Download MarathiMati.com's New Android App from Google Play

बुध - बृहस्पतींची कहाणी

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ डिसेंबर २००८

बुध - बृहस्पतींची कहाणी | Budh Bruhaspatichi Kahani

श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.

ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहीत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले”. सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विन्मुख जातात.

ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, “आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखी होऊ, असा काही उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढते आहे.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली.

इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवर्‍याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले, तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.

जशी त्यांवर बुध-बृस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत.

ही साठां उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play