गोष्ट एका घुबड पक्ष्याची

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ मार्च २०१८

गोष्ट एका घुबड पक्ष्याची | Gosht Eka Ghubad Pakshyachi

गोष्ट एका घुबड पक्ष्याची - [Gosht Eka Ghubad Pakshyachi]

पहाटे सकाळी उठल्यावर सहज शारीरिक व्यायाम मनाला ताजेतवाने वाटण्या करता, शरीराला एक प्रकारे स्फूर्ती मिळावी यासाठी मला फेरफटका मारायला आणि शांत वातावरणात विशेषतः मला निसर्गाच्या सानिध्यात आजूबाजुचे परिसर, ती हिरवळ न्याहाळायला आणि वाचन करण्यास फार आवडते म्हणून मी उठल्यावर माझ्या मित्रांसंगे फिरावयास निघणे हा माझा नित्याचा दिनक्रम असे. नेहमी प्रमाणे मी त्या दिवशीही फेरफटका मारण्यास निघालो. परंतु तो दिवस माझ्यासाठी काही विशेष चालना देवून गेला आणि खूप काही शिकवून गेला. फिरता फिरता आणि पहाटे निसर्गाचा आनंद लुटत असता मी व माझे मित्र ‘क्षणभर विश्रांती’ म्हणून एका छानशा हिरवीगार झाडे व फुलांनी बहरलेल्या एका बागेत गेलो. तो देखावा, निसर्गाचा करिष्मा पाहून मी मनोमनी सुखावून जात होतो आणि देवाचे आभारही मानत होतो. झाले, इकडच्या तिकडच्या मित्रांसोबत गप्पांना रंग चढला होता. हास्य विनोद चांगलाच रंगात आला होता. आम्ही बागेत एका भल्या मोठ्या वृक्षाच्या खाली असलेल्या बाकड्यावर बसलो होतो आणि गप्पा रंगत होत्या.

इतक्यात एका विशिष्ट लयीत मला वूईपऽऽऽ असा आवाज आला. मी क्षणभर दचकलोच आणि आवाजाच्या दिशेने मागोवा काढण्याचा प्रयत्न करू लागलो. इकडे तिकडे पाहून झाल्यावर माझे लक्ष हे झाडावर गेले. पाहतो तर काय एक सुंदर अशा पक्ष्याची जोडी झाडावर बसून लयीत शीळ घालत होती. त्यांच्या त्या सुंदर दिसण्या बरोबरच पहाटेच्या त्या शितल वातावरणात आणि निसर्गात अधिक भर पडत होती. छानसे डोळे, चोच, पांढरा तांबडा रंगाचे पंख काही विशेषच ऊठून दिसत होते. मला त्या पक्ष्यांविषयी जास्त काही माहिती नसल्यामुळे मी कुतुहलापोटी माझ्या मित्र कडून त्या पक्ष्याविषयी माहिती मिळवयाचा प्रयत्न करू लागलो. मित्र हा ग्रामीण वातावरणात काही वर्षे राहीला असल्यामुळे त्याला पक्ष्यांविषयी तसेच निसर्गाची दांडगी अशी माहिती उपलब्ध होती. त्याचा उपयोग मला या पक्ष्यांच्या बाबतीत खूप चांगला झाला. मग मित्राने मला माहिती सांगण्यास सुरूवात केली. तसा मी कान टवकारून कुतुहलाने ऐकू लागलो. मित्र मला सांगू लागला, “ऐक, या पक्ष्याचं नाव घुबड आहे. ते मनुष्य वस्तीत खूप कमी प्रमाणात आढळतात. ते आपले भक्ष्य पकडण्यासाठी खूप उंचावरून झेप घेण्याची क्षमता त्यांच्या मध्ये असते. ते विविध रंगात आढळतात.” त्याच्या त्या माहितीने मी खूप सुखावून गेलो आणि एका सुंदर घुबड पक्ष्याची माहिती मला प्राप्त झाली या खुशीने मी मनोमन भारावून जात होतो.

मित्र हो, हे निसर्ग, हे पशु - पक्षी त्यांच्या सुंदर अशा जाती आणि प्रजाती वाचवणे हे सर्व मानवजातीचे परम कर्तव्य आहे. आपण आपल्या प्रगती बरोबर या निसर्गाच्या सौंदर्याचा र्‍हास आपल्या हातून करत आहोत. ते थांबवणे गरजेचे आहे आणि ते आपल्या हाती आहे. ठिकठिकाणी शक्य असेल तिथे आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उन्हाळयात आपण आपल्या घराच्या कौलांवर वा छतावर या पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेले भांडे व एका भांडयात त्यांच्यासाठी दाणे असा प्रत्येकाने दिनक्रम सुरू करावा. त्यामुळे हेच पक्षी कुठेही तहानेने कडक उन्हात तडफडणार नाहीत. हा निसर्ग वाचवणे काळाची गरज आहे. काय मित्र हो ! मग करू या ना सुरूवात हा निसर्ग, पशु, पक्षी वाचवण्यासाठी.