Download MarathiMati.com's New Android App from Google Play

सोमवारची साधी कहाणी

प्रकाशन: संपादक मंडळ | ९ डिसेंबर २००८

सोमवारची साधी कहाणी | Somwarchi Sadhi Kahani

चारी सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नानी भरली. सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली.

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. परत येऊ लागला, म्हणजे “मी येऊ? मी येऊ?” असा ध्वनि उठे. हा मागं पाही, तो तिथं कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारलं, “खायला प्यायला वाण नाही. मग बाबा, असा रोड का”? “खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येतेवेळेस मला कोणी “मी येऊ? मी येऊं?” असं म्हणतं. मागं पाहतो तो कोणी नाही. ह्याची मला भिती वाटते”. गुरुजी म्हणाले, “भिऊ नको, मागं काही पाहू नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्यामागून येऊ दे”.

मग शिष्यानं काय केलं. रोजच्याप्रमाणं स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. ‘मी येऊं?’ असा ध्वनी झाला. “ये ये” असा जवाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं.

त्यानंतर काय झालं. श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणूं लागला, “माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको”. आपण उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. सैंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामधे पती आला. “अग अग, दार उघड”. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्य नेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं चारी सोमवारी झालं.

सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघंजणं पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. “हा उजेड कशाचा”? “ताटी भरल्या रत्नांचा”. “ही रत्ने कुठून आणली”? मनात भिऊन गेली. “माझ्या माहेरच्यांनी दिली”. “तुझं माहेर कुठं आहे”? “वेळूच्या बेटी आहे”. “मला तिथं घेऊन चल”. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली. “मला अर्धघटकेचं माहेर दे”. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पाहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासूसासऱ्यांचीं आज्ञा घेतली. घरी परतलीं. अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही. शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत. बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यांत घातला. नवऱ्यांनं विचारलं, इथलं घर काय झालं?, “जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नानी भरली. सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली."

जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण

तात्पर्य : देव भक्ताचा पाठीराखा असतो.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play