बाळंतपण एक गोड वेदना

लेखन डॉ. तरुण बॅनर्जी | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ नोव्हेंबर २००९

कपडे व इतर तयारी

 • कपडे :बाळंतपणाच्या वेळी साधे सूती व स्वच्छ कपडे असावेत. पुढच्या बाजूच्या बटणांचा सैलसा गाऊन असेल तर वेळोवेळी लागणारी तपासणी ही कमी त्रासाची होऊ शकते. नायलॉनचे, नवीन कपडे असतील तर त्यामुळे घाम, पाणी, रक्त शोषलं जात नाही. तसंच हे किमती कपडे डाग पडल्याने खराब होऊन जातात.
 • पॅड्स :बाळंतपणात किंवा बाळंतपणानंतर घ्यावयाचं पॅड हे अत्यंत स्वच्छ असावं. घरातील जुनी व अस्वच्छ कपड्यांची घडी घेऊ नये. त्यामुळे निर्जंतुकता तसेच शोषणशक्ती या दोन्ही गोष्टी साधल्या जात नाहीत. बाजारात विकत मिळणारी पॅड्स थोडीफार महाग वाटत असतील तर ग्वॉसच्या कापडात कापूस गुंडाळून त्याचे पॅड करणे इष्ट होईल.
 • स्वतःसाठी लागणाऱ्या रोजच्या वस्तू :ब्रश, टूथपेस्ट, पावडर, कुंकू, कंगवा, साबण, टॉवेल, इत्यादी.
 • बाळासाठी लागणाऱ्या वस्तू :हे कपडेसुद्धा स्वच्छ कपड्याचे धुतलेले (खळ नसलेले) सैलसर असावेत. बटणे, पिना, हुक यांच्याऐवजी बंद असावेत.म्हणजे बाळाला बोचून इजा होणार नाही. तसेच १० ते १२ स्वच्छ व जुन्या कपड्यांची दुपटी शिवून तयार ठेवावीत.
  वरील सर्व सामान हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच एका बॅगमध्ये तयार ठेवावे.

हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी केव्हा जावे ?
सामान्यपणे याला ‘कळा चालू झाल्यावर अ‍ॅडमिट व्हावे’ असं उत्तर आहे. पण इतरही काही लक्षणं दिसली, तर अ‍ॅडमिट होणं आवश्यक असते.

 • बाळंतपणाची दिलेली तारीख उलटून गेल्यावर
 • बाळाची हालचाल कमी किंवा बंद झाल्यास.
 • अंगावर लाल जाऊ लागल्यास.
 • अंगावर पाणी जाऊ लागल्यास.
 • पायावर व चेहऱ्यावर खूप सूज आल्यास.
 • चक्कर, अंधेरी येत असेल तर.

बाळंतपणातील आहार.
अ‍ॅडमिट होण्यासाठी जाण्याच्याचेळी पोट भरून जड आहार घेऊ नये. याउलट हलका आहार, पातळ पदार्थ घ्यावेत. कळा चालू  असताना बऱ्याच वेळी उलटी होण्याचा संभव असतो. तसेच भूल देण्याचा प्रसंग आलाच तर पोटभर खाल्लेलं असल्यास उलटी होऊन खूपच त्रास होतो.

बाळंतपणाच्या वेळची काळजी

 • बाळंतपणाच्या वेळी स्वतः शांत राहून डॉक्टरना तपासणीच्या वेळी सहकार्य करावं. तपासणी करतांना, एनिमा देताना किंवा प्रत्येक कळेबरोबर थोडाबहुत त्रास हा प्रत्येक स्त्रीस होतच असतो. पण अशावेळी आरडाओरडा करून कोणताच फायदा न होता त्यातच शक्ती कामी लागते व प्रत्यक्ष कळा देणेच्या वेळी शक्ती उरत नाही.
 • बाळंतपणाच्या प्रथम अवस्थेत कळा देणे इष्ट नसते. त्यामुळे श्रम तर वाया जातातच, पण पुढे गर्भाशयाची पिशवी योनीतून बाहेर येणेची शक्यता वाढते. म्हणून डॉक्टरनी सांगेपर्यंत कळा घेऊन जोर करू नये. तसंच उकीडवं बसून किंवा उभ्याने कळा घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पाठीवर जोपून पाय पोटाशी घेऊन कळा घ्याव्यात.
 • बाळंतपणात वरचेवर थोडे थोडे पाणी, चहा, सरबत अशी द्रव्ये घ्यावीत. तसेच वरचेवर लघवीला जाऊन मूत्राशय रिकामे ठेवावे. म्हणजे बाळ नीट येतात व बाळंतपण जास्त सोपे होते.
 • बाळंतपणाच्या वेळी नेहमी स्वच्छ पॅड घ्यावे.
 • बाळाच्या जन्मानंतर लगेच मुलाचे लिंग समजावून घ्यायचा प्रयत्न करू नये. ही काळजी विशेषतः पूर्वीच्या २/३ मुली असणाऱ्यांनी घ्यायची आहे. परत या वेळेही मुलगीच जन्माला आलेली असेल तर एखादे वेळेस लगेच मानसिक ताण पडण्याचा संभव असतो.
 • बाळाच्या जन्मानंतर सामान्यपणे १० मिनिटापर्यंत वार बाहेर येते. परंतु तशी न आल्यास ती ओढून काढणेचा प्रयत्न करू नये. ही काळजी विशेषतः घरी बाळंतपण होताना घेणे आवश्यक आहे.

बाळंतपणात पडणारे टाके
बाळंतपणात माय अंगात टाके पडणे हेही नॉर्मल बाळंतपणच आहे. टाके पडले म्हणून अजिबात हालचाल न करणंही चुक आहे. बाळंतपण हा रोग नव्हे बाळंतपणानंतर विश्रांतीची आवश्यकता असते. एक चांगली झोप झाल्यावर जरुर हिंडूफिरू लागावे.

बाळाला अंगावर पाजणे
बाळंतपणानंतर सामान्यपणे ६ तासांनी बाळाला अंगावर पाजायला घ्यावे. त्यांनी खूपच फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती, प्रथिने इ. गोष्टी पहिल्या दुधातून बाळाला पोहचतात. तसेच भरपूर दूध मातेस येणेसाठीही मदत होते. बाळाला अंगावर पाजणेचे आधी व नंतर स्तन धुऊन स्वच्छ करावीत. त्यात दूध साठून राहात असेल तर हातांनी पिळून काढून टाकावे. बाळंपणानंतर १० दिवस सोयर पाळणेची प्रथा आहे. खरं म्हणजे यामागील उद्देश बाळतीणीस पूर्ण विश्रांती व बाळास फार लोकांनी हाताळू नये हा असावा. ह्या दोन्ही गोष्टी हॉस्पिटल मध्ये बाळंतपण झाले असले तरीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. फार लोकांनी बाळ बघणेसाठी येऊ नये. विशेषतः लहान मुलांना यात खूपच उत्साह दिसून येतो. पण यामुळे मातेची विश्रांती नीट होत नाहीच, शिवाय बाळाला फार हाताळले जाते व सांसर्गिक रोगांच्या जंतूपासून बाळाला इजा होण्याचा संभव वाढतो.

या दहा दिवसात हॉस्पिटलमध्ये बाळंतीणीने नुसतीच विश्रांती हा उद्देश न ठेवता बाळाच्या संगोपनाच्या दृष्टीने बाळाची अंघोळ, पुसणे, पावडर लावणे, नाळेची काळजी, अंगावर पाजणे अशा महत्वांच्या गोष्टींचा सराव नर्स, डॉक्टर यांच्या सहाय्याने करावा म्हणजे घरी गेल्यावर एकदम जड जाणार नाही. तसंच घरी जातेवेळी कुटुंब नियोजनासाठी डॉक्टरकडून सल्ला घ्यावा. दुसऱ्या बाळंतपणात पहिल्या बाळंतपणाच्या अनुभवाचा उपयोग होतो. परंतु पहिलटकरणीस वरील गोष्टींची माहिती असणं आवश्यक ठरतं. या गोष्टी जर नीट लक्षात ठेवल्या तर बाळंतपणातील ‘पण’ जाऊन ती एक गोष्ट वेदनेच्या बदली गोड संवेदना होईल.