बहुगुणी गिरीपुष्प

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मार्च २०१५

बहुगुणी गिरीपुष्प | Bahuguni Giripushpa

बहुगुणी गिरीपुष्प - शाश्वत विकासाच्या वाटेवर चालताना सेंद्रिय शेती, भूमी-जल व इतर संसाधनांचा कार्यक्षम, काटकसरीने वापर करणे निकडीचे झाले आहे. कमीत कमी वेळात, कमी खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार वनस्पतीजन्य उत्पादने व पर्यावरण सुलभ शिकस्ता राबविला जात आहे. त्यात खारीचा परंतु मोलाचा वाटा उचलणार्‍या मानबिंदू गिरीपुष्पाबद्दल थोडक्यात पाहूयात.

शास्त्रीय भाषेत गिरीपुष्पाचे Gliricidia sepium असे नामकरण केले असून Leguminosae कुळातील Fabaceae या उपप्रकारात समाविष्ट केले आहे. जगभरात गिरीपुष्पाला Gliricidia, Mata raton, Madre de Cacao, Quick stick, Tree of Iron, Gamal अश्या विवीध नावाने संबोधले जाते. ‘मध्य अमेरिका आणि मेक्झिकोतून’ याचा विस्तार जगभर पसरला. वेस्ट इंडीजमधुन श्रीलंकेत आणि त्यानंतर गिरीपुष्पाला भारतात आणल गेलं. विशेष म्हणजे ही वनस्पती परप्रांतीय असूनसुध्दा भारतात आणि भारतीय उपखंडात उत्तमरीत्या वाढते. याचा वृक्ष प्रकार पानझडी झुडुपात मोडत असून फांद्या आणि खोड हरणाच्या शिंगाप्रमाणे फोफावते. याची साल गुळगुळीत हिरवट करडया रंगाची असून उंची सर्वसाधारणपणे १०-१२ मीटर पर्यंत वाढते. पानांचा आकार चमच्यासारखा असून त्यावर मेणसर चमक आढळते. याची सोटमुळे जमीनीत खोलवर पसरत असल्याने माती घट्ट धरून ठेवतात. बी आणि शेंगा आकर्षक गडद काळसर-मरून रंगाच्या असतात. प्रजनन बी रूजुन किंवा २-३ से.मी. जाडीच्या फांद्या लावून केली जाते. बीज प्रसार हवेमार्फत होवून पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवून येण्यात गिरीपुष्पाचे प्रमाण लक्षणीय आहे. निळया, पांढर्‍या, गुलाबी रंगाचं संकरण असलेल्या रंगछटांतील फूले पर्णरहीत फांद्यावर फुलतात हे याचे खास वैशिष्ट आहे. पान गळती झाल्यावर फुलांचे डेरेदार झुपके मन आणि वातावरण प्रसन्न करतात. भरगच्च फुलांच्या ताटव्यांमुळे शोभेचे झाड म्हणून ‘गिरीपुष्प’ बागेची शोभा वाढविते.

जलदवाढीच्या विशेष गुणामुळे गिरीपुष्प प्रतिकुल परिस्थितीतही अनुकूल ठरते. सम्मुख हवामानातही जुळवून घेणे याला सहज शक्य असल्याने त्याची जोपासणी करणे सोपे होते. उपजतच कमी पाण्यावर वाढण्याची क्षमता व दव-गारव्यासाठी असहिष्णूता धोरण वृक्षलागवड व वनीकरणाकरीता खुप किफायतशीर ठरते. रायझोबियम जिवाणू याच्या मुळांवर सहजीवी पध्दतीने सहजरीतीने गाठी विकसित करीत असल्याने नत्र स्थिरीकरण प्रभावीपणे केले जाते. बी रूजण्यासाठी त्यावर कोणतीही पूर्व प्रक्रिया करणे गरजेचे नसल्याने कमी खर्चात मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेता येते. पालापाचोळा-मुळे जमिनीत जलदरित्या कुजत असल्याने पोषक घटकद्रव्याचे पुनश्चकरण लवकर होते. वातावरणातील कार्बन जमिनीत थोपवून धरण्यात इतर वनस्पतींबरोबर याची भागीदारी वैश्विक तापमानवाढीला आळा घालण्यासाठी उपयुक्त आहे.

चहा, कॉफी, कोको अश्या अर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पिकांसाठी याची सावली दर्शनीय ठरते. मेक्झिकोमध्ये याला ‘Madre de Cacao’ म्हणजेच ‘कोकोची आई’ असे संबोधले जाते. शेंगा उंदिरांना आकर्षित करीत असल्याने बियांच्या सेवनाने उदीरांचा वावर कमी होतो. साल आणि पाने एकत्रितपणे तांदळासोबत शिजवून तयार झालेल्या भाताचे सेवन उंदीरमारीचे काम करते. लॅटिन भाषेत Gliricidia चा अर्थ ‘उंदीरमार’ असा होतो. यात अढळुन येणार्‍या Eicosatrienoic acid या विशिष्ट घटकद्रव्यामुळे डासांचा अटकाव करता येतो. गिरीपुष्पाची वाढ मोठ्या संख्येने असलेल्या भागात मच्छर, डास इत्यादिंचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात आढळतो. याच्या वाळलेल्या पानांची आणि फांदयांची धूरी केल्याने डास पिटाळले जातात. समशितोष्ण व उष्ण-कटिबंदीय प्रदेशात शेताभोवताली जैविक कुंपणासाठी, वारारोधक म्हणून याचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. पानांचा लगदा करून त्याने गुरांना अंघोळ घातल्याने त्यांच्या शरीरावरील परपोषींचा (गोचीड, गोमाश्या, चामवा, उवा इत्यादी.) त्रास नियंत्रणात ठेवता येतो. मुळांची वाढ जमिनीत खोलवर पसरल्याने खालच्या थरांतील पाणी व इतर आवश्यक घटकद्रव्ये शोषून घेण्यास मदत होते. पाने नत्रयुक्त पोषक द्रव्यांनी युक्त असल्याने पालापाचोळा हरित खताकरीता उपयोगात आणतात. सेंद्रीय शेतीकडे वाटचाल वाढविण्यात याचा वाटा मोलाचा ठरत आहे. भात शेतीच्या खाचरांत याचा पाला मिसळल्याने उत्पादन वाढीत विशेष प्रगती दिसून आली आहे. पानांची भुकटी पाण्यात मिसळून भाजलेल्या जखमेवर लावल्यास दाह कमी होतो. धूर न करता जळण्याची क्षमता असल्याने स्वयंपाकासाठी इंधन म्हणून याचा वापर सोयीस्कर आहे. झटपट वाढ होत असल्याकारणाने ‘Quick stick’ अशी याची ख्याती आहे. लाकूड वाळवीरोधक असल्याने शेती अवजार्‍यांच्या मुठी तयार करण्यासाठी वापरतात. प्रामुख्याने रस्ता दुतर्फा सावली देणार्‍या झाडात वृक्षलागवडीसाठी यास अग्रक्रम दिला जातो. मधुमक्षिकापालनासाठी फुलांपासुन मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होते. सद्यपरिस्थितीत गिरीपुष्पाचा वापर रस्त्याच्या कडेने, शेताच्या बांधावर, वैयक्तिक मोकळ्या जागेत व कृषिवनिकी पध्दतीत वाढल्यामुळे त्याच्या मागणीच्या कक्षा रूंदावत आहेत.

अश्या अनेक बहुविध अष्टपैलु गुणांमुळे दिवसेंदिवस पर्यावरण समतोल व औद्योगिक विकासात गिरीपुष्पाची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे.