पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

सोमवारची फसकीची कहाणी

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ डिसेंबर २००८

सोमवारची फसकीची कहाणी | Somwarchi Phasakichi Kahani

‘जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.

ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यांत एक गरीब सवाशीन बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नानं करावं, पूजा घ्यावी, एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळीं, “जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी” असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं, असं चारी सोमवारी तिनं केलं.

शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ति केली.

शंकरांनी तिला निरोप पाठविला. “अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे”. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं.

तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Book Home in Konkan