समतोल आहाराचे महत्त्व

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑक्टोबर २०११

समतोल आहाराचे महत्त्व | Samatol Aaharache Mahatva - Page 2

व्यक्तीच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते का? कष्टाची कामे करणाऱ्यांची उर्जागरज बैठे काम करणाऱ्यांच्या उर्जागरजेपेक्षा अधिक असते, म्हणून कष्टाची कामे करणाऱ्यांची अन्नगरज ही बैठे काम करणाऱ्यांच्या अन्नगरजेपेक्षा अधिक असते.

साजूक तूप, बदाम यासारखे पौष्टिक मानले गेलेले पदार्थ खाल्ले, तरच शरीराचे उत्तम पोषण होते असे अनेकांना वाटते, परंतू निव्वळ पौष्टिक पदार्थ असलेला आहार संतुलित असतोच असे नाही.

कुपोषण
पोट पुढे आलेली हडकुळी मुले तुम्ही पाहिली आहेत का? या मुलांच्या चेहऱ्यावर तजेला नसतो. अशा मुलांच्या आहारात पिष्टमय आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते, त्यामुळे त्यांच्या शरीराची योग्य वाढ झालेली नसते. ही मुले रोगांशी सामना करू शकत नाहीत. अपुऱ्या आणि असंतूलित आहारामुळे त्यांचे योग्य पोषण झालेले नसते, यालाच ‘कुपोषण’ म्हणतात.

त्रुटिजन्य विकार
अन्नघटकांच्या कमतरतेमुळे काही विकार जडतात, त्यांना ‘त्रुटिजन्य विकार’ म्हणतात. त्रुटि म्हणजे कमतरता. जीवनसत्त्व हा आहाराचा घटक असल्याचे तुम्ही शिकलात जीवनसत्त्वे विविध प्रकारची आहेत. आहारातील त्यांच्या कमतरतेमुळे काही विकार जडतात. त्यांनाही ‘त्रुटिजन्य विकार’ म्हणतात.

दिवसा स्पष्ट दिसणाऱ्या काहीजणांना अंधूक प्रकाशात सभोवतालच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, अशा व्यक्तींना ‘रातांधळे’ म्हणतात. हा ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे येतो. आपल्या देशामध्ये रातांधळ्या बालकांची संख्या मोठी आहे. योग्य वेळी उपाययोजना झाली नाही, तर अशा बालकांना कायमचे अंधत्व येते. रातांधळेपणावर उपचार म्हणून गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दुध असे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या पदार्थात ‘अ’ जीवनसत्त्वाचा मुबलक साठा असतो.