मेळावर आली कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi

एखाद्या खुरट्या वृक्षासारखी दिसणारी कारवी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पती प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरुन येते.

लहानपणी बहरलेल्या कारवीतून वाट काढत एक टेकडी चढत गेल्याचं मला अंधुकसं आठवतं. पण कितीही आठवण्याच्या प्रयत्न केला तरी कारवीच्या फुलांनी आच्छादलेला एखादा डोंगर माझ्या डोळ्यापुढे उभा राहत नाही की तिचं एखादं फुल अलगद उचलून मी आपल्या वहीत जपून ठेवल्याचंही आठवत नाही. कारवीची झालर पांघरलेला एखादा डोंगर पाहणे ही आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय आठवण ठरु शकली असती कदाचित. लहानपणी अज्ञानामुळे ती संधी गेली. पण आता पुन्हा एकदा ती मला खुणावत होती आणि यावेळीही तोच मूर्खपणा करणे परवडण्यासारखे नव्हते. मी लगेच पश्चिम घाटातलं पाचगणी गाठलं. येथे या भागातील पहिल्याच कारवी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कारवी या विलक्षण वनस्पतीच्या बहरण्याचा सोहळा साजरा करण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जातो. याची देही याची डोळा मलाही तो सोहळा अनुभवायचा होता.

एखाद्या खुरट्या वृक्षासारखी दिसणारी कारवी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पती प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरुन येते. पावसाळ्यात तिला पालवी फुटते, पुढे या पालवीचे हिरव्यागार मऊ व खरबरीत पानांमध्ये रुपांतर होते. हिवाळ्यात ही पानं गळायला लागतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाड पुर्णपणे वाळल्यासारखं दिसू लागतं. हे चक्र सात वर्ष असचं चालतं. आठव्या वर्षी कारवी आधी कळ्यांनी आणि मग निळसर जांभळ्या फुलांनी बहरुन जाते. याबरोबरच हे निरस वाटणारे डोंगरउतार या सुंदर जांभळाईने जणू प्रज्वलित होऊन जातात. संपूर्ण कारवीतून मधमाश्या गुणगुणू लागतात. त्या नुसते मधच गोळा करत नाहीत तर तिचे परागकण वाहण्याचे काम करतात. कारवीच्या अशा एकत्रित बहरण्यामिळेच कदाचित स्थानिक लोक या घटनेला कारवी “मेळावर” आली असं म्हणतात. पुढे तीन - चार महिन्यात कारवीला फळे येणे, पिकणे आणि जमनीवर पडून वाळणे या सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या घडून येतात आणि जवळपास जानेवारीच्या सुमारास सर्वच्या सर्व कारवीची झाडे मरुन जातात.