समतोल आहाराचे महत्त्व

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑक्टोबर २०११

समतोल आहाराचे महत्त्व | Samatol Aaharache Mahatva - Page 5

गांधीजी आपल्या आहारशास्त्रात म्हणतात की, रोजच्या जेवणात समतोल आहार आसावा. त्यात शक्तिवर्धक घटक असावेत, शरीरस्वास्थासाठी मिठाची तितकी आवश्यकता नाही. पालेभाज्या व फळातून नैसर्गिक स्वरूपात आपल्या शरीराला मीठ प्राप्त होतेच. म्हणून मिठाचा अतिरेक टाळावा. तसेच आरोग्य शास्त्राच्या दृष्टीने साखर तर निषिद्ध आहे. आपल्या शरीराला असणारी शर्करा फळे, पालेभाज्या, कच्च्या पदार्थापासून मिळू शकते. कोठा साफ राहील असा हलका आहार असावा.

मासपेशींचा विकास करणाऱ्या घटकद्रव्यास प्रथिने असे नाव असून ती मांस, अंडी, दुध, डाळी व फळे यापासून मिळतात. दूध व मांसापासून मिळणारी प्रथिने पचण्यास सोपी असतात. ती पालेभाज्यापासून मिळणाऱ्या प्रथिनापेक्षा जास्त महत्त्वाची असतात. तरी सुद्धा मांसापेक्षा दुध केव्हाही चांगले. मांसाहार न करणाऱ्यांना दुधापासून प्रथिने मिळतात. परंतु सर्वच जण दुध पिऊ शकत वा पचवू शकत नाही. दुधातील स्निग्ध पदार्थ काढलेले दुधही लाभदायकच आहे कारण त्यामुळे प्रथिने नष्ट होत नाहीत. कोणतेही दूध घेतले तरी चालते. बकरीचे दुधही आरोग्यास उपयुक्त आहे. शरीरात उष्णता निर्माण करण्याचे व शरीर सुडौल ठेवण्याचे कार्य दुध, तूप, तेल, मांस करत असतात. चांगल्या तुपाला आहारात प्राधान्य द्यावे. साजूक तूप घेतल्यास रोजची शारीरिक आवश्यकता पूर्ण होते. साजूक तूप खरेदी करू न शकणाऱ्या व्यक्तींनी तेल वापरावे. गोडतेल, खोबरेल तेल, ही तेले आहारासाठी चांगली समजली जातात. तुपाचा-तेलाचा अतिरेकही चांगला नाही. चरबीयुक्त पदार्थ आहारात अधिक घेतल्यास रक्तवाहिन्या कठिण व संकुचित बनतात. शक्यतो प्राणिजन्य चरबीपेक्षा वनस्पती चरबीचा वापर केव्हाही चांगलाच. पुऱ्या व लाडू यात तुपाचा ज्यादा उपयोग करणे म्हणजे व्यर्थच खर्च होय. आहारावर नियंत्रण असावे.

महात्मा गांधी आवर्जुन म्हणतात की, गहू, तांदूळ, ज्वारी व बाजरी ही धान्ये महत्त्वाची आहेत. त्या धान्यांना दुधापेक्षा जास्त प्राधान्य मिळायला हवे. हाच मनुष्याचा मुख्य आहार असून देशातल्या निरनिराळ्या प्रांतात वेगवेगळी धान्ये आहारात असतात. शरीर विकासार्थ ही सर्वच आवश्यक आहेत असे नाही. कारण त्यापैकी सर्वात स्टार्च असल्याने यापैकी एक धान्य जरी आहारात असले तरी चालण्यासारखे आहे. धान्य दळूण घेतल्यावर ते चाळण्याची गरज नाही. कारण त्या कोंड्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. पोषणाच्या दृष्टीने ती महत्त्वाची असतात. तर डाळीपासूनही बरीच प्रथिने मिळतात. दूध विकत घेऊ न शकणाऱ्यांना कडधान्ये केव्हाही चांगली. डाळीत मसूराची डाळ पचावयास हलकी असते. फळे व भाज्या यांना आपल्या आहारात तृतीय स्थान मिळते. रोज ताज्या पालेभाज्या जरूर घ्याव्यात. गाजर, काकडी, टोमॅटो वगैरे पदार्थ न शिजवता धुऊन कच्चे खाणे चांगले. व्याधिमुक्त होण्यासाठी पालेभाज्या व फळांचा रसाचा प्रयोग सल्ला घेऊन करावा.

फळेही ऋतुनुसार खावीत. आंबा, जांभूळ, लिंबू, संत्री आदींचे सेवन करण्यास सकाळची वेळ सर्वोत्तम. फळांचा रस रक्तशुद्धीचे काम करतो. शरीराच्या कोषांमध्ये साठविलेली विषारी द्रव्ये तो शरीराबाहेंर टाकतो.