ते दूध तुझ्या त्या घटातले

लेखन भा. रा. तांबे | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: भा. रा. तांबे
संगीतकार: वसंत प्रभू
गायक: लता मंगेशकर
गीत प्रकार: -

ते दूध तुझ्या त्या घटातले
का अधिक गोड लागे न कळे ॥धृ॥

साईहूनी मऊमऊ बोटे ती
झुरुमुरु झुरुमुरु धार काढती
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनातिल त्यात मिळे ? ॥१॥

अंधुक श्यामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरू, मधे झोपडी
त्यांची देवी धार ही काढी
का स्वप्‍नभूमि बिंबुनि मिसळे ? ॥२॥

या दृष्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे ? ॥३॥