गर्भारपण

लेखन डॉ. रमण नाडकर्णी | प्रकाशन: संपादक मंडळ | १० नोव्हेंबर २००९

गर्भारपण | Pregnancy

गर्भावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींची आधी चाहूल घेऊन त्याप्रमाणे इलाज केल्यास प्रसूतीसुद्धा चांगली व सुरळीत होऊ शकते.

सुदृढ, सशक्त व हुशार मुले ही ज्याप्रमाणे आई वडिलांचा तसेच समाजाला आधार असतात, त्याचप्रमाणे देशाची खरी संपत्ती असतात अशी मुले ही घडवावी लागतात. त्यांची योग्य ती शारिरीकव मानसिक घडण घडविण्यासाठी आई-वडिलांच्या प्रेमाचे व आधाराचे छत्र अत्यंत जरुरी असते त्याचबरोबर प्राथमिक वैद्यकीय ज्ञानसुद्धा अत्यंत उपयोगी पडते.

मुलाला जन्म देण्याच्या पद्धतीत स्त्री ही चार अवस्थेतून जाते. पूर्वगर्भावस्था. गर्भावस्था. प्रसूती अवस्था. सुतिकावस्था.

पूर्वगर्भावस्था :
लग्नानंतरचा परंतु गर्भावस्थेच्या आधीचा काळ म्हणजे पूर्वगर्भावस्था ही एक महत्त्वाची स्थिती आहे. ह्या स्थितीकडे स्त्रीची शारीरिक व मानसिक तयारी केली जाते. काही शारीरिक रोग (हृदयरोग, मधुमेह, क्षय, रक्तक्षय) तसेच मानसिक रोगांसाठी स्त्रीची तपासणी केली जाते. अशापैकी कुठलाही रोग आढळून आल्यास त्याचा शक्यतोवर इलाज केला जातो काही शारीरिक रोगात किंवा मानसिक रोगामध्ये जर रोग पराकाष्ठेला पोहचला असता तर अशा स्थितीत गर्भवतीला शारिरीक व मानसिक विकारांचा धोका असतो.

गर्भावस्था
गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतचा काळ असतो, त्याला गर्भावस्था म्हणतात. सामान्यपणे गर्भावस्थेची मुदत ९ महिने व ७ दिवस एवढी असते. किंवा साधारण २८० दिवस एवढी असते. गर्भावस्था ही स्थिती डॉक्टर आणि गर्भारीण या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची स्थिती आहे. प्रसुतीमध्ये उद्‌भवणाऱ्या बऱ्याच अडचणींचा आढावा गर्भावस्थेत घेता येतो व त्याचा योग्य तो इलाज करूनशक्य तो अडचणी टाळता येतात किंवा त्यासाठी योग्य ती पूर्व तयारी करता येते.

प्रसूतीपूर्व तपासणी :
स्त्रीस जेव्हा प्रथम गर्भार होणाची जाणीव होते. त्यावेळेस लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य असते. कारण गर्भावस्थेमध्ये ठारावि काळाच्या अंतराने स्त्रिची तपासनी होते . तिच्या गर्भाची वादतसेच गर्भास्थेमध्ये आढळू येणारे रोग यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. अर्भकाची वाढ, गर्भाशयाची चाढ, प्रसूती मार्गाचा तपास व रक्तगट, रक्तदाब, मधुमेह तसंच प्रसूती मार्गात असणारे अडथळे वगेरे गोष्टींचा अंदाज डॉक्टरांना येतो.

गर्भवतीच्या जबाबदाऱ्या :
आहार
गर्भावस्थेत आहाराचे महत्त्व अधिक आहे. काही तज्ञांनी गर्भवती स्त्री व मूल ह्यांच्या आहाराविषयी परस्परांशी संबंध पारखताना मुलाला आईचं बांडगुळ म्हणून संबोधले आहे ही कल्पना जरी बऱ्या आयांना अजिबात रुचणारी नसती तरीसुद्धा याचा अर्थ एवढाच आहे की, मूल हे आईवर सगळ्याच दृष्टीने निर्भरित असते व त्यामुळे आई व मूल ह्या दोघांच्या आरोग्यासाठी आवश्यक तो आहार घेण्यात जबाबदारी आईवर असते.

साधारणरित्या गर्भवस्थेत स्त्रीच्या आहाराची गरज वीस टक्क्यांनी वाढते. आहार हा एकावेळी थोड असावा, परंतु थोड्या थोड्या अंतराने घ्यावा. आहार हा पौष्टिक व पचण्यास हलका असावा. खूप तिखट, तळलेले पदार्थ, उघड्यावरील पदार्थ शक्यतोवर टाळावेत रोज साधारण १ लीटर दूध अवश्य प्यावे. त्यामुळे रोजचे आवश्यक तेवढे प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळण्यास मदत होते. जर दूध आवडत नसल्यास दूधाचा कोठलाही पदार्थ घेण्यास हरकत नाही. पण रोजचे कमीत कमी १ लीटर दूध किंवा दूधाचा कोणताही पदार्थ घेणे आवश्यक आहे.

जर गर्भवती स्त्री अंडी व मांसाहार घेत असेल तर चांगला शिजवलेला व कमी तिखट असा आहार उच्चप्रतीचे प्रोटीन्स देण्यास फार उपयुक्त होतो. ह्याबरोबरच ६० ते ६५ ग्रॅम चरबी ( Fats )आणि ३०० ते ३५० ग्रॅम पिष्टमयपदार्थ ( कार्बोहायड्रेटस ) हे आवश्यक आहेत. मुबलक प्रमाणांत फळांचा रस, हिरव्या पालेभाज्या घेतल्यास यातून व्हिटॅमिन व खनीजे मिळतात. मुबलक प्रमाणात प्रवाही पदार्थ, पाणी अत्यावश्यक असते. साधारण २ लीटर पाणी व थोडेसे मीठ हे दिवसभरात घेणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रीने उपास-तापास, डाएटींग वगैरे कधीही करू नये. कारण त्याचे अनिष्ठ परिणाम होतात ते नंतर आई व मुलाला भोगावे लागतात.

दातांची निगा
दातांची योग्य ती काळजी घेणे अगत्याचे असते. दिवसातूनच कमीत कमी दोनदा रात्री झोपताना व सकाळी दात घासावे. दातांना कीड लागली असल्यास लगेच त्यासाठी योग्य ते उपचार करावेत. हिरड्यांना रोज सकाळी व रात्री मालीश करणे व खाल्ल्यानंतर गुळण्या करण्याची सवय लावून घेणे हे उत्तम.

मलित्सर्ग
रोज मलोत्सर्ग ठराविक वेळी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात भाज्या, फळे आणि पाणी आवश्यक आहे. जर मलोत्सर्ग नियमीत होत नसेल किंवा मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी मुबलक पाणी, फळे, पालेभाज्या यांचा जेवणात उपयोग करावा. जर त्यांनीसुद्धा फरक वाटला नाही तर इसबगोल, ऍग्रोलचा उपयोग करावा. भरपूर खजूर खावा. अंजीराचे सरबत उत्तम. जुलाबाचे ओषध शक्यतो टाळावे. मलोत्सर्गासाठी भारतीय पद्धतीचे संडास अधिक बरे असे प्रस्तूत तज्ञांचे मत आहे.

व्यायाम
व्यायाम हा हलका असावा. साधारपणे चालण्याचा व्यायाम असावा. वजने उचलणे तसेच पळापळीचे व्यायाम टाळावेत. घरातील हलकी कामे ९ व्या महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. गर्भार स्त्रीस प्रसववेदनाच्या वेळी ज्याप्रमाणे जोर करून मुलाला प्रसूतीमार्गाच्या बाहेर पडण्यास मदत करते त्या प्रकारच्या व्यायामची सवय गर्भवती स्त्रीस करणे ही प्रसूती लवकर होण्यास लाभदायी ठरते.

वैयक्तिक आरोग्य
रोज आंघोळ करणे, हलके, सैल व स्वच्छ कपडे घालणे आवश्यक असते. बाह्य जननेन्द्रीय पाण्याने धूवून पुसून कोरडी ठेवावीत.

स्तनांची निगा
रोज सकाळी आंघोळीच्या वेळेस स्तन व स्तनाग्रे स्वच्छ धुवावीत. काही स्त्रियांचे स्तनाग्र आत दबलेले असतात अशा परिस्थितीमध्ये प्रसूतीनंतर मुलाला स्तनपान करणे कठीण जाते म्हणून रोज आंघोळीच्या वेळेस आत दबलेले स्तनाग्र असल्यास त्यांना मसाज करून बाहेर प्रक्षेपित करावी. अंगठा व तर्जनी यामध्ये धरून कमीत कमी ७-८ वेळा फिरवावी. जर स्तनाग्रावर जखमा, खाचा असल्यास त्यात मलम लावावे. ब्रेसीयर्स ह्या साधारणपणे कापडाच्या असाव्यात. तसेच फार घट्ट न बसणाऱ्या पण स्तनांना आधार देण्यास योग्य असाव्यात.

संभोग
पहिले ५ महिने संभोग टाळावा कारण या काळात संभोग केल्याने गर्भपाताची शक्यता वाढते. तसेच शेवटचे २ महिने संबंध टाळावा. कारण योनीमार्गातील जंतू गर्भाशयापर्यंत जाण्याचा धोका असतो. मधील काळात संबंध ठेवण्याचा झाल्यास दर १५ दिवसात एखाद्यावेळीच ठेवणे योग्य आहे.

गर्भावस्थेचे किरकोळ आजार
गर्भवती स्त्रीस ही जाणीव करून द्यावयास हवी की, गर्भावस्था ही आरोग्याची एक निशाणी आहे तो रोग नव्हे.

मळमळणे व ओकाऱ्या
साधारण पन्नास टक्के गर्भवती स्त्रियामध्ये मळमळणे व ओकाऱ्या आढळून येतात. अशा ओकाऱ्याचे कारण जास्त करून मानसिक असते. ओकाऱ्या सर्व गर्भवती स्त्रियांना होतातच असे नाही, पण जर जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट. ओकाऱ्या चालू असेपर्यंत गर्भवतीस्त्रियांनी स्वयंपाक न केलेला बरा. गोडपदार्थ, आईस्क्रिम वगैरे जास्त खावे.

छातीत जळजळणे
बऱ्याच गर्भार स्त्रियात छातीत जळजळणे आढळते. सर्वसाधारणपणे न जळजळण्यासाठी तिखट पदार्थ वर्ज्य करावेत. थंड दूध दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. जळजळणे थांबले नाहीच तर ऍटांसीड घ्याव्यात. मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी आधी नमूद केल्याप्रमाणे उपाय करावेत.

डोकेदुखी, चक्कर येणे
हे सर्वसाधारणपणे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण कमी झाल्याने होते. याचा इलाज म्हणून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने काही ना काही गोड पदार्थ तोंडात टाकावा.

झोप न येणे
हा एक त्रासदायक अनुभव आहे. दुपारचे कमी झोपावे. रात्री झोपताना एक ग्लास दूध प्यावे. हलकी फुलकी पुस्तके वाचावी. कधी कधी नातेवाईक व पतीची सहानुभूतीच पुरेशी असते. जरूर पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे झोपेची औषधे घेण्यास हरकत नाही. पायात गोळे येणे हासुद्धा त्रासदायक अनुभव आहे. पायात गोळा येणे सर्वसाधारणपणे रात्री जास्त होते. जास्त त्रास होत असल्यास कॅल्शियम व व्हिटॅमिन बी आणि बी ६ इंजेक्शन उपयोगी पडतात.

पाठ दुखणे
साधारणपणे हॉरमोन्समधल्या फरकामुळे बऱ्याच गर्भवती स्त्रियांची पाठ दुखते. विश्रांती, पाठीचा मसाज कमरपट्टा व औषधे यामुळे बराच फरक पडतो. गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय व प्रसूतीमार्गाचा रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे प्रसूतीमार्गातील स्त्रावामध्ये वाढ होते. हा स्त्राव जर साधारण असेल तर ह्यासाठी इलाजाची गरज नाही. पण जर स्त्राव खूप होत असेल तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट आहे.

वरील गोष्टींचा एकंदरीत विचार करता असे आढळून येईल, की नियमीत प्रसूतीपूर्व जतनामुळे गर्भवतीला स्वतःमध्ये आत्मविश्वास वाटू लागतो. असा आत्मविश्वास स्त्रीचे मन व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. गर्भावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींची आधी चाहूल घेऊन त्याप्रमाणे इलाज केल्यास प्रसूतीसुद्धा चांगली व सुरळीत होऊ शकते. अशा प्रसूतीपूर्व जतनाची व्यवस्था साधारणपणे सर्वच मोठ्या हॉस्पिटलात असते. तिचा सदुपयोग करून घेणे हे आपल्याच हातात आहे व आपल्याला अत्यंत हिताचेही आहे.