मेळावर आली कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi - Page 4

कारवी ही जशी लोकप्रिय आहे तशीच ती प्राणीप्रियही आहे. याबद्दल माहिती देतांना पाचगणीचे ट्रेकिंग गाईड नामदेव यांनी सांगितले कि, तिच्या खरबरीत पानांनी आणि खोडाने आपले अंग खाजवून घेण्यासाठी गवे दाट कारवीतून चालत जातात. कणकवली कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी गवे आणि हरणांना कारवीची पाने तर अस्वलांना फळे खायला आवडतात असे सांगितले. कोट्टागिरी येथील कि स्टोन फाउंडेशनच्या वनस्पतीशास्त्रज्ञ अनिता वर्गीस यांनी बहराच्या काळात मधमाश्या बारा वर्षातून एकदाच तयार होणारं, बहुमोल असं एकलपुष्पी (युनिफ्लॉरल) कुरुंजी मध तयार करतात अशी माहिती दिली.

नाशिकच्या पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी कारवीबद्दल आणखी वेगळ्याप्रकारची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘बहर येऊन गेल्यानंतर वाळलेला फुलोरा सुद्धा अगदी मादक सुगंध निर्माण करतो ज्यामुळे वाळलेल्या कारवीच्या फुलांमधून चालणं देखील खूपच आनंददायी वाटतं. गुरांना ही वाळलेली फुलं खूप आवडतात. आणखीएक आश्चर्य म्हणजे स्थानिक आदिवासी जमाती याला “कैफ” म्हणतात. हा पारसी शब्द स्थानिक भाषेत कसा आला याचा अभ्यास देखील या निमित्ताने मजेशीर ठरु शकतो.’