म्हणाली, “मी माझ्या नशिबाची” हे ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं? सहा मुलींना चांगली चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली व थाटामाटानं त्यांची लग्ने केली. सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधी उठली होती. हातपाय झडून चालले होते. आज मरेल किंवा उद्या मरेल ह्याचा भरवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली, मुलीची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली.

पुढे थोड्याच दिवसांनी तो तिचा नवरा मेला. तसं त्याला स्मशानात नेलं. पाठीमागून तीही गेली. सर्व लोक त्याला दहन करू लागले. तिनं त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, “आता तुम्ही जा, जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल” असं सांगितलं. सर्वांनी तिला पुष्कळ समजाऊन सांगितलं. आता इथं बसून काय होणार? पण तिनं काही ऐकलं नाही. तेव्हां लोक आपापल्या घरी गेले.

पुढं काय झालं? तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं, तसा बापानं तिला टोला दिला की, “तुझं नशीब कसं आहे”? तिनं परमेश्वराचा धावा केला की, “देवा, मला आईबापानं सांडिया, मी उपजतच का रांडिया”? असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत रडत बसली. मग काय चमत्कार झाला? मध्यरात्र झाली. शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेनं जाऊ लागली. तसं पार्वती शंकराला म्हणाली, “कोणी एक बाई रडते आहे असं ऐकू येतं. तर आपण जाऊन पाहू या”. शंकरानं विमान खाली उतरविलं. दोघांनी तिला रडताना पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं. तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली. पार्वतीला तिची दया आली. तिनं सांगितलं, “तुझ्या मावशीला वर्णसठीचा वसा आहे. तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये, ते तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल” असं सांगून शंकरपार्वती निघून गेली. तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णसठीचा पुण्य घेतलं. इकडे आली, नवऱ्याला दिलं, तसा नवरा जिवंत झाला, रोगराई गेली. कांती सुंदर झाली. बायकोला विचारू लागला, “माझ्या हातापायांच्या कळा गेल्या. देह सुंदर झाला हे असं कशानं झालं”? तिनं सर्व हकीकत सांगितली.

मग दोघं नवराबायको मावशीच्या घरी गेली, तिला वर्णसठीचा वसा विचारला. ती म्हणाली, “श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसरे पानावर वरणे (वाल) घ्यावे, त्याजवर दक्षिणा ठेवावी व ‘शंकर नहाटी, गौरी भराडी, हे माझ्या वर्णसठीचं वाण’ असं म्हणून उदक सोडावं, ते ब्राह्मणास द्यावं, असं दरवर्षी करावं. म्हणजे सर्व संकटं नाहीशी होतात. इच्छित मनोरथ प्राप्त होतात. संतत संपत लाभते”. याचप्रमाणं तिनं केलं. सुखी झाली. माहेरी गेली. बापाला भेटली. त्याला म्हणाली “बाबा बाबा, तुम्ही टाकलं, पण देवानं दिलं”. पुढं सर्वांना आनंद झाला. तसा तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य : ज्याचे आचरण पवित्र असेल त्याचेच कल्याण होते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store