समतोल आहाराचे महत्त्व

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑक्टोबर २०११

समतोल आहाराचे महत्त्व | Samatol Aaharache Mahatva

समतोल आहाराचे महत्त्व - [Samatol Aaharache Mahatva] विविध वयोगटात समतोल आहार कसा असावा या संदर्भातील राजेश्वर टोणे यांचा लेख.

साजूक तूप, बदाम यासारखे पौष्टिक मानले गेलेले पदार्थ खाल्ले तरच शरीराचे उत्तम पोषण होते असे अनेकांना वाटते, परंतू निव्वळ पौष्टिक पदार्थ असलेला आहार संतुलित असतोच असे नाही.

आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्नपदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो या सर्व पदार्थांना एकत्रितणे ‘आहार’ म्हणतात.

अन्नपदार्थात रंगाने, रूपाने तसेच चवीने एकमेकांपासून भिन्न असतात, परंतु त्या सर्वांमध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसेच क्षार आणि जीवनसत्त्वे कमी अधिक प्रमाणात असतात.

तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दुध यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण अधिक असते. भुईमुग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते. पालेभाज्यांपासून आपणास क्षार आणि जीवनसत्त्वे मिळतात.

शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी राहावे यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत? शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील, तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत. अशा आहाराला ‘संतुलीत आहार’ म्हणतात.

सर्व व्यक्तींची अन्नगरज एकसारखीच असते का? तुम्ही घरात एकत्र जेवायला बसता. तुम्ही, तुमचा दादा आणि तुमचे आजोबा यांच्या आहाराचे प्रमाण एकसारखे असते?

तुमचा दादा तुमच्याहून वयाने मोठा आहे. त्याच्या शरीराची वाढ झपाट्याने होत आहे. स्वाभाविकच त्याच्या आहाराचे प्रमाण अधिक आहे. तुमचे आजोबा वयाने तुमच्या दादाहून खूप मोठे आहेत, पण त्यांचा आहार तुमच्या दादाच्या आहारापेक्षा खूप कमी आहे. वयस्कर माणसे कष्टाची कामे करत नाहीत. त्यांच्या शरीराची वाढही थांबलेली असते, म्हणून त्यांचा आहार बेताचा असतो.

वाढत्या वयाच्या मुलांच्या तुलनेत वाढत्या वयाच्या मुलींचा आहार कमी असतो असे काही जणांना वाटते, परंतू मुलगा किंवा मुलगी यांची अन्नगरज एकसारखीच असते.