बाळंतपण एक गोड वेदना

लेखन डॉ. तरुण बॅनर्जी | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ नोव्हेंबर २००९

बाळंतपण एक गोड वेदना | Balantapan Ek God Vedana

बाळंतपण म्हणजे स्त्रियांचा दुसरा जन्मच असं म्हटलं जातं. पण गर्भवतीनं योग्य काळजी घेतली तर बाळंतपणातील वेदनांचं रूपांतर गोड संवेदनात होऊ शकेल.

बाळंतपण म्हणजे स्त्रियांचा दुसरा जन्मच असं म्हटलं जातं. पण गर्भवतीनं योग्य काळजी घेतली तर बाळंतपणातील वेदनांचं रूपांतर गोड संवेदनात होऊ शकेल. कोणताही ‘पण’ म्हटले की त्यात श्रम, कष्ट हे आलेच. पण त्या पणातून पार पडल्यानंतरचा आनंद हा काही आगळाच असतो. ‘पण’ जिंकण्यासाठी खूपच कष्ट, त्रास सहन करावा लागतो. त्यातून मिळणार समाधान हे चिरकालीन सुख देणारं असतं. अगदी तसंच आहे बाळंतपण बाळपण याविषयी.परंतु बाळंतपणातील या ‘पणा’ विषयी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. सध्याच्या या विकसीत विज्ञान युगात गर्भारपणात रोग खूपच लवकर कळू शकतात. यामुळे त्यावर उपाय योजनाही वेळेवर करता येते. मात्र यासाठी गर्भारपणात किंवा बाळपणात घ्यावयाच्या काळजीची माहिती असणे आवश्यक आहे.

दिवस गेल्यानंतर घ्यावयाची काळजी
पाळी चुकल्यानंतर प्रथम डॉक्टरकडून तपासणी करून दिवस (बाळाच्या भुमिकेतून आईचे संगोपन !) गेल्याची खात्री करून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे दिवस गेल्यानंतरच्या आहार विहार, कष्टाची कामं, पती पत्नी संबंध या सारख्या गोष्टीविषयी सल्ला घेता येतो. गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

ताबडतोब डॉक्टरी सल्ला केव्हा घ्यावा ?

 • जास्त प्रमाणात उलट्या होणं.
 • चक्कर येणं
 • फार अशक्तपणा वाटणं.
 • अंगावर पांढरे पाणी किंवा लाल जाणं.
 • पोटात दुखणं
 • कंबर एकसारखी दुखणं.
 • लघवीचा त्रास होणं.

वरील लक्षणं निर्माण झाल्यास ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा. शेवटच्या पाळीची तारीख माहिती असणं आवश्यक आहे. साधरणपणे त्या दिलेल्या तारखेच्या ७ दिवस अलिकडे किंवा पलीकडे ७० ते ८० टक्के  स्त्रियांचं बाळंतपण होतं. बाळंपणाची तारीख माहिती असली म्हणजे प्रवास, रजा, घर सांभाळण किंवा मुलांना सांभाळणं अशा गोष्टींची व्यवस्था करता येते.

खेड्यतील स्त्रियांसाठी
सर्व खेड्यांमध्ये डॉक्टरची सोय होणं कठीण असतं. त्यामुळॆ गरोदरपणी वेळोवेळी तपासणी करून घेणं अवघड जातं. तरीसुद्धा गरोदरपणी विशेषता ७ व्या महिन्यानंतर दोनदा किंवा निदान एकदातरी डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल अशा दवाखान्याची सोय निदान तालुक्याच्या गावी तरी सामान्यतः असते. यामुळे बाळंतपण घरी होणे शक्य आहे का ? याचा अंदाज येतो. तसेच शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण, रक्ताचा गट, लघवी इत्यादी तपासण्या करून घेणं आवश्यक आहे.

हॉस्पिटलमध्ये बाळंतपण आवश्यक

 • पूर्वीचे बाळंतपण सिझेरियन करून झालेले असेल तर प्रत्येक वेळी सिझेरियनच करावं लागेल असं नसतं. नॉर्मल बाळंतपण होऊ शकतं. परंतु अशावेळी पूर्वीच्या गर्भाशयातील व्रण उकळण्याचा संभव असतो. असा धोका निर्माण झाल्यास परत सिझेरियन करून बाळ बाळंतीण वाचवणं हॉस्पिटलमध्ये शक्य होतं. हीच गोष्ट पूर्वी गर्भाशयावर शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांच्यासाठीही आहे.
 • आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात ठराविक वेळी रक्ताची तपासणी करून घेणं आवश्यक असते. तसंच आपल्या ओळ्खीपैकी रक्ताचा गट निगेटिव्ह असलेली हेरून ठेवावी लागते. वेळ पडल्यास अशा व्यक्तींकडून रक्त मिळवता यायला हवं. जन्मणाऱ्या मुलाच्या दृष्टीनं, तसच बाळंतीणीच्या दृष्टीनं हॉस्पिटलमध्ये अशा स्त्रियांचं बाळंतपण होणे अत्यंत आवश्यक असतं.
 • पूर्वीच्या बाळंतपणात जर वार पडण्यास त्रास झाला  असेल किंवा अंगावरून खूपच गेले असेल, तर त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यत दुसऱ्या वेळी खूप असते. यासाठीच अशा स्त्रियांच बाळंतपण हॉस्पिटलमध्ये केल्यास हा संभाव्य धोका टळू शकतो.
 • पूर्वीच्या बाळंतपणानंतर मूल लगेच गेले असेल तर नीट चिकित्सा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बाळंतपणाची सोय करावी.
 • घरी बाळंतपण करताना जर खूप वेळ गेल्यावरही बाळंतपण होण्याची चिन्हे दिसत नसतील तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावे. खूप वेळपर्यंत घरी थांबू नये.

बाळंतपणाची मानसिक तयारी
पहिलटकरणीच्या बाळंतपणात सामान्यपणे १० ते १२ तास लागतात. कळा येणं, अंगावर पांढर जाणं, कंबर दुखणं अशा लक्षणांनी पहिलटकरनी घाबरून जातात. परंतु बाळंतपणाआधी याची माहिती करून मानसिक तयारी झाली असेल, तर उगीचच मानसिक ताण पडत नाही. मन शांत असेल तर येणाऱ्या कळासुद्धा सुसूत्र व चांगल्या येतात. म्हणून स्त्रियांनी बाळंतपणाआधी याची माहिती करून घ्यावी.