Download MarathiMati.com's New Android App from Google Play

शनिवारची मारुतीची कहाणी

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ डिसेंबर २००८

शनिवारची मारुतीची कहाणी | Shanivarchi Marutichi Kahani

“बाबा, घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू”? माझ्यापूरतं घागरीत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं, असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला.

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती. एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात असत. भिक्षा मागून आणीत असत. सून घरात बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासऱ्यांना वाढीत असे. उरलंसुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. “बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल”. “बाबा, घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू”? “माझ्यापुरतं तेल घागरीत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घाल.” घाघरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला.

इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकीनी घर भरलं. सासूसासरा देवाहून आली, तो घर काही ओळखेना. हा वाडा कुणाचा? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. “मामंजी, सासूबाई, इकडे या”. “ अग तू कोणाच्या घरात राहिली आहेस?” तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. “बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल”. “बाबा, घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू”? माझ्यापूरतं घागरीत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं, असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले.” असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली.

त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो.

तात्पर्य : मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा. त्या परोपकाराचे फळ त्याला मिळतेच.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play