मुलगी वयात येत आहे

लेखन डॉ. पद्मा राव | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ फेब्रुवारी २०१०

मुलगी वयात येत आहे | Mulagi Vayat Yet Ahe

मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो.

कळी उमलतानाचे बदल काय असतील ?
मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो. पाळी येणे हा त्यांच्या शरीरात होणारा महत्त्वाचा बदल होय. पन्नास वर्षांपूर्वी पाळी सुरू होण्याचं वय साधारणतः १५ ते १६ वर्षांच्या दरम्यान असायचं. आता १२ वर्षांची मुलगी असताना पाळी येते असं पाहाणीत आढळून आलं आहे. पाळीचं वय इथं आधी का यावं याचं कारण समजणं तसं अवघडच आहे. पण सर्वसाधारण असं म्हणता येईल, की मेंदूच्या वाढीमुळे हा फरक होणं शक्य आहे. सभोवतालचं वातावरण आणि सात्विक पोषक आहारामुळे मुलींची एकण वाढ लवकर होते आणि त्यामुळे मेंदूचीही वाढ लवकर होते. त्यामुळे शरीरातही बदल लवकर होणे साहजिकच असतं. जर १५ ते १६ वर्षांपर्यंत पाळी सुरू झाली नाही, तर मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असतो.

पहिली पाळी येण्यापूर्वी
पहिली पाळी येण्यापूर्वीचा जो काळ असतो त्या दिवसांत मुलींच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात त्याविषयी माहिती करून घेणं उद्बोधक ठरेल.

मनोव्यापारातील बदल
मुलीचं मुलासारखं बंधमुक्त वागणं कमी होत जातं आणि तिचं एका मुग्ध कलिकेत रूपांतर होऊ लागतं अल्लडपणा जातो. तिचं वागणं, बोलणं काहीसं लाजाळू होतं. आपण आता लहान राहिलो नाही याची तिला पुसटशी जाणीव होऊ लागते. लहान मुलासारखं वागविलं गेलं, तर तिला राग येऊ लागतो. तिला आता अधिकाधिक स्वतंत्रपणे वागण्याची इच्छा होऊ लागते. कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंची प्रत्येक गोष्ट मुकाट्यानं ऐकण्याचं आणि सांगितलेलं पाळण्याचं तिला नको वाटतं. एवढंच नाही, तर आपल्या घरातल्यांशी उगीचच गप्पाटप्पा करण्याचही ती टाळायला पाहाते. एकांतात राहणंच ती पसंत करू लागते. चित्रं बघत बसणं किंवा वाचीत बसणं तिला आवडू लागतं.

पहिला पाळीच्या सुमाराला शरीरात होणारा मुख्य बदल म्हणजे छातीची वाढ होणं आणि गुप्तेंद्रियावर लव येणं. स्तन मोठे होणं हा नैसर्गिक बदल असतो.

शारिरीक बदल
पहिला पाळीच्या सुमाराला शरीरात होणारा मुख्य बदल म्हणजे छातीची वाढ होणं आणि गुप्तेंद्रियावर लव येणं. स्तन मोठे होणं हा नैसर्गिक बदल असतो. त्याचप्रमाणे लव येणं हाही बदल नैसर्गिकच असल्यानं त्याबद्दल कोणतीही लाज मुलीनं बाळगता कामा नये. या काळात काही मुली खांदे उंचावून आणि कुबड काढून चालतात. वाढणारे स्तन लपविण्यासाठी त्या पोक काढतात. पण असं करण्यानं त्या त्यांच्या शरीराची ऐटच घालवून बसतात. काही मुली छातीचे फुगवटे लपविण्यासाठी घट्ट बॉडीज वापरतात. अर्थात त्यामुळे त्या ते लपवू शकत नाहीतच पण रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित होत नाही. मुलींच्या स्तनाची वाढ होणे यात त्यांना लाज संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट त्यांना आपल्या स्त्रीत्वाचा अभिमानच वाटायला हवा. कायमच अज्ञानी, अबोध मुलगी म्हणून राहाण्यापेक्षा प्रत्येक मुलीनं आपल्यात होणारे बदल आणि त्यांची कारणं जाणून घेण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.

इतर आणखी बदल
पहिली पाळी येण्यापूवी काही आठवडे मुलीला पांढऱ्या रंगाचा स्त्राव जाऊ लागतो. तो पाहताच काहीजणी घाबरूण जातात. आपल्याला काहीतरी रोग झाला आहे. अशी त्यांना भिती वाटू लागते, पण हा पांढरा स्त्राव होणं अनैसर्गिक नसून या काळात तो होणारच असतो. पाळी यावयाच्या आधी काही आठवडे ओटीपोटात दुखू लागतं, तेव्हाही काही मुली घाबरून जातात. हे दुखणं गर्भाशयाच्या आकुंचन होण्याच्या क्रियेमुळे असतं आणि ते कालक्रमानं थांबतं. काही मुलींच्या गळ्यातील थॉयराईड ग्रंथीची वाढ होते. त्यामुळं गळा फुगल्यासारखा होतो त्याला गोलाई येते. पण हे तात्कालिक असते. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नसते हे लक्षात ठेवावे.

याच काळात होणारा आणि त्रासदायक वाटणारा एक प्रकार म्हणजे तारुण्यपिटिका. पाळीपूर्वी चेहऱ्यावर या पुटकुळ्या येऊ लागतात आणि साहजिकच मुलींना याचा मनास्ताप होऊ लागतो. आपल्या दिसण्याबद्दल विशेष दक्षता या काळात मुलींना असल्यानं या पिटिका त्यांच्या सौंदर्यात बाधाच आणतात. पण या पिटिका म्हणजे शरीरात होणाऱ्या बदलाचाच एक भाग असतो. एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काही मुली या काळात लठ्ठ होऊ लागतात. अशा मुलींच्या आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. पण कटाक्षानं अगदी कमी खाणं किंवा उपवास करणं अशी उपाययोजना या लठ्ठपणावर कोणी करू नये. या वयात मुलीला सकस पोषक आहाराची आवश्यकता असते. फक्त खूप आहाराच्याबाहेर खाणं टाळलं म्हणजे झालं.

वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी
मुलगी वयात येत असल्यामुळं तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्यानं तिच्या आईनं समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागलं पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईनं स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. आणि ती स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठीच या बदलाला सामोरी जाते आहे. हे लक्षात घेऊन आईनं मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.

प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावूनं दिलं पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलींलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणं हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्त्राव होणं ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असतं हे मुलींना सांगितलं पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईनं मुलीला शिकवायला हवं. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखतं, काहींना फार दुखत नाही. हे दुःख तसं इतकं तीव्र नसतं. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात.

पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असं नसतं. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असं काही नसतं. पण ही वस्तुस्थिती आईनं मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दर महिना आली नाही तर मुलगी घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात. पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरं म्हणजे पाळी कधीच आली नसतानाही गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणं फारच कमी असतात.

माझ्याकडे अकरा वर्षांची एक मुलगी आली. तिचं पोट वाढलेलं होतं. पण आईच्या म्हणण्याप्रमाणं तिला एकदाही पाळी आली नव्हती. तपासल्यावर ती गर्भार असल्याचं आढळून आलं. ते ऐकून आईला आश्चर्यच वाटलं. एकदाही पाळी न आल्यामुळं, मुलीचं पोट वाढलं आहे त्याचे कारण कदाचित ट्यूमर असू शकेल असं तिला वाटत होतं. त्या मुलीला एक गुटगुटीत मुलगा झाला. अर्थात अशी उदाहरणं अगदी दुर्मिळ असतात.

मुलींच्यात होणारे शारिरीक आणि मानसिक बदल जाणून घेऊन, तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचं मन तयार करणं, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणं हे प्रत्येक मुलींच्या आईचं कर्तव्य आहे. पूर्वीच्या पिढीतील मुलीच्यावेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंबपद्धती होती. घरात खूप माणसं असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भारपण, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणींकडून ते सारं शिकत असतं. पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहान असतात. एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढंच आपलं कुटुंब हे माहीत असते. आपल्या चुलत, मावस भावंडांबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलांची जबाबदारी प्रामुख्यानं आईवरच येऊन पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनंच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणं आणि योग्य रीतीनं पार पाडणं आवश्यक असतं. मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या कालात आईनं तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्यानं वागून, विश्वासात घेऊन मुलीचं मनोधैर्य वाढविण्यासाठी झटलं पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि सर्वार्थांनं परिपूर्ण अशी उद्याची स्त्री, म्हणून मुलीचं व्यक्तिमत्त्व विकसित करायला पुढं सरसावलं पाहिजे.