मराठी ई-साहित्य संमेलन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २०१४

मराठी ई-साहित्य संमेलन | Marathi e-Sahitya Sammelan

मराठी ई-साहित्य संमेलन - (Marathi e-Sahitya Sammelan) युनिक फीचर्स आयोजीत मराठी ई-साहित्य संमेलन २०१४, वेब पार्टनर मराठीमाती डॉट कॉम

युनिक फीचर्सच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ई-साहित्य संमेलनाचे आयोजन आम्ही करत आहोत. यंदाचे चौथे ई-संमेलन नाशिकला कुसुमाग्रजांच्या भूमीत करित आहोत.

युनिक फीचर्समध्ये आम्ही नेहमीच बदलत्या वाटा आणि नव्या प्रवाहांने जाण्याचा प्रयत्न गेली २३ वर्षे करित आहोत. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या बदलाचं वारं ओळखून आपली शिडं उभारण्याचा आमचा प्रयत्न असतो. साहित्य क्षेत्रानंही गेल्या काही वर्षात स्वत:चा परीघ विस्तारत इंटरनेटसारखं जगाला जवळ आणणारं वेगवान माध्यम आपलंसं केलं आहे.

ई-बुक, सोशल नेटवर्किंग साईटस्, मराठी ब्लॉग्ज आणि मराठी संकेतस्थळांचं जाळं आता आभासी जगात चांगलंच पसरलंय आणि या दुनियेशी जगभरातल्या लेखक-वाचकांचा संपर्क आहे. संवाद आहे. म्हणूनच इंटरनेटचं माध्यम हाताशी धरत साहित्याला या आधुनिक माध्यमाशी जोडून घेत तीन वर्षांपूर्वी आम्ही ई-संमेलनाला सुरुवात केली.

ई-साहित्य संमेलन कशासाठी?

  • आपल्याकडे नानाविध प्रकारची साहित्यसंमेलने होतात. ज्या-त्या विचारधारेच्या संमेलनास ज्या-त्या विचारधारेचे लेखक-वाचक जोडलेले असतात. त्यातही स्थळ-काळाच्या मर्यादा लक्षात घेता अनेकदा इच्छा असूनही वाचकांना अनेक संमेलनांना उपस्थित राहता येत नाही. अशावेळी इंटरनेट सारख्या समकालिन माध्यमातून ते-आपण च्या कुंपणात न अडकता लेखक-वाचकांना सामावून घेणारं आणि भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करुन माध्यम-व्यासपिठ असायला हवं असं आम्हाला आवर्जून वाटतं.
  • इंटरनेट हे असं माध्यम आहे जिथं महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातला लेखक-वाचकही जोडला जातो आणि जगभरात विखुरलेलं मराठी मनही.
  • जगभरात असलेले मराठी वाचक आणि लेखक यांना एकत्र करुन जाणत्यांचे अनुभव समजून घेत असतानाच, नव्या साहित्य उर्मींशी संवाद साधता आला तर लेखक आणि वाचाकांसाठी हा साहित्य प्रवास अधिक समृद्ध करणारा ठरतो यात शंकाच नाही. दुसरं असं की इंटरनेटमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणं सहज शक्य आहे.
  • इंटरनेटवरच्या आमच्या या साहित्यसंमेलनाच्या निमित्तानं काही विचारमंथन व्हावं, अशी आमची इच्छा आहे. याच हेतूनं आमच्या uniquefeatures.in या संकेतस्थळावर आम्ही हे साहित्य संमेलन गेली तीन वर्ष भरवत आहोत.
  • इंटरनेटसारख्या वेगवान आणि वैयक्तिक माध्यमातून हे संमेलन आकार घेत असल्यामुळे या ई-साहित्य संमेलनात जो मजकूर साईटवर अपलोड केलेला असतो तो सगळा मजकूर वाचकाला त्याच्या सोयीनं, निवांतपणे, सावकाश आणि आनंद घेत वाचण्याची मुभा आहे. वाचलेल्या मजकुरावर विचार करायला आणि त्यावर मत मांडायला पुरेसा वेळ वाचकाला मिळू शकतो. त्यामुळे या ई-संमेलनात होणारं विचारमंथन वाचकांच्या सक्रिय सहभागानं तर होतंच पण त्याचबरोबर विचारांची विविधस्तरीय देवाण-घेवाण करायला यात संधी मिळते.

ई-साहित्य संमेलनाला लाभलेले अध्यक्ष
आमच्या या अभिनव साहित्य संमेलनाला पहिल्या वर्षी विख्यात साहित्यिक ‘रत्नाकर मतकरी’ अध्यक्ष म्हणून लाभले, दुसरं ई-संमेलन ख्यातनाम कवि ‘ग्रेस’ यांच्या अध्यक्षतेखाली भरवलं गेलं तर ज्येष्ठ लेखक ‘भालचंद्र नेमाडे’ यांनी तिस-या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं.

ई-साहित्य संमेलनाचे स्वरुप काय?
ई-संमेलन २०१४ साठी ख्यातनाम साहित्यिक ना. धो. महानोर अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. नाशिकला कुसुमाग्रज स्मारकामध्ये २४ मार्च २०१४ रोजी सायंकाळी ई-संमेलन २०१४ चा सोहळा आयोजित करण्याचे योजिले आहे. ना.धो. महानोरांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

कुसुमाग्रज स्मारक - नाशिक