Marathi Magazine | मॅगझीन

म्हारो प्रणाम..!

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, १६ जुन २०१०

शिवानी कराडकर

shivanikaradkar[AT]gmail.com

Kishori Amonkar

वयाच्या नेमक्या कितव्या वर्षापासून आई मोगुबाई कुर्डीकर यांनी गाणं शिकवायला सुरूवात केली?

-माझी गुरु, माझी आई गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर; मी तिला 'माई' म्हणायचे. माझ्यावेळी ७ व्या महिन्याची गरोदर असताना माईने तिच्या गुरुकडे गाणं शिकायला सुरूवात केली. म्हणजेच गर्भातच माझ्यावर गाण्यांचे संस्कार झाले, त्यामुळे मी म्हणेन की मी गर्भश्रीमंत आहे. जसे ज्ञानेश्र्वर माऊली म्हणतात 'आम्ही श्रीमंत कारण आमचे गुरु श्रीमंत.' तशीच श्रीमंत गुरुपरंपरा मला पुढेही लाभली. अर्थातच ही श्रीमंती पैशांची नव्हे तर ज्ञानाची! माझा जन्म मुंबईतच झाला आणि शिक्षण गिरगावच्या राममोहन इंग्रजी शाळेतून
झाले.

लहानपणापासून गायिका होण्याचे मनाशी पक्के केले होते का?

-अजिबात नाही! खरं तर लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्र होतं माझं. शाळेत असताना मी स्पोर्टस्‌ मध्ये चँपियन होते. प्रत्येक खेळात पहिली यायचे. आजही मी उत्तम टेबलटेनिस खेळते. या सर्व खेळांच्या भानगडीत मी कॉलेजच्या प्रथम वर्षी नापास झाले, मग पुन्हा परीक्षा दिली आणि पास झाले. मात्र दुसर्‍या वर्षी परीक्षेच्या वेळी मला डोळे आले. प्राध्यापकांना विनंती करूनही त्यांनी परिक्षेला पुन्हा बसण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे मी घरी आले आणि माईला म्हणाले, मी यापुढे कॉलेजला जाणार नाही. माई म्हणाली, ठीक आहे, तुला शिकायचे नसेल तर गाणं कर! आणि तिथेच माझ्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. तरी डॉक्टर व्हावं असं नेहमी वाटे, कारण माझ्या अंतःकरणात लहानपणापासूनच बीज होतं, लोकांचे रोग बरे करायचे, लोकांना बरे वाटले पाहिजे, हे बीज नकळतच माझ्या संगीतात आले. मोठेपणा सांगत नाही, पण माझं गाणं ऐकून खूप लोकांना बरं वाटतं!

खरंय किशोरीताई, तुमच्या गाण्याचा सर्वसामान्य माणसांवर नव्हे तर आजूबाजूच्या निर्सगावरही परिणाम झाल्याचे अनेक किस्से आम्ही ऐकले आहेत.

-होय. अगदी नुकताच घडलेला प्रसंग सांगायचा झाला तर गोव्यात तांबडासुरला येथे एक प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर आहे. वनिता, सांग यांना काय झालं तिथे! (शेजारीच उभ्या असलेल्या गुरूकुल पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या कु. वनिता तांबोसकर या आपल्या शिष्येला किशोरीताईंनी हा प्रसंग सांगण्यास सांगितले व तिने हा प्रसंग कथन केला.)

'आम्ही तिथे भल्या पहाटेच पोहोचलो. सकाळच्या त्या शांत वातावरणात ताईंनी हातात स्वरमंडल घेऊन 'बिभास' राग आळवायला सुरूवात केली आणि बघते तर काय थोडयाच वेळात तिथे एक कुत्रा आला. आणि कोणतीही हालचाल न करता शांत बसला. त्यांनतर काही वेळाने एक-दोन गायी आल्या. त्यानंतर हळूहळू देवळाच्या परिसरातील झाडांवर माकडांची जमवाजमव सुरू झाली. पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. आजूबाजूच्या वातावरणात अचानक झालेला हा बदल आमच्या सगळ्यांच्या लक्षात आला. हा बदल म्हणजे नक्की काय? जिथे फारसं कुणी फिरकत नाही अशा या मृत वातावरणात अचानक हे चैतन्य कसं आलं? तर ही ताईंची जादू, त्यांची मोहिनी....!' (इथे किशोरीताईंनी तिला हटकलं) नाही, ही किशोरी नाही. बिभास राग कशा पद्धतीने जायला हवा हे एक दाखवणारी मी
एक बाहुली आहे. हा सुरांचा प्रभाव आहे. किशोरी आमोणकरांचा नाही. हे आजकालच्या गाण्यांमध्ये सुरांचा प्रभाव होतच नाही. कारण त्यामागचा भाव हा शब्दात मांडतात. निखळ सुरांना शब्दांना आणि बाह्यतालांना जेव्हा स्वरांची जोड असते तेव्हा शब्द आणि ताल यांचे सौंदर्य अधिक खुलतं. परंतु सुरांना जेव्हा शब्दांची आणि तालांची जोड दिली जाते तेव्हा तिथे स्वरांचं प्राधान्य आणि शक्ती कमी होते आणि प्रभावही!

आईच्या कडक शिस्तीत गाण्याचा अनुभव कसा होता?

-आईची शिस्त जबरदस्त. आम्ही लहानपणापासून गरिबीत वाढलो. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांचे निधन झाले. मी आणि माझी दोन भावंडं असं तीन मुलांना सांभाळायचं, त्यांना खाऊपिऊ घालायचं, शिक्षण द्यायचं, संस्कार करायचे. अशा जबाबदारीत आईने जर नुसती मायेची, वात्सल्याची भूमिका सांभाळली असती तर आज आम्ही जे आहोत ते झालोच नसतो. आईने गाण्याच्या बाबतीत माझ्यावर कधीच दबाव आणला नाही. आईला स्वतःला फिल्ममध्ये गायचे कितीतरी चान्सेस आले होते पण आईने ते नाकारले. तसेच मलाही पैसे मिळवण्यासाठी कधी फिल्ममध्ये टाकलं नाही. गरिबीमुळे गाणी ऐकायला आमच्याकडे साधा रेडिओही नव्हता. मला आठवतंय, आम्ही ज्या चाळीत राहायचो तिथे आमच्या खोलीत मी जमिनीला कान लावून खालच्या घरात चालू असलेला रेडिओ ऐकायचे. माझी ही गाण्याची आवड लक्षात घेऊन माईने माझ्यासाठी 'मर्फी' आणला. एकदा मी एका कलाकारासंदर्भात माईसमोर वाईट बोलले. त्यावेळी माई फक्त एवढेच म्हणाली, तुम्ही काय बाबा, किशोरी आमोणकर, तुम्हाला सगळं येतं. आता मोठया आहात ना तुम्ही, कुणाहीबद्दल काहीही बोलू शकता तुम्ही. माईच्या या उत्तराने मला माझी चूक कळली. आणखी एक प्रसंग आठवतो. एकदा एका महिन्यात मला आठ कार्यक्रम आले़ मी माईला याविषयी आनंदाने कळविले. जास्त कार्यक्रम मिळाल्याचा माईला आनंद झाला. पण ती म्हणाली, प्रत्येक कार्यक्रमासाठी जायला-यायला चार दिवस आणि असे आठ कार्यक्रम म्हणजे ३२ दिवस गेले म्हणजे पूर्ण महीना फुकट गेला़ मग यात तू गाण्याचा सराव कधी करणार. एका रागाची साधना नीट कर आणि मग गा. गाता येतं म्हणून भरमसाठ गायचं नाही. तेव्हापासून मी महिन्यात दोन पेक्षा जास्त कार्यक्रम करत नाही.

विविध चॅनेल्सवर सुरू असलेल्या कुठल्याच संगीतस्पर्धेसाठी तुम्ही परीक्षक म्हणून जात नाही, याचं नेमकं कारण काय असावं?

-कसं आहे, लोकांना आवडतं म्हणून गाणं आणि लोकांचं बरं व्हावं म्हणून गाणं हाच अभिजात संगीत आणि सुगम संगीतातील फरक आहे. टीव्हीवरच्या स्पर्धांमध्ये युद्ध, महायुद्ध, मुकाबला असतो. असं का? जे संगीत शांतीसाठी असतं तिथे युद्ध का खेळता तुम्ही? दुःख होतं मला. दोन दोन मिनिटे गाण्यांचं सादरीकरण असतं. हे स्वरविश्र्व जे प्रत्येक रागामध्ये व्यापक भावाचं स्वरुप दाखवतं ते तुम्हाला असं दोन मिनिटात मिळेल का? मी अशा ठिकाणी परीक्षक म्हणून गेले नाही आणि जाणारही नाही. मध्यंतरी एका निर्मात्याने मला सांगितले, 'अगर आपको ये अच्छा नही लगता तो ये बोलिए वहां पर' म्हणजे हे बोलायला जाऊ मी तिथे? एसएमएस वर, जाहिरातीवर पैसे, काय चाललंय काय? मी यातली नाही म्हणून मी दूर रहाते. मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहाते यात काही वाईट आहे का? एकतरी शास्त्रीय संगीताचं चॅनेल हवं टीव्हीवर. पण आजकाल नुसता तमाशा चाललाय.

आजूबाजूचं जग व्यवहारी आहे, तुमच्या काळातही होतं, मग आजच्या काळातही तुमचा सूर निराशावादी का?

-अभिजात संगीत गाणारा कोणी शास्त्रीय गायक मला आत्ताच्या जगात सापडतच नाही. मी माझं गाणं कधीही विकणार नाही आणि परदेशात जाऊन ज्यांना गाणं कळत नाही त्यांच्यासाठी मी कधीही गाणार नाही. इथले मोठेमोठे शास्त्रीय गायक, वादक परदेशात जाऊन स्थायिक होतात. Established Schools काढतात. तिथल्या मुलांना शास्त्रीय गायन शिकवतात. मग इथल्या मुलांना कुणी शिकवायचं! आणि परदेशातील लोक तरी कितीसे क्लासिकल गातात. मला इथल्या मुलांना अभिजात संगीत शिकवायची इच्छा आहे. परंतु जागेसाठी मला सरकारपुढे हात पसरावे लागतात.

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांपेक्षा गानसरस्वती किशोरी आमोणकर जास्त Talented जास्त Superior आहेत, हे सर्वसामान्यांचं विधान अन्यायकारक आहे असं वाटतं का?

-मी आणि माझी गुरु, माई आम्ही जयपूर घराण्याच्या, ज्यांना साक्षात सरस्वतीचा साक्षात्कार झाला आहे अशा गानमहर्षी अल्लादियां खाँ साहेबांच्या परंपरेतल्या. माई घराण्याच्या गायकी पलीकडे कधी गेलीच नाही. ती घराण्याला एकनिष्ट राहिली. पण मी जेव्हा केसरबाई, मल्लिकार्जुन मन्सुर, बडे गुलाम अली यांची गाणी ऐकली तेव्हा त्यांच्या गाण्यातील वेगळेपण मला भावलं. सुरांची वेगवेगळी चलनं दिसून आली. परंपरेनुसार माईने मला जे शिकवलं त्या पलीकडे गाण्यात काही आहे ते मी शिकले. मला घराणी नको होती, परंपरा नको होती, हवा होता फक्त सूर. जिथे जिथे गाणं आहे तिथे तिथे सुर आहे. मग तो सुगम संगीतातही आहे, त्यामुळे मी सुगम संगीत शिकायला सुरूवात केली. त्याकाळचे एक सुगम संगीत गायक श्री. विठ्ठल पै हे माईला म्हणाले, 'मोगू तुझ्या किशोरीचा आवाज हत्ती आहे गं, हालतच नाही, काय करू?' त्याचे हे शब्द कानावर पडले. मी जातीवंत इगोइस्टीक बाई. त्वेषाने गाण्यांचे सगळे प्रकार शिकायचं ठरवलं.

हुस्नलालजींकडे 'गझल' शिकले. आग्रा घराण्यातील अन्वर हुसेन खाँ साहेबांनी मला 'बहादुरी' शिकवली. ते म्हणायचे, तुझ्या आईच्या स्टाईलमध्ये गा. कारण माझा आवाज रूक्ष आहे. मी मोहन पालेकरांकडे अस्थाई अंतरा शिकले आग्रा घराण्यांच्या विलायत खाँ साहेबांकडे तराणा शिकले. माईसोबत सारंगीची साथ करणारे दत्ताराम परोदकर उर्फ अण्णा यांनी मला तंबोरा कसा लावायचा, सूर कसा असतो, रागामध्ये शुद्ध व विकृत स्वर लावायची काय पद्धत असते, हे शिकवलं. तसेच नत्थन खाँ साहेब, लक्ष्मीबाई जाधव, भेंडीबाजार घराण्याच्या अंजलीबाई मालपेकर यांच्याकडे मी विविध गाणी शिकले. शाब्दिक संगीत, तालबद्ध संगीत, स्वरसंगीत सगळं शिकले. लहानपणी गाणं शिकताना मी ज्यूतिका रे, तलत मेहमूद, बडे गुलाम अली यांच्या गाण्यांची नक्कल करायचे. स्वरांच्या पद्धती त्यांचे लगाव, त्यातले खटके, मुरक्या, फिल्मी गाणी, नाटकातली पदं ही सगळी स्वरांची भाषा मी आत्मसात केली आणि ती मला अवगत झाली. स्वरभाषेचे व्यापकत्व हे फक्त मला माझ्या घराण्यात मिळालं नसतं. ज्या ज्या ठिकाणी स्वर असतो, उदा. वाद्यात, तंतुवाद्यात, कंठात या सर्वात मी स्वरांचे विश्र्व जाणण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे लेखकाचं जसं भाषेवर प्रभुत्त्व असतं तसंच एक कलावती म्हणून मी माझ्या गाण्यावर माझं प्रभुत्त्व आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज गाण्याचे सर्व प्रकार मी गाऊ शकते.

लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याबरोबर व्यक्तिगत संबंध आहेत का?

-व्यक्तिगत संबंध नाहीत. आशा भोसले ही अतिशय अष्ठपैलू गायिका आहे. ती काहीही करू शकते. याउलट लतादीदींनी ठराविक गाणी गायचा फोकस ठेवला आणि त्यांनी तेच केलं. दोघींची क्षेत्र वेगवेगळी. पण दोघीही एक्ट्रा ऑर्डिनरी. मी असं ऐकलंय, नवोदित गायकांना आशाताई नेहमी सांगतात, तुम्हाला शास्त्रीय गायिका व्हायचं असेल तर किशोरी आमोणकर सारखे व्हा. खूप मोठया मनाच्या आहेत त्या.

कलाकार हा स्वतःच्या कलेबाबात जितका Sensitive असतो तितका तो समाजातील दुःख, दैन्य आपत्ती याबाबत Sensitive नसतो. असं म्हटलं जातं. तुमच्या शास्त्रीय संगीतातील मान्यवर समाजाच्या दुःखाच्यावेळी पुढे आलेले बघितले नाहीत. याचं नेमकं कारण काय?

-सर्वप्रथम मी सांगेन, इतर कलाकारांबद्दल बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही. पण मी अनेक ठिकाणी चॅरिटेबल कार्यक्रम केलेत आणि करते. पण या गोष्ठींचा मी कधी गाजावाजा आणि प्रदर्शन केलं नाही. आम्ही दिसत नाही म्हणजे काय? नुकताच सुनामीग्रस्तांसाठी आम्ही विनामूल्य कार्यक्रम करून त्यांना तेरा लाख रुपयांची मदत केली. कॅन्सररिसर्च सोसायटीच्या मदतीसाठी मी व हरिप्रसाद चौरसिया आम्ही दोघांनी जुगलबंदीचा कार्यक्रम केला. असे अनेक कार्यक्रम केलेत. म्हणजेच मानधन कमी घेऊनही आम्ही समाजाचे देणं चुकवतो.

Class आणि Mass हा परस्पर संबंध शतकांपासून आहे. यालाच अनुसरून फिल्मी गायिकेला जनमानसात जास्त मानाचं स्थान
मिळतं, त्या मानाने शास्त्रीय गायकांना कमी प्रसिद्धी मिळते. याबाबत आपलं मत काय?

-नाही. इथे भेदभाव करण्याचा प्रश्नच नसतो. सध्याचं जग फास्ट ट्रॅकवर चालत असल्यामुळे कुठल्याही गोष्ठीच्या साधनेला वेळ मिळत नाही, अशी कारणे दिली जातात. परंतु आम्हीही त्याच जगात जगतोय. नाटकाला किंवा सुगम संगीताला उत्तम मानधन दिलं जातं, परंतु शास्त्रीय गायकांच्या मानधनाबाबत खूप भेदभाव केला जातो. शास्त्रीय संगीत टिकवण्यासाठी फक्त सरकारकडूनच नाही तर जनतेकडूनही तितकेच प्रयत्न व्हायला हवेत. गायक काहीही गाऊ दे पण श्रोत्यांनी विदग्ध ऐकलं पाहिजे. उच्च दर्जाचं गाणं ऐकण्याची तयारी हवी. पण गोष्ठी जेव्हा मर्यादेच्या पलीकडे जातात तेव्हा गप्प बसलेलंच बरं असतं.

तुमचा वारसा पुढे जोपासू शकेल असा आशेचा किरण तुमच्या कोणत्या शिष्यात दिसतो?

-माणसाकडे मूलतः जिज्ञासू वृत्ती असते. परंतु ती आपल्या विषयात असावी असं मला वाटतं. माझ्या शिष्यांपैकी रघुनंदन पणशीकर, नंदिनी बेडेकर हे उत्तम गातात. त्यांच्या गाण्यात कोणत्याही प्रकारची मिमिक्री, कसरत किंवा भांडाभांड नसते. त्यांची साधना अशीच चालू राहिली तर मला आशा आहे ते माझा शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे चालू ठेऊ शकतील. माझी नात तेजू ही आता गाऊ लागली आहे.

ती खर्‍या अर्थाने माझी Follower होऊ शकेल इतकं तिचं गाणं दर्जेदार आहे.

आजपर्यंत तुम्ही गायलेल्या गाण्यांमध्ये तुमचं सर्वात आवडतं गाणं कोणतं?

-मी जसजसे राग शिकत गेले तसतशी मी त्याच्या प्रेमात पडत गेले, प्रत्येक राग सुंदर आहे कारण प्रत्येक रागाच्या वातावरणाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा जो आनंद होतो तो कुठल्याही रागातून होऊ शकतो हे मला कळलं. जिथे सुख ही नाही आणि दुःख ही नाही अशी जी मनाची चैतन्यमय भावना असते त्याला आनंद म्हणतात, साम्यावस्था म्हणतात. त्यामुळे कुठलही गाणं आणि कुठलाही राग माझ्या साठी चागला वाईट असं काहीच नाही.

आपल्याला गाण्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्ठींची आवड आहे?

-मी मघाशीच म्हणाले, त्याप्रमाणे माझ्यातील जिज्ञासूवृत्ती मला नेहमी सांगते, किशोरी तुला फक्त गाणंच नाही सर्व यायला पाहिजे. त्यामुळे मी अनेक गोष्ठी शिकले. उदा; विणकाम, रांगोळी काढणे. मी रांगोळीत दीनानाथ दलाल, रवी वर्मा यांची चित्र काढायचे. सणासुदीला तर १५- १८ तास रांगोळी काढायचे. याशिवाय मी भरतकाम तसेच, साडीवर पेंटिंग करायचे. या सर्व गोष्ठींचा मला सुरांसाठी उपयोग झाला.

त्यामुळे मी गाण्यातलं सूक्ष्मत्व शोधायला शिकले! मला निसर्गाचं खूप वेड आहे. शिवाय मी बर्‍यापैकी वाचन करते. संत साहित्य, आध्यात्मिक साहित्य, संगीत साहित्य वाचायला मला खूप आवडतं. मला साने गुरूजींची पुस्तके आवडतात तसेच भा.रा. तांबे हे माझे प्रिय कवि आहेत. माझे पती श्री रविंद्न यांच्यामुळे मला पूर्वी क्रिकेटच्या मॅच पाहायची आवड निर्माण झाली होती. आजकालचं क्रिकेट आवडत नाही.

आपण दैववादी आहात का प्रयत्नवादी आहात? 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे', असा माझा विचार. प्रयत्न करणे हा माणसाचा गुणधर्म आहे त्यातून यश मिळेल न मिळेल माहीत नाही. स्वरांचं एक अमूर्त विश्र्व आहे. कुठल्याही रागाला आपण नको असतो, आपल्याला त्या रागाची गरज असते, हे आपण विसरतो. रागाचं सौदर्य भव्य दिव्य अपरिमित असल्याने मैफिलीपूर्वी किंवा घरीसुध्दा गाताना मला कधीच आत्मविश्र्वास नसतो. मी रागाशी संवाद साधण्याचा त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी मला आजूबाजूचे भान नसते.

मोगूबाई नशीबवान होत्या कारण त्यांच्याकडे साथीला किशोरीताई होत्या. किशोरीताई स्वतःला नशीबवान समजतात का?
-नाही. बिलकुल नाही. अशासाठी की मैफिल सुरू करताना रागाच्या अस्तित्वाचा जो पगडा माझ्या मनावर असतो तो मागे बसून साथ
करणार्‍याकडे नसतो. पण तरीही माझ्या साथीदारांचं मला कौतुक अशासाठी आहे की गाता गाता त्या रागाशी एकरूप होऊन मी एका
विशिष्ठ पातळीवर गेले की मला त्या साथीदारांची गरजच भासत नाही आणि त्यांनाही ते बरोबर कळतं ही त्यांची किमया आहे.

मोगूबाईंनी तुमच्या अनुपस्थितीत तुमची कधी कुणाजवळ स्तुती केली आहे का?
-माझ्या अनुपस्थितीत ती नेहमी म्हणायची मी तिची उत्तम विद्यार्थिनी होते. पण माई ज्या पद्धतीने बोलतान घ्यायची, त्या
तानेत ती ज्या पद्धतीने अक्षरे गुफांयची ते मला आजही येत नाही.

राजकारणात चित्रपट क्षेत्रात आणि अगदी संगीत क्षेत्रातही घराणेशाहीची परंपरा आहे. तुम्ही या घराणेशाहीला मानता का?
-मी घराणेशाही मानतच नाही. माझ्या आवाजाची, बुद्धिची, मनाची एक कुवत आहे. त्याप्रमाणे मी गाणं तयार करते. त्याच पद्धतीने मी
माझ्या मुलांना शिकवते व तेही त्याच पद्धतीने पुढे गातात अशी ही घराणेशाहीची पद्धत. उदा. भीमसेन जोशी हे सवाई गंधर्वांकडे गाणे
शिकले पण त्यांनी स्वतःचं असं संगीताचं विश्र्व केवढं वाढवून ठेवलं. त्यांच्या आणि सवाई गंधर्वांच्या गाण्यात खूप फरक आहे. मी
सगळी घराणी अभ्यास करून शेवटी मानव घराणं पाहिलं. आमच्या जयपुर घराण्यात जास्त आलापीची पद्धत नाही. पण मी माझ्या
गाण्यात आलापीचा जास्त वापर करू लागले. कलेमध्ये एक साधेपणा असतो. स्वरातलं गांभीर्य, सौंदर्य दाखवण्यासाठी आपण जो स्वर
लांबवतो त्याला आलापी म्हणतात. काही हलके फुलके राग असतात, ज्यासाठी ही गती जलद करावी लागते. पण ज्या पद्धतीने आलापी
करते ती वेगळी आहे.

तुमच्या समकालीन गायक गायिकांच्या काही खास अशा आठवणी आपण सांगू शकाल का?
-भीमसेन दादा आज खूप मोठा कलाकार आहे. पण त्याच्याविषयीची एक आठवण मला नक्कीच सांगायला आवडेल. आम्ही एका
कार्यक्रमासाठी अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला भयंकर थंडी, रात्रीच्या वेळी बाहेर मी एका साध्या खाटल्यावर झोपले होते. तेव्हा
तिथून भीमसेन दादा चालला होता. त्यांचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, अरे रे, अशी थंडीत उघडयावर कशी झोपली आहे ही? त्याने
ताबडतोब त्याच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली. तो भीमसेन दादा मी आजही विसरत नाही. माणसं बदलतात, मी नाही
बदलले. ही माझ्या गुरूंची कृपा आहे. I have kept myself very simple. I like to be simple because nature is Simple and Beautiful.
खूप पूर्वी मल्लिकार्जुन मन्सुर यांनी एका कार्यक्रमात विभास राग गाताना लावलेला ऋषभ मला आजही लक्षात आहे. या क्षेत्रात माध्यमाची कसरत करून गाणारे लोक श्रोत्यांना आवडत असतील पण आम्हाला आमच्या गुरूंनी जो रस्ता दाखवलाय तो हा नाही. आम्ही अध्यात्माकडे झुकलेली माणसं आहोत.

आपल्या स्वभावाबाबत जाणूनबुजून निर्माण केलेल्या प्रवादांमुळे लोकांचे गैरसमज होऊन कार्यक्रमाला बोलावण्यासाठी लोक घाबरतात.
-मी जेव्हा शास्त्रीय संगीत गायला बसते तेव्हा मी समोरच्या प्रेक्षकांमध्ये माझा देव पाहते. मी त्याची सेवा करते. तिथे जर हे प्रेक्षक चित्रविचित्र आवाज करत असतील, तर ते मला सहन होत नाहीत. गाणं सुरू असताना मधूनच उठून जाणं, सिगरेट फुंकणं या गोष्ठी मला मान्य नाही. हा माझा नाही तर माझ्या ज्ञानाचा अपमान आहे. आणि याला जर मी आळा घातला तर मी वाईट ठरते. तुम्हाला एक प्रसंग सांगते, काश्मिरमध्ये गुलमर्गला माझा कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत समोर दोन बायका मला पान खाताना दिसल्या. ते पाहून मला राग आला. मी म्हणाले, 'ही कोठी नाही. इथे दैवी संगीत चालू आहे. पान खायचं असेल तर बाहेर जाऊन खाऊ शकता. इथे माझ्यासमोर नको.' हा प्रसंग नंतर उलटसुलट चर्चा होऊन भलत्याच प्रकारे माझ्या कानी आला. अशी अनेक उदाहरणे आहेत. माझं जे काही बरं चाललंय ते जर दुसर्‍यांना बघवत नसेल तर ते अशाप्रकारे माझा अपप्रचार करतीलच. मला बरेच लोक येऊन सांगतात, तुमच्याबद्दल हे ऐकलं, ते ऐकलं. मी म्हणते असू दे. समर्थन करायची गरज नाही. जी बाई लोकांच्या हितासाठी गाण्याची इच्छा धरते, ती अशी कशी असेल. पूर्वी शास्त्रीय संगीत गाणार्‍या बायकांना खालच्या दर्जाचं समजलं जायचं. परंतु अशा एखाद्या पुरूषाने जर शास्त्रीय संगीत गायलं तर त्यांना असा कुठलाही निकष लागू नव्हता. मी शुद्ध आहे पवित्र आहे. म्हणून माझ्या बद्दल वाईट बोललं जातं.

तुम्ही म्हणे गाण्यापूर्वी संयोजकांना माईकवर गजरा टाकायला सांगता हे ही खरं आहे का?

-हा माझ्याविषयी आणखी एक गैरसमज, की माईकवर फुलांचा गजरा टाकल्याशिवाय मी गायला बसत नाही. खरं म्हणजे फुलांच्या वासाने त्रास होतो. पण गायला जाताना जर मला कुणी गजरा दिला तर तो मी माईकवर ठेवते कारण माईक माझ्यासाठी पवित्र आहे. लोक असेही म्हणतात की कार्यक्रमाला पाढंरी मर्सिडीज पाठविल्याशिवाय किशोरीताई येत नाहीत. अहो इथे अनेक कार्यक्रमाला मला टॅक्सी पाठवून पण आयोजकांनी माझा अपमान केल्याचे अनेक किस्से आहेत. माझ्या मानधनात कबूल करून कमी मानधन दिल्याचे एक नाही अनेक किस्से आहेत. मला मिळालेल्या वाईट वागणुकीचे, आणि माझ्या बद्दलच्या अपप्रचाराचे एक मोठं पुस्तक करता येईल. पण जाऊदे राघवेंधला संगळं माहीत आहे. माई नेहमी सांगायची, खोटं बोलू नको. सूर खोटा लागेल; वाईट विचार करू नको, भाव वाईट होतील. आम्ही आजही तिच्याच आधाराखाली आणि प्रभावाखाली जगतो असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. मी चारचौघात का मिसळत नाही? मी स्वतःला कुणी मोठी व्यक्ति मानत नाही, पण जवळीक साधणारी, खरी प्रामाणिक माणसं कमी आहेत आणि ती मला मिळत नाहीत हे माझं दुर्भाग्य आहे. या जगाच्या खोटेपणाचा कंटाळा येतो. आमच्यावर लहानपणापासून 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' हे संस्कार मनावर असल्यामुळे आम्ही जे बोलतो तेच करतो. जिथे खरेपणा नाही असं खोटं जग मला आवडत नाही.

किशोरीताईंनी एका मैफिलीपुर्वी झाडावर पडदा टाका असं सांगितल्याचा एक किस्सा प्रसिद्ध आहे, यात कितपत तथ्य आहे?

(या प्रश्नाच्या उत्तरासह उर्वरित मुलाखत पुढील अंकात)

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer